टिपण : दृष्टिक्षेपात आजवरच्या 16 निवडणुका

-शेखर कानेटकर

लोकसभेच्या सतराव्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीचे वारे आधीच वाहू लागले होते आता प्रचाराची रणधुमाळी अधिक जोरदारपणे सुरू होईल. या पार्श्‍वभूमीवर स्वातंत्र्यानंतर झालेल्या सोळा निवडणुकांवर दृष्टिक्षेप टाकणे योग्य व उत्सुकतेचे ठरावे.

सोळाव्या लोकसभेची निवडणूक 6 मार्च रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी घोषित केली होती. ती 7 एप्रिल ते 12 मे या काळात तब्बल 9 टप्प्यात झाली. 42 दिवस चाललेली ही निवडणूक प्रक्रिया देशाच्या निवडणूक इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चालली होती. 17 व्या निवडणुकीची प्रक्रिया 7 टप्प्यातच होत आहे. 2014 च्या निवडणुकीची मतमोजणी 16 मे रोजी झाली होती.

2014 च्या निवडणुकीसाठी 81 कोटी 45 लाख मतदार पात्र होते. त्यातील 42 कोटी 66 लाख 51 हजार 513 पुरुष तर 38 कोटी 79 लाख 11 हजार 330 महिला होत्या.

1952 मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत 17.3 कोटी मतदार होते. ही मतदारसंख्या गेल्या 16 व्या निवडणुकीत 81.5 कोटींवर पोहोचली. म्हणजे 62 वर्षात मतदारसंख्येत सुमारे पाच पट वाढ झाली आहे. यावेळी त्यात भर पडेल ती वेगळीच.

पहिल्या लोकसभेत 489 खासदार होते. 1967 मध्ये ही संख्या 520 झाली. 1996 पासून गेल्या सहा निवडणुकीत ती 543 राहिली आहे. पहिल्या निवडणुकीनंतर महिला मतदारांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत गेली. 1971 मध्ये देशात 13 कोटी महिला मतदार होत्या. ही संख्या 2009 मध्ये 34 कोटी 22 लाखांवर पोहोचली.

गेल्या 2014 मध्ये ही संख्या 38 कोटी 79 लाखांवर पोहोचली. महिला मतदारांच्या संख्येप्रमाणेच महिला खासदारांची संख्याही उत्तरोत्तर वाढत गेलेली दिसते. पहिल्या 1952 च्या निवडणुकीत 20 महिला खासदार होत्या. तर सोळाव्या लोकसभेत 63 महिला खासदार निवडून आल्या होत्या. 1972 च्या पहिल्या निवडणुकीत एक हजार 874 उमेदवार 489 जागांसाठी उभे होते. 2014 च्या गेल्या निवडणुकीत ही संख्या 8 हजार 163 (जागा 543) वर जाऊ पोहोचली. सर्वांत कमी उमेदवार (1 हजार 519) 157 च्या दुसऱ्या निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले होते.

आजवरच्या सोळा निवडणुकीत सर्वात जास्त म्हणजे 66.38 टक्‍के मतदान 2014 च्या निवडणुकीत झाले. त्या खालोखाल 63.56 टक्के मतदान 1984 च्या निवडणुकीत झाले. पहिल्या निवडणुकीत अवघ्या 44.87 टक्‍के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. हाच मतदानाचा नीचांक मानावा लागेल. 1989 ते 2009 या कालावधीत झालेल्या सात लोकसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळू न शकल्याने 30 वर्षे आघाडी सरकारांचे राज्य होते.
जवळपास तीस वर्षांनंतर 2014 साली भारतीय जनता पक्षाने 282 जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळविले; परंतु स्वतःला पूर्ण बहुमत मिळूनही भाजपने सर्व मित्रपक्षांना सत्तेत सहभागी करून घेतले.

लोकसभेच्या तीनशेच्या वर जागा जिंकण्याचा मान आजपर्यंत कॉंग्रेस 16 निवडणुकीपैकी 6 वेळा मिळविला. 1984 मध्ये 520 पैकी 404 जागा जिंकून विक्रम केला होता. 1952 (364 जागा), 1957 (371 जागा), 1962 (383 जागा) व 1980 (353 जागा) जिंकून कॉंग्रेसने एकहाती सत्ता काबीज केली होती. 1989 पासून मात्र कॉंग्रेसची घसरणच सुरू झाली. 1999 च्या निवडणुकीत पक्षाने फक्‍त 114 जागा जिंकल्या तर 2014 मध्ये पक्षाला नीचांकी अशा अवघ्या 44 जागाच पदरात पडल्या.

2014 च्या निवडणुकीत 282 जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळविली. कॉंग्रेसखालोखाल सर्वाधिक जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविलेला हा दुसरा पक्ष. 1999 मध्ये भाजपने त्याआधी 182 या सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. आणीबाणीनंतर झालेल्या 1978 च्या लोकसभा निवडणुकीत तेव्हाच्या जनता पक्षाने 295 जागा जिंकून देशातील पहिले कॉंग्रेसेतर सरकार स्थापन केले. पण फाटाफूट झाल्याने ते जेमतेम दीड वर्षच टिकू शकले.

देशात सर्वाधिक मतदार व लोकसभेच्या जागा असलेली पहिली 4 राज्ये अशी- उत्तर प्रदेश (80 जागा), महाराष्ट्र (48 जागा), प. बंगाल (42 जागा), आंध्र (42 जागा). 16 व्या लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात तीन टप्प्यात झाली होती. यंदा ती चार टप्प्यात होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)