लक्षवेधी : मुले पळवणारी टोळी सक्रीय

-अशोक सुतार

महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. विशेषतः कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, जनहितार्थ जारी, असे ट्विटरवर ट्विट करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशावर निशाणा साधला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी भाजपात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर अनेक जणांनी भाजपाला लक्ष्य केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात चर्चा सुरू आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी अहमदनगरची जागा मागण्यात आली होती. मात्र, सुजय विखे पाटील यांनी कॉंग्रेसला हात दाखवून भाजपात प्रवेश केला. यामुळे अहमदनगरमधील वातावरण राजकीयदृष्ट्या मोठे चर्चेचे ठरले आहे.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि महाराष्ट्रात राजकीय उलथापालथीला सुरुवात झाली आहे. कोण कोणत्या पक्षात केव्हा जाईल, याचा नेम नाही; परंतु अनेकजण मनमानी कारभार करून दुसऱ्या पक्षांत जात आहेत तर तेवढेच नवीन लोक पक्षांत येत आहेत. असे असले तरी कोणी कुठे जायचे हे स्वतः इच्छुक उमेदवाराने ठरवायचे आहे. सध्या बाप एका पक्षात तर मुलगा दुसऱ्या पक्षात, असे मतदारसंघ वाटून घेण्याचे फंडे पडू लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे की, सावधान ! मुले पळवणारी टोळी ऐन निवडणुकीत अवतीर्ण झाली आहे. ही टोळी नेमकी कोणाची हे मात्र आव्हाडांनी स्पष्ट केले नसले तरी त्यांचा रोख सत्ताधारी भाजपवर आहे, असे दिसते.

नगर लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीने हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्यास नकार दिल्यानंतर कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटलांनी हा निर्णय घेतला आहे. सुजय यांच्या भाजपा प्रवेशाला विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी विरोध केला होता. दिलीप गांधी आता कोणती भूमिका घेणार, हे यथावकाश समजेलच. दिलीप गांधी यांनी गेली 10 वर्षे नगर लोकसभा मतदारसंघाचे प्रातिनिधित्व केले आहे.

भाजपमधून दिलीप गांधी यांना डावलून सुजय विखे पाटलांना तिकीट देणे भाजपला महाग पडणार आहे. तसेच नगरच्या गांधीवादीनी विखे पाटलांच्या उमेदवारीविरोधात घोषणा देऊन निषेध केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव माजी राज्यसभा सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही गिरीश महाजन यांची भेट घेतली. परंतु, महाजन यांनी याबाबत बोलणे टाळले. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाच्या गळाला लागतील की काय, अशी चर्चा सुरू आहे. नगरमध्ये सुजय यांनी भाजपामध्ये प्रवेश करू नये म्हणून कॉंग्रेसने अनेक प्रयत्न केले. अहमदनगरची जागा सोडावी म्हणून कॉंग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे शब्दही टाकला होता. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेटही घेतली होती. राहुल गांधी यांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क केल्याचे समजते.

इकडे सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेसचे माजी निष्ठावंत (?), माजी आमदार व किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. ते कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव होय. उत्तर सातारा जिल्ह्यातील मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशाने सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. सातारा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून मदन भोसले यांनी धुरा सांभाळली आहे. वाईत राष्ट्रवादीचा आमदार आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यामुळे संधी मिळणे कठीण आहे, त्यामुळे मदन भोसलेंनी भाजपमध्ये जाण्याचा पर्याय निवडला असावा. तसेच मागील काही वर्षांपासून किसन वीर साखर कारखाना आर्थिक अडचणीत असताना या अडचणी सोडविण्यास मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मदत केल्याचे म्हटले जात आहे. भाजपचे मंत्री आता अनेक ठिकाणी आयात उमेदवारांचा शोध घेत असल्याचे दिसत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून खा. उदयनराजे भोसले यांना भाजपमधून निवडणूक लढवण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली होती. परंतु राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी उदयनराजेना निवडणूक लढवण्याचा हिरवा कंदील दिल्यानंतर भाजपने आता माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांच्याशी घरोबा केला आहे. असे प्रयत्न सर्व पक्षांकडून सुरू आहेत. निवडणुका आल्या म्हणजे आयाराम – गयारामांचा सुकाळ असतो. परंतु कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांच्या मुलांना गळाला लावणे म्हणजे भाजपचे कौशल्यच म्हणायचे.

या घटना दिवसेंदिवस वाढत राहतील. नेते म्हणतील, आम्हाला कल्पनाच नव्हती की आमचा मुलगा विरोधी पक्षात कसा गेला आणि कार्यकर्ते म्हणतील की- ही बापलेकाची राजकीय खेळी आहे. असो. कुणीतरी म्हटले आहे की, युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असते. निवडणूक म्हणजे एक युद्धभूमी आहे. त्यामुळे हे घरे फोडण्याचे राजकारण चालणारच. राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी मुले पळवणारी टोळी ऐन निवडणुकीत अवतीर्ण झाली आहे, असे म्हटले ते काही खोटे नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)