श्रध्दांजली : बंडखोर लालनताई

-मुकुंद फडके

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजनसृष्टी एका बंडखोर कलाकाराला मुकली आहे. जरी त्या गेली काही वर्षे नाटक किंवा चित्रपटात सक्रिय नव्हत्या तरी या क्षेत्रातील त्यांचे अस्तित्व कायम जाणवणारे होते.लालनताईंनी आपल्या कारकीर्दीत अनेक चित्रपट आणि नाटके केली. पण ज्या एका नाटकामुळे त्यांना बंडखोर हे विशेषण मिळाले ते नाटक म्हणजे सखाराम बाईंडर.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या नाटकात त्यांनी साकारलेली चंपाची भूमिका आव्हानात्मक होती. लालनताईंचे पती आणि या नाटकाचे दिग्दर्शक कमलाकर सारंग यांनी आपल्या “बाईंडरचे दिवस’ या पुस्तकात या नाटकाचा आणि त्यानंतर झालेल्या वादविवादाचा आढावा घेतला आहे. जरी चंपाच्या भूमिकेने लालनताईंना