प्रेरणा : अंध युवकाची प्रशासनसेवा

-दत्तात्रय आंबुलकर

विपरीत परिस्थितीतही यशस्वी मात करून मानसिक जिद्द आणि इच्छाशक्‍तीच्या बळावर विविध संकटांवर मात करून एखादी व्यक्‍ती अगदी जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचू शकते, ही एरव्ही कल्पनाही कुणी करणार नाही. मात्र, कृष्णगोपाल यांनी प्रचंड मेहनत व जिद्दीने आपले ध्येय कसे पूर्ण केले त्याचीच ही यशोगाथा-

कृष्णगोपाल तिवारी हे मूळचे उत्तर प्रदेशच्या आंबेडकरनगर जिल्ह्याचे रहिवासी. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील व आई-वडील शेतमजुरी करणारे. घरी केवळ दोनच एकर शेती असल्याने आर्थिक स्थिती नेहमीच बेताची. अशातच त्यांच्या तीन भावांना वयाच्या दहाव्या वर्षापासून दृष्टी कमी होण्याचा आजार जडला. त्यानंतर कृष्णगोपाल तिवारी यांनाही दृष्टिदोषाचा आजार जडला व वयाच्या 18 व्या वर्षी बारावीत शिकत असतानाच त्यांची दृष्टी गेली.

मात्र, दृष्टी गमावल्यावरसुद्धा कृष्णगोपाल गडबडले नाहीत. त्यांनी खूप मेहनत घेतली. पुढील शिक्षण पूर्ण केले अनेक अडचणींवर मनोधैर्याने व यशस्वीपणे सामोरे जाणाऱ्या कृष्णगोपाल यांनी साऱ्या जगाला आपल्या कृतीने दाखवून दिले. कृष्णगोपाल यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सरकारी शाळेत पूर्ण केले. त्यानंतर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्वांचल विद्यापीठ, जोनपूर येथून तर पदव्युत्तर शिक्षण शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर येथे घेतले. सुरुवातीला ते लेखनिकाची मदत घ्यायचे, मात्र नंतर लेखनिकाचा खर्च न परवडणारा ठरल्याने त्यांनी टेपरेकॉर्डरच्या मदतीने आपला अभ्यास-शिक्षण सुरूच ठेवले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दोनवेळा अनुत्तीर्ण ठरल्यानंतरसुद्धा त्यांनी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे आपले ध्येय मोठ्या जिद्दीने पूर्ण केले. 2008 मध्ये वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते यूपीएससी परीक्षेत 142 वे आले. दिव्यांगांच्या श्रेणीत तर ते पहिल्या क्रमांकावर राहिले. त्यानंतर पुढील प्रशिक्षण त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर व्हिजुअली हॅंडीकॅप या संस्थेतून घेतले व हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर त्यांनी पहिल्यांदा मध्य प्रदेशात प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. दिव्यांग असल्याने त्यांच्या अडचणी अर्थातच संपणाऱ्या नव्हत्या. मात्र, त्यांनी आपल्या समस्यांचा कधीच बाऊ केला नाही.

कृष्णगोपाल निकुंज श्रीवास्तव यांच्यासोबत प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून काम करू लागले तेव्हा ते श्रीवास्तव यांना म्हणाले, “दिव्यांग असल्याने माझ्यावर कोणत्याही प्रकारे मेहरबानी करू नका’, त्यामुळे कृष्णगोपाल यांच्या विनंतीचा मान राखत त्यांच्याकडून सर्व प्रकारची कामे करवून घेतली. दृष्टीहीन असतानाही चोर व अवैध वाहने पकडण्यातही ते यशस्वी ठरले.कृष्णगोपाल यांना भ्रष्टाचाराविरुद्ध प्रचंड चीड आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल 40 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांवर सरकारी योजनांमध्ये भ्रष्टाचार केल्याने तक्रारी दाखल केल्या आहेत.

कृष्णगोपाल ज्यावेळी स्पर्धा परीक्षा देत होते. त्यावेळी त्यांच्यासमोर दिव्यांगामधून कुणाचा असा विशेष आदर्श नव्हता. मात्र, आज त्यांचा यशस्वी आदर्श समोर ठेवून हजारो विद्यार्थी आपल्या कमीपणावर यशस्वीपणे मात करीत कृष्णगोपाल यांच्या पावलावर पाऊल ठेवीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)