कलंदर : सत्ताधीश?

-उत्तम पिंगळे

सकाळीच प्रा. विसरभोळ्यांकडे गेलो. मी पाहत होतो विसरभोळे एका हातात पेपर धरून खो खो हसत होते.

मी : काय सर एकदम हसत आहात?
विसरभोळे : हसू नाही तर काय? तिकीट वाटपावरून सर्वत्र बरेच जण बेडूकउड्या मारत आहेत म्हणून हसत होतो.
मी : हो, पण असे सर्वच पक्षांत होत आहे. म्हणजे बघा, जे जे नाराज आहेत ते पक्ष बदलत आहेत.
विसरभोळे : हो, पण हे कोण करू शकतो? ज्याच्यापाशी पैसा आहे तो. सर्वसामान्य माणूस तेथे पोहोचूही शकत नाही.
मी : हो, हेच पण… (मला थांबवत)

विसरभोळे : हे बघा आपल्याकडे सत्ता आली म्हणजे संपत्ती जमा करणे हा बऱ्याच जणांचा मूळ हेतू असतो. आता जे निवडणुकीसाठी उभे राहतात ती स्वतःच्या खिशातून थोडाच पैसा टाकतात? एवढी संपत्ती जमा करतात की त्यातूनच पुढील निवडणूक लढवण्यासाठी वेगळा पैसा काढून ठेवतात. मग त्यातूनच शेवटचे दोन-तीन महिने लोकं व कार्यकर्ते (प्रसंगी पैसा मोजून) गोळा केले जातात आणि पुन्हा निवडणुकीचे ढोल वाजवले जातात. हा, पूर्ण ते नीट विचार करा की एकदा सत्ता आली की, या सत्ताधिशांकडे एवढा पैसा येतो कुठून? आपण युरोपियन देशांकडे पाहा. तेथे आजही बहुतेक वेळा खासदार किंवा मंत्री झालेली व्यक्‍ती ते पद भोगून झाल्यानंतर सामान्य माणसासारखे वागू लागते. आपल्याकडे असे होईल का?
साधे नगरसेवकपद किंवा सरपंचपद जरी मिळाले तरी संपत्ती गोळा करणे हा एककलमी कार्यक्रम असतो. अर्थात, सर्वच नेते असे असतात असे नाही; पण राजकारण्यांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. चांगले लोक राजकारणामध्ये फार कमी असतात. राजकारण म्हणजे समाजकारण हे सूत्र हळूहळू बदलून त्याचे गुन्हेगारीकरण होत आहे. बहुतेक नेते व खासदार सत्ताधीश होऊ लागले. ते एवढे की जर आपल्या पक्षातून तिकीट मिळाले नाही, तर सरळ विरोधी पक्षात जाऊन तिकीट मिळवून उभे राहतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यापाशी जमा असलेली प्रचंड संपत्ती हेच होय. आपण आपले उगीचच लोकशाही लोकशाही असे म्हणत असतो. घटनादत्त कायदे कानूनांचा धाक नाही राजकीय उन्मत्तास. जिसकी लाठी उसीकी भैस तरीही आम्ही प्रजासत्ताक? म्हणून मागाशी मी खो खो असे हसत होतो. एकदा खासदार झाला म्हणजे त्या विभागातचा तो अनभिषिक्‍त सम्राटच बनतो. मग त्याला कशाचीही पर्वा नसते. फक्‍त खुर्ची, सत्ता, पैसा हेच त्याचे जीवन बनते.

तुम्हाला ते गाणं आठवते का?

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. मग खासदार काय म्हणतो ते पाहा…

शूर आम्ही खासदार आम्हाला काय कुणाची भीती
सत्ता, खुर्ची आणि पैशा पायी प्राण घेतला हाती.
आईच्या गर्भात उमगली राजकारणाची रीत
खुर्चीशी ते लगीन लागलं जडली येडी प्रीती.
लाख लंपटं झेलून घेईल अशी पहाडी छाती
सत्ता, खुर्ची आणि पैशा पायी प्राण घेतला हाती.
जिंकावे वा हरून जगावं हेच आम्हाला ठावं
लढून हरावं हरून जगावं हेच आम्हाला ठावं.
मोहापायी सारी विसरू माया ममता नाती.
सत्ता, खुर्ची आणि पैशा पायी प्राण घेतला हाती.
शूर आम्ही खासदार आम्हाला काय कुणाची भीती!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)