लक्षवेधी : पक्षांतरांच्या मौसमी वाऱ्यांमध्ये संकेतांची पडझड !

-राहुल गोखले

निवडणुका जाहीर झाल्या की पक्षांतरांचा रतीब देखील सुरू होतो. प्रत्येक पक्ष निवडणूक लढविण्याचे यंत्र म्हणूनच कामाला लागतो आणि त्यामुळे जिंकून येणे एवढाच निकष प्रमुख बनतो. लोकशाहीत निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाला आपापली रणनीती आखण्याची मुभा आहे यात शंका नाही; परंतु ज्या पद्धतीने आयाराम-गयाराम संस्कृती (की विकृती ?) या काळात फोफावते ते पाहता मात्र ही राजकीय पक्षांमधील लढत आहे की जीवन-मरणाचा प्रश्‍न अशी शंका आल्याशिवाय राहणार नाही.

वास्तविक निवडून आलेल्यांवर पक्षांतरबंदी कायदा लागू होतो. परंतु निवडणुकीपूर्वी आणि राजकीय पक्षांसाठी तसा कायदा नाही आणि तो असण्याची सूतराम शक्‍यता देखील नाही. साहजिकच भिस्त राहते ती संकेत पाळण्यावर आणि त्या बाबतीत राजकीय पक्षांची कामगिरी मुळीच उत्साहवर्धक नाही.

गेल्या काही दिवसांत सुजय विखे-पाटील यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ओडिशात जय पांडा यांनी प्रवेश केला तर टॉम वडक्कम यांनाही कॉंग्रेसमधून भाजपमध्ये येणे पसंत पडले. हा एक रणनीतीचा भाग असतो कारण सामान्यतः जो पक्ष जिंकेल अशी शक्‍यता असते त्या पक्षाकडे ओघ वाढत असतो. तेव्हा अन्य पक्षांवर दबाव बनविण्यासाठी देखील या प्रयोगांचा उपयोग केला जातो आणि भाजप हेच दाखवू इच्छितो.

लोकसभा निवडणुकीत आपले पारडे जड आहे हे वातावरण निर्माण करण्यासाठी भाजप अनेकांना अन्य पक्षांतून प्रवेश देत आहे. यातील प्रत्येकाचा निवडणूक जिंकण्यासाठी उपयोग आहे असे मानण्याचे कारण नाही; पण एकूण आपल्यावर प्रकाशझोत राहील एवढा उद्देश तर सफल होऊ शकतो. अर्थात भाजपमध्येच आयारामांची गर्दी होईल असे मानण्याचे कारण नाही. नव्या आघाड्या, नवी समीकरणे यासाठी निवडणुकांचा काळ सुपीक असतो. राजकारणातील अपरिहार्यता म्हणून त्याकडे पाहिले तरीही ज्या पद्धतीने ते होते ते पाहता त्यास केवळ रणनीती असे म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही.

प्रश्‍न अधिक व्यापक आहे आणि तो आहे विधिनिषेधाचा आणि संकेतांचा. अमेरिकेत कोणतीही व्यक्‍ती दोनपेक्षा अधिक वेळा अध्यक्षपदावर राहात नाही. तेथे हा संकेत अतिशय कसोशीने पाळला जातो. लोकशाहीचे दृढीकरण नियम आणि कायद्यांपेक्षा संकेतांवर अधिक होत असते. एका पक्षात असताना काल -परवापर्यंत जो नेता प्रतिस्पर्धी पक्षावर शरसंधान करीत असतो तो अचानक त्या प्रतिस्पर्धी पक्षाचा झेंडा हाती घेतो आणि त्या पक्षाचा गौरव करू लागतो. असे करण्यास त्यांना संकोचही वाटत नाही कारण एक प्रकारचा राजकीय कोडगेपणा निर्माण झालेला असतो.

हा कोडगेपणा लोकशाहीला मारक असतो कारण पुन्हा तो त्या संकेतांना धक्‍का देत असतो. एखाद्याला आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जावेसे वाटले तर त्यास मज्जाव असण्याचे कारण नाही. तसे करण्याचे कारण खरोखरच दुसऱ्या पक्षाची विचारधारा पटणे हे असेल तर ते स्वागतार्हही मानायला हरकत नाही कारण मग त्या पक्षांतराला सैद्धांतिक पाया असतो; आणि संधिसाधूपणाचा दर्प त्यास येत नाही. मात्र आता जी निवडणूकपूर्व पक्षांतरे होत आहेत त्यामागील किती पक्षांतरांचा हेतू हा सैद्धांतिक आहे या प्रश्‍नाचे उत्तर छातीठोकपणे देता येणार नाही.

