अबाऊट टर्न : उत्सव?…

-हिमांशू

आला आला, लोकशाहीचा उत्सव आला. सजून-धजून मतदानकेंद्रावर जाऊन नखाला काळीभोर शाई लावून घेण्याचा उत्सव आला. नातवंडांनी आजोबांना हाताला धरून मतदानाला घेऊन जाण्याचा उत्सव आला. नातवाच्या इच्छेखातर आजोबांनी स्वतःच्या इच्छेला मुरड घालण्याचा उत्सव आला आणि अनेकांच्या इच्छेखातर नातवानं आजोबांना सोशल मीडियावरून गळ घालण्याचा उत्सव आला. उत्सव गळ घालण्याचा आणि गळ टाकण्याचासुद्धा!

वजनदार मासे ज्याच्या गळाला लागले, तो अर्धी शर्यत जिंकला. उत्सव आला इतिहासावरून गणित शिकण्याचा आणि गणितावरून भूगोल मांडण्याचा. त्यासाठी प्रसंगी दूरच्यांना गळामिठी मारण्याचा, प्रसंगी जवळच्यांचा गळा केसानं कापण्याचा उत्सव आला. इस्टेटीची वाटणी करावी, तसं जागावाटप करण्याचा आणि जागा जिंकण्यासाठी इस्टेट फुंकण्याचा उत्सव आला. बरंच काही विसरण्याचा आणि विसरायला लावण्याचा उत्सव आला.

बरंच काही आठवण्याचा आणि आठवण करून देण्याचा उत्सव आला. स्मृती-विस्मृतीच्या लपंडावात, लपलेल्या प्रतिस्पर्ध्याला “इस्टॉप’ करण्याचा आणि बेसावध प्रतिस्पर्ध्याला धपका घालण्याचा उत्सव आला. तात्पुरती भातुकली मांडून वर्षानुवर्ष केलेला संसार विसरण्याचा उत्सव आला. धूर सहन होत नाही म्हणून चूलच मोडण्याचा उत्सव आला. उत्सव आला शस्त्रं परजण्याचा आणि क्षेपणास्त्रांचा साठा करण्याचा. उत्सव आला “गाइडेड’ मानवी क्षेपणास्त्रं वापरून घेण्याचा अन्‌ निकामी करण्याचा. उत्सव आला द्वेषाच्या कानशीनं जिभेला धार करण्याचा आणि जीभ घसरण्याचासुद्धा!

जगात सर्वांत मोठी अन्‌ सर्वांत परिपक्व लोकशाही नांदतेय इथं. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य! 543 जण निवडायचेत आपल्याला; पण चर्चा दोघांचीच व्हायला हवी. सामूहिक भावना जाणवायलाच नको. कुठल्याच पातळीवर. इतके चेहरे लक्षात कोण ठेवणार? चेहरे दोनच हवेत – एकास एक!

आपल्यातलेही समूह ढिसूळ करून एकेकटे खेळू सोशल मीडियावर! यंदा निर्बंध येणारैत म्हणे पोस्ट टाकण्यावर! म्हणजे काय, तर प्रत्येकानं सोशल मीडियावर टाकलेल्या जाहिरातींचा हिशोब द्यायचा! पण चुकल्यावर शिक्षा काय देणार? तरतूद काय आहे शिक्षेची? कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांमधूनसुद्धा पळवाटा काढणं जिथं सवयीचं झालंय सगळ्यांना, तिथं फेक अकाउंट काढणं कितीसं अवघड असणार! आमची मतं रशियातून ठरवली जाणार, अशीही बातमी होती काही दिवसांपूर्वी!

आम्ही इतके दूधखुळे आहोत की काय! मनात आणलं तर रशियाची निवडणूक ताब्यात घेऊ इथं बसून! सगळ्यात स्वस्त डाटा असलेल्या देशाचे नागरिक आहोत आम्ही. प्रॅक्‍टिसला काही महत्त्व आहे की नाही? आता पाहाच, या उत्सवाच्या निमित्तानं स्वातंत्र्यापासूनच्या, नव्हे त्याच्याही आधीपासूनच्या इतिहासाचा तळ कसा ढवळून काढतो आम्ही. पिऊद्या ते गढूळ पाणी सगळ्यांना. लोकशाहीच्या उत्सवातलं तीर्थ आहे ते! तीर्थप्रसादाला सर्वांनी यायचं बरं का!

हो, या साऱ्याला आम्ही उत्सवच म्हणणार आणि… यालाच उत्सव म्हणणार! ढाबे, बार हाउसफुल करणार. मेजवान्या झोडणार. पडतंय ते पदरात पाडून घेणार. आदेश आले की एसी गाडीतून उतरून, मिनरल वॉटरची बाटली हातात घेऊन पदयात्रेच्या नावाखाली चार पावलं चालणार. आदेश आले की रोड-शो करून ट्रॅफिक अडवणार. आदेश आले की दमदाट्या करणार, आदेश आले की हाणामाऱ्या करणार. यालाच आम्ही उत्सव म्हणणार; कारण अशी संधी लवकर नाही मिळणार!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)