विज्ञानविश्‍व : पोर्ट्रेट एडमंड डी बेलामीचं…

-मेघश्री दळवी

ख्रिस्तीज ही मोठी नावाजलेली ब्रिटिश ऑक्‍शन कंपनी. लहानमोठ्या किमती वस्तूंचा लिलाव करणारी ही कंपनी अडीचशे वर्षांहून जुनी आहे. काही ना काही कारणाने ती नेहमीच चर्चेत असते. तिने लिलाव केलेल्या वस्तू कधी कधी इतक्‍या अजब असतात, की जगभराची मंडळी औत्सुक्‍याने त्यांच्या बातम्या वाचत असतात, ऐकत असतात.

मागच्या वर्षी ख्रिस्तीज पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली ती एडमंड डी बेलामीच्या पोर्ट्रेटच्या लिलावामुळे. सर्वसाधारण असं
पोर्ट्रेट दहा हजार डॉलर्सपर्यंत विकलं जाईल असा ख्रिस्तीजला अंदाज होता. पण कमाल म्हणजे एका अनामिकाने हे पोर्ट्रेट चक्‍क सव्वाचार लाखांहून अधिक डॉलर्सना खरेदी करून सगळ्यांनाच धक्‍का दिला!

का मोजले त्याने इतके पैसे? कोण होता तो? हा एडमंड डी बेलामी कोण? आणि कोणी काढलं ते पोर्ट्रेट? बरेच प्रश्‍न मनात उभे राहिले असतील ना? या सगळ्याला तितकंच धक्‍कादायक उत्तर आहे – या चित्राचा चित्रकार कोणी माणूस नसून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आहे!

यंत्रांना बुद्धिमत्ता देणारं तंत्रज्ञान गेलं दशकभर गाजतं आहे. कुणी म्हणतं की यंत्रांना किंवा संगणकांना केवळ मर्यादित प्रमाणातच बुद्धिमत्ता देता येते, तर कुणी म्हणतं की तांत्रिक बुद्धिमत्ता मिळाली तरी यंत्रं काही सर्जनशील कलाकृती नाही घडवू शकणार.

पण एडमंड डी बेलामीचं पोर्ट्रेट काढलं आहे ते पॅरिसमधल्या एका आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अल्गोरिदमने आणि म्हणूनच या चित्राला एवढं वलय आहे, एवढं मूल्य आहे!

अल्गोरिदम म्हणजे माणसांनीच संगणकासाठी तयार केलेली नियमबद्ध तर्कप्रणाली. ही आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची तर्कप्रणाली मशीन लर्निंग तंत्रज्ञान वापरून अनुभवातून शिकत जाते. पॅरिसमधल्या तीन विद्यार्थ्यांनी ऑब्वियस नावाचा आपला ग्रुप स्थापन करून अशीच एक गणितावर आधारित तर्कप्रणाली तयार केली, कलानिर्मितीसाठी.

जनेरिटिव्ह ऍडव्हर्सरियल नेटवर्क, या पद्धतीची ही तर्कप्रणाली दोन टप्प्यात काम करते. पहिल्या टप्प्यात जनरेटर प्रणाली आहे, तिला गेल्या सातशे वर्षांतल्या वेगवेगळ्या शैलींमधल्या पोर्ट्रेट्‌सचा डेटा दिलेला आहे. सुमारे पंधरा हजार पोर्ट्रेट्‌सवरून जनरेटर प्रणाली एक नवीन पोर्ट्रेट तयार करते.

पुढच्या टप्प्यात डिसक्रिमिनेटर प्रणाली आहे. ती जनरेटर प्रणालीचं पोर्ट्रेट हे माणसाने काढलेलं आहे की संगणकाने याचा अंदाज घेते. त्यासाठी ती अनेक प्रकरच्या चाचण्या घेऊन फरक ओळखायला शिकली आहे. एखादं पोर्ट्रेट माणसाने काढलेलं नाही असा निष्कर्ष आल्यास ते बाजूला ठेवलं जातं. असं करत करत ही संपूर्ण तर्कप्रणाली जेव्हा एक नवं पोर्ट्रेट देते, तेव्हा ते हुबेहूब माणसाने काढल्यासारखं दिसत असतं. हे चित्र तयार करण्यामागची प्रक्रिया यूट्यूबवर उपलब्ध आहे.

तेव्हा एडमंड डी बेलामी कोणी खरा माणूस नाही तर ऑब्वियस ग्रुपने दिलेलं एक नाव आहे, बस्स. चित्र विकत कोणी घेतले हे अजून गुलदस्त्यात आहे, पण अर्थात त्यामागे या पोर्ट्रेटचं नावीन्य आहे. उद्या अशी अनेक चित्रं उपलब्ध झाली, तर इतके मूल्य कुणी नाही मोजणार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)