मायक्रो स्क्रीन्स्‌ : खिलाफ़…

-प्राजक्‍ता कुंभार

विधवा हा शब्द वाचला किंवा ऐकला की आजही आपल्या डोळ्यासमोर एक ठराविक व्यक्‍तिचित्र उभं राहतं. काळाच्या ओघात, आपलं वैचारिक पुढारलेपण मिरवताना, या विधवा स्त्रियांना बरोबरीची वागणूक देऊन आपण फार मोठी समाजसुधारणा करतोय असा अनेकांचा अविर्भाव असतो. पण हे असं वरवरचं दाखवणं आणि मनापासून त्यांच्या जगण्याला सपोर्ट करणं यात फरक असणारच, नाही का?

‘नवरा नाही’ या घटनेने मानसिक, शारीरिक, आर्थिक अशा सर्वार्थानं पोळलेली बाई, जेव्हा नव्याने जगू पाहते, तेव्हा तीच ते जगणं सोप्पं करणं, झालंच तर आपल्यापरीने शक्‍य ती मदत करणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. नवरा जाऊन एक वर्ष उलटलेलं नसताना, एका पुरुषाच्या प्रेमात पडणाऱ्या विधवा तरुणीला किती आणि कोणकोणते प्रश्‍न पडत असतील?

समाजाने हे स्वीकारावं हा लांबचा पल्ला बाजूलाच असूदे, तिची खरी लढाई तर स्वतःच्या घरातूनच सुरू होत असेल. आई वडिलांना समजावणं जमेलही कदाचित, पण सासू सासरे? त्यांना सांगायचं कसं आणि काय? की असंही सासर असेल एखादं, जिथे सुनेच्या या अशा निर्णयाला भक्‍कम पाठिंबा दिला जाईल? दीपशिखा भटनागर या दिग्दर्शिकेची ‘खिलाफ़’ ही दहा मिनिटांची गोष्ट आपल्यासमोर हाच प्रवास उलगडते.

रविवार. दुपारची वेळ. आपल्या लेकीची (इशिता शर्मा) जेवायला वाट बघणारी, दुपार उलटून चाललीये तरी लेकीचा घरी पत्ता नाही, म्हणून जरा वैतागलेली आई (नवनी परिहार). नेमकी त्याच वेळी ईशा घरी पोहोचते. तिच्या चेहऱ्यावरून, ती बाहेर जिथे कुठे गेली होती तिथे तीच काहीतरी बिनसलंय हे लक्षात येत आपल्या. ‘एक रविवार असतो, आणि त्याही दिवशी तुला आईसाठी वेळ नसतो का? तुला माहितीये ना, मी तुझी वाट बघत होते जेवणासाठी..?’

एकीकडे लेकीवर थोडंसं वैतागत, दुसरीकडे तिच्यासाठी जेवण गरम करताना आईचा इशासोबत एकतर्फी संवाद सुरू आहे. आईच्या या प्रश्‍नांना कोणताही उत्तर न देता, रडवेली झालेली ईशा, ‘मला भूक नाहीये’ असं सांगते. पण त्याहीवेळी आईच्या फारसं काही लक्षात येत नाही. शेवटी, ‘आई, माझं दुसऱ्या कोणावर प्रेम आहे..’ असं ईशा सांगून टाकते, आणि ‘दुसरं कोणतीतरी म्हणजे ईशाचं लग्न झालंय की ठरलंय’ असा विचार आपल्या डोक्‍यात येतो.

ईशाची रडवेली अवस्था पाहून, ‘प्रेमात पडलीये यात एवढं दुःखी काय व्हायचं..?’ असाही प्रश्‍न आपल्या मेंदूत फ्लॅश होतो आणि इथेच येतो या गोष्टीचा ट्‌विस्ट. ईशा आणि तिची आई यांचं नातं आपल्यासमोर उलगडत आणि आतापर्यंत पाहिलेली, सरळसाधी वाटणारी ही गोष्ट क्षणात रूप बदलते. ते नातं असतं सासू- सुनेचं.

कॅन्सरमुळे आपला मुलगा गमावलेली ईशाची सासू(जी आतापर्यंत आपल्याला आईच वाटत असते) नेमका काय निर्णय घेते? सासू, आई या भूमिकांतून बाहेर पडून, एक स्त्री म्हणून समजून घेते की …? नवरा जाऊन एक वर्षही झालं नसताना, आपण कोणाच्यातरी प्रेमात पडलोय या सेल्फगिल्टला ईशा स्वीकारते की समाज काय म्हणेल म्हणून कचरते? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तर मिळवण्यासाठी ही शॉर्टफिल्म इज मस्ट वॉच.

नवनी परिहार यांची आई- सासू, उत्तम. अशा व्यक्तिरेखांची खरंच गरज आहे छोट्या पडद्यावर. खरंतर इथे कोणताही स्टोरी-स्पॉईलर लिहायचा नाहीये मला, पण तरीही यासारख्या तुलनेनं ऑफबीट विषयाची, ताकदीची उत्तम मांडणी पाहून मनापासून कौतुक वाटलं.

एखाद्या विधवा बाईला केवळ स्त्री म्हणून समजून घेणं, तिच्या शारीरिक-मानसिक गरजांना स्वीकारणं, हे जितकं सकारात्मक आहे, तितकाच ‘तू करू शकतेस स्वतःचा विचार, जगू शकतेस फक्‍त स्वतःसाठी’ हा आत्मविश्‍वास तिच्याठायी रुजवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ‘स्त्री’त्वाचा हा नवा पैलू जगासमोर मांडणारी ही देखणी शॉर्टफिल्म नक्‍कीच पाहायला हवी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)