गेल्या पाच वर्षांत ज्या ज्या विधानसभा किंवा अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यांत भाजपने सर्रास अन्य पक्षांतून उमेदवार आयात केले. त्यामुळे भाजपला वेळोवेळी आणि ठिकठिकाणी मिळालेला विजय हा भाजपच्या विचारधारेचा विजय की केवळ रणनीतीचा हा प्रश्‍न उपस्थित होतो आणि जेव्हा विजय हा विचारधारेपेक्षा रणनीतीचा अधिक असतो तेव्हा ते लोकशाहीला बाधक ठरते. अखेर रणनीती ही तात्कालिक आणि कायम बदलणारी असते तर विचारधारा ही दीर्घकालीन असते.

लोकशाहीत रणनीतीला महत्त्व नाही असे नाही; पण तिने विचारधारेवर मात करता कामा नये कारण तसे झाले तर अखेर राजकीय पक्षामधील वैचारिक सीमा पुसून जातात आणि सर्वच राजकीय पक्ष एक सारखे दिसू लागतात. वास्तविक लोकशाहीत विचारधारांचा संघर्ष व्हावयास हवा. परंतु रणनीतीला अतिरिक्‍त महत्व आले की चेहऱ्यांना महत्त्व प्राप्त होऊ लागते आणि मग संघर्ष दोन पक्ष किंवा विचारधारांमधील न राहता व्यक्‍तिमत्वांमधील होऊ लागतो. याचा अर्थ नेतृत्वाचा वाटा कमी असावयास हवा असे नाही; किंबहुना विचारधारेचा चेहरा म्हणजे नेतृत्वच असते. तथापि, रणनीतीला आलेल्या महत्त्वाने पक्षांतरांना कोणताच प्रत्यवाय राहात नाही कारण सर्वच पक्ष मग सामान्यतः एकाच प्रकारचे भासू लागतात.

भाजपचा हिंदुत्ववाद सौम्य होतो आणि कॉंग्रेस धर्मनिरपेक्षतेकडून सौम्य हिंदुत्ववादाकडे प्रवास करते. कॉंग्रेसोद्‌भव पक्ष कॉंग्रेसला किंवा भाजपला विरोध करतात पण तो केवळ सत्ता प्राप्तीसाठी; वैचारिक स्तरावर नव्हे. याची परिणीती शेकडो राजकीय पक्षांमध्ये नेमका फरक काय हा प्रश्‍न पडण्यात होतो आणि एकदा हा फरकच दिसेनासा झाला की पक्षांतरे करणाऱ्याला फार स्पष्टीकरणही द्यावेसे वाटत नाही आणि लागत नाही.

कोणतेही फुटकळ कारण किंवा सबब सांगून वर त्या सबबीचे उद्दात्तीकरण करून पक्षांतर करता येते. वडक्कम यांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करताना सर्जिकल स्ट्राईकविषयी कॉंग्रेसची भूमिका आपल्याला पटली नाही हे कारण दिले आहे. या एका कारणावरून कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश घेणे किती समर्थनीय आहे हे त्या वडक्कम यांनाच माहीत. मात्र, या आणि अशा प्रकरणांमुळे एकूण लोकशाहीचे किरकोळीकरण होते यात शंका नाही.

पुढील दीड-दोन महिने हाच खेळ सुरू राहील आणि पक्षांतर करणाऱ्या प्रत्येक जणाकडे त्याच्या दृष्टीने सबळ कारणे असतील. अर्थात सगळ्या कारणांतील सगळ्यात खरे आणि तरीही उल्लेख न झालेले कारण असेल ते सत्तेत सहभागी होण्याचे. पक्षांतर करणाऱ्याने किंवा ज्या पक्षात त्या व्यक्‍तीने प्रवेश घेतला आहे त्या पक्षाने कितीही स्पष्टीकरणे दिली किंवा समर्थन केले तरीही मतदारांना खरे कारण ठाऊक असते आणि म्हणूनच अशा विधिनिषेधशून्य पक्षांतरांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी मतदारांची देखील असावयास हवी.

पक्षांतरांमागील हेतू किती शुद्ध हे मतदार ओळखू शकतात. तेंव्हा अशा पक्षांतरांना प्रोत्साहन द्यायचे की परावृत्त करायचे याचा विचार मतदारांनी देखील करावयास हवा. तात्कालिक लाभ, एका निवडणुकीतील विजय, तात्पुरत्या कुरघोड्या यापेक्षा राजकीय संस्कृती आणि लोकशाहीचे दृढीकरण या बाबी अधिक दीर्घकालीन आणि महत्त्वाच्या आहेत. मतदान करताना मतदारांनी याची जाणीव ठेवावयास आणि साधकबाधक विचार करावयास हवा कारण मतदाराचे एक मत एका उमेदवाराला किंवा एखाद्या पक्षालाच नसून राजकीय संस्कृतीस असते.

राजकीय पक्ष आणि नेते जेव्हा चुकतात तेव्हा राजकारण आणि लोकशाही योग्य मार्गावर ठेवण्याची जबाबदारी मतदारांची असते !

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)