संडे स्पेशल : रायडिंग टू द टॉप ऑफ द वर्ल्ड (भाग-1)

-अश्‍विनी जगताप-घाडगे

विशाल हिमाच्छादित पर्वतरांगा, स्वच्छ निळं विस्तीर्ण आभाळ, आव्हानात्मक पण तितकेच मनमोहक रस्ते, त्याबाजूने खळाळत वाहणारी नदी आणि क्षणाक्षणाला आश्‍चर्यचकित करणारे वातावरण…. हे सगळं एका बायकरसाठी अथवा एका फोटोग्राफरसाठी निसर्गाने दिलेलं आमंत्रणंच…हे सगळं अनुभवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे लेह-लडाख.

माझी लडाखची ट्रिप ही आनंदाची पर्वणीच ठरली. जवळ जवळ 9 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर हा योग जुळून आला. या ट्रिपला जाण्याचं खरं कारण म्हणजे आपलं लाडकं बॉलीवूड. “जब वी मेट’ आणि “थ्री इडियट’ या चित्रपटांमुळे लडाख ट्रिप करायचीच आणि ती सुद्धा रोड ट्रिप, असा ध्यास मनाशी केलेला. मला ट्रॅव्हल फोटोग्राफीचं वेड असल्याने आणि माझ्या पतीला बाईक रायडिंगची आवड असल्याने लडाखला जाण्याची आमची इच्छा आम्हाला पुण्याहून लडाखला घेऊन गेलीच.

मे ते ऑक्‍टोबर महिन्यांमध्ये लडाखचे मार्ग प्रवाशांसाठी खुले असतात. असं म्हणतात की, तिथे या काळात उन्हाळा असतो. खरंतर त्या 10 दिवसांत मी तिथे सगळेच ऋतू अनुभवले. 14 दिवसांच्या ह्या प्रवासाला सुरुवात झाली ती बुलेटने. कुरिअर सर्व्हिसने दिल्लीला एका मित्राच्या घरी पाठवण्यापासून. सोबतच इथे शॉपिंगही सुरू होती. पहिल्यांदाच जम्मू काश्‍मीर आणि एवढी मोठी बाईक ट्रिप, यामुळे तेथील हवामान व सोबत न्यायचे साहित्य याबाबत मी पूर्णपणे अनभिज्ञ होते. त्यामुळे आम्ही एका अनुभवी रायडर्स ग्रुपबरोबर हा प्रवास करण्याचे ठरवले.

ग्रुप हेडच्या गाइडलाईन्सनुसार जे जे सामान घेण्याची गरज होती तेवढं घेतलेलं. त्यांच्या माहितीप्रमाणे आम्ही रायडिंग गेअर्स, थंडीचे कपडे आणि त्यासोबत पावसाचे कपडेही घेतले. कपड्यांसोबतच काही औषधं, मेडिकल किट आणि खूप सारे चॉकलेट्‌स घेतले आणि आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही मुंबईहून राजधानी एक्‍स्प्रेसने दिल्लीला पोचलो. दिल्लीला पोहोचून आम्ही सरळ मित्राकडे जाऊन आमची बुलेट घेतली आणि हॉटेलमधे चेक-इन केले. आम्ही दोघंही खवय्ये असल्याने नवनवीन पदार्थ चाखायला आम्हाला खूप आवडतात. आधीपासूनच दिल्लीतल्या व्यंजनांबद्दल बरंच ऐकून होते. आम्ही मित्रासोबत कॅनॉट प्लेसमधल्या “काके दा हॉटेल’ मध्ये गेलो.

दिल्लीतला आमचा दुसरा दिवस बाईकची सर्व्हिसिंग करण्यात आणि दुसऱ्या दिवशीच्या मोठ्या प्रवासाची तयारी करण्यात गेला. पेट्रोलचे कॅन सोबत घेऊन जाण्यासाठी बाईकला कॅरीअर बसवले. तिथे जाऊन काय करायचे आणि काय नाही याची सविस्तर माहिती मिळाली. जसे मनालीला पोहोचल्यापासून रोज एक डायमॉक्‍स गोळी खा, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर प्रवास करत असल्याने कोणत्याही पास वर जास्त वेळ थांबू नका, तिथल्या लोकांना अरे-तुरे केलेले चालत नाही “आदर द्या, आदर मिळेल’, श्‍वास घ्यायला थोडं कठीणच असतं तिथे, तर घाबरून जाऊ नका, सोबत डॉक्‍टर आहे काही झालं तर तो तुमची काळजी घेईल आणि महत्त्वाचं म्हणजे प्रवासाचं आनंद घ्या, वगैरे वगैरे.

तिसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता आमच्या प्रवासाला खरीखुरी सुरुवात झाली. ह्या दिवशी आम्हाला जवळजवळ 550-600 किमीचे अंतर कापायचे होते. दिल्लीहून निघून पानिपत, कर्नाल करत आम्ही कुरुक्षेत्र मधल्या झिलमिल धाब्यावर न्याहारीसाठी थांबलो. उत्कृष्ट, लज्जतदार जेवण पोटात गेल्यावर पुढचा प्रवास सुरू झाला. चंदिगढमध्ये अजून काही यात्री आमच्या सोबत जोडले गेले. इथंपर्यंत छान मोठा सरळ महामार्ग होता. त्यामुळे हे अंतर फारच कमी वेळात पार केलेलं. इथून मनाली पोहोचेपर्यंत जवळजवळ अर्ध्याहून जास्त प्रवास घाटातून आहे.

चंदिगढपासून काही किमीनंतर खरं निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळू लागले. अंगावर येत असल्याचा भास निर्माण करणारे अवाढव्य डोंगर, मनाला सुखावणारी हिरवळ, मंडी शहरापासून ते मनालीपर्यंत जवळजवळ 4 तासांच्या प्रवासात आमच्यासोबत शर्यत करत वाहणारी बियास नदी. इथेच वाटू लागलं की, यापेक्षा अजून काय आणि किती सुंदर असेल निसर्ग.

प्रत्येक वळणावर फोटो काढावा असा सुरम्य निसर्गाचा आस्वाद घेत देवांची भूमी असलेल्या हिमाचल प्रदेशात आम्ही प्रवेश केला. कुल्लूमधील नदीकाठची टिपिकल घरे पाहात पाहात आम्ही संध्याकाळी 7 च्या सुमारास हा मोठा प्रवास संपवून तिथल्या हॉटेलमध्ये चेक-इन केले. त्या संध्याकाळी आमच्या सोबत असलेल्या मेकॅनिकने सगळ्या बाइक्‍सची तपासणी केली. रात्री आम्ही मनालीचे पारंपरिक जेवण जेवलो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)