अबाऊट टर्न : भूकंप…

-हिमांशू

भूकंपाचं भाकित कधीच करता येत नाही; पण काही पक्ष्यांना त्याचा अंदाज येतो म्हणे! भूकंप होणार असेल तर पक्ष्यांच्या हालचाली बदलतात आणि जाणकार त्या हालचाली पाहून भूकंपाची शक्‍यता वर्तवतात, असं आम्ही ऐकून आहोत. प्रत्यक्षात पक्ष्यांच्या वर्तनबदलामुळं भूकंपाचं पूर्वानुमान काढलं गेल्याचा प्रसंग पाहण्यात नाही. पक्ष्यांचं सोडा; पण राजकीय पक्षांना मात्र भूकंपाचा अंदाज आधीच करता येतो. हे भूकंप राजकीय असतात.

आताही येत्या आठवडाभरात मोठे भूकंप होणार आहेत, असं ऐकून आहोत. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी तसं सांगितलंय. शिवसेनापक्षप्रमुखांनी त्याला दुजोरा दिलाय. इकडे “मुलं पळवणारी टोळी आलीय,’ असे ट्विट केले जातायत. कोणाची कुणाबरोबर कधी मीटिंग ठरलीय, याच्या बातम्या येतायत. ही सगळी भूकंपाचीच लक्षणं. इनकमिंग फ्री असण्याचे हे दिवस सोशलवीर आउटगोइंग फ्री मिळाल्यासारखे एन्जॉय करताहेत. पण खरं सांगायचं झालं, तर हे काही फारसं अनपेक्षित नाही. प्रत्येक निवडणुकीच्या आधी हे होतंच.

राजकीय भूकंपाचे अंदाज वर्तवायला फार मोठं कौशल्य लागतं आणि राजकारणातल्या मुरब्बी माणसांनाच भाकितं करता येतात, अशी धारणा असण्याचे दिवस केव्हाच इतिहासजमा झाले. आता हातात स्मार्टफोन असणारा कोणताही सामान्य माणूस अशी भाकितं वर्तवू शकतो. डाटाही स्वस्त आहे आणि वेळही मोकळा आहे. चला, थोडे दिवस तरी काम मिळालं!

एकीकडं अशा प्रकारचे राजकीय भूकंप घडून घराघरात फूट पडत असताना, दुसरीकडं सभांच्या मंचांवरही भूकंप होतायत. आरोप-प्रत्यारोपांना आताशी कुठं सुरुवात होतेय. अजून बरंच काही आपल्याला ऐकायचं, पाहायचं आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर सरहद्दीच्या बाहेर जेवढे स्फोट झाले नसतील, तेवढे सरहद्दीच्या आत झाले. आता पुढे काय, हे जाणून घेण्याची इच्छा फारशी कुणाकडे दिसत नाही आणि सांगणंही कुणाला महत्त्वाचं वाटत नाही.

परंतु या स्फोटक आणि भूकंपप्रवण वातावरणात खरा धमाका बुधवारी झालाय. ज्या मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याची मागणी भारताकडून अनेक वर्षांपासून होतेय, तो ठराव संयुक्‍त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मंजूर होऊ शकला नाही. पुलवामाच्या हल्ल्यानंतर भारताला जाहीरपणे पाठिंबा व्यक्‍त करणारा चीन सुरक्षा परिषदेत नेमकी उलट भूमिका घेईल, याचा अंदाज राजकीय भूकंपाचे अंदाज वर्तविण्यात गर्क असणाऱ्यांना बांधताच आलाच नाही.

चीननं ऐनवेळी नकाराधिकार वापरून भारताला एका अर्थी फसवलं, असंच म्हणता येईल. कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद मान्य नाही, अशी भूमिका आधी घ्यायची आणि नंतर दहशतवादाचं वर्गीकरण करून “हीच आमची भूमिका पहिल्यापासून होती,’ असं सांगायचं, हा खेळ बडी राष्ट्रं नेहमी खेळत आली. चीन तर या खेळात पहिल्यापासूनच माहीर मानला गेलाय.

खरं तर आता “चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका,’ अशी आवाहनं चायना मेड मोबाइलवरून करण्याचे दिवस. परंतु मोबाइलसुद्धा आता इलेक्‍शन ड्यूटीत व्यस्त आहेत. चिनी वस्तूंची यादी करायला कार्यकर्त्यांना सवड नाही. मे महिन्यात कुणाचं सरकार, हेच महत्त्वाचं! अर्थात सरकारं बदलली, तरी धोरणं बदलली नाहीत. आतासुद्धा चीनवरून ओंगळ टीकाटिप्पणीच सुरू झालीय. त्यावर टाळ्या पिटणाऱ्यांच्या दृष्टीनंही “किसकी सरकार,’ हाच प्रश्‍न महत्त्वाचा! एकुणात, चीनचा विषय सोयीचा नाही… भूकंपावर बोलू काही!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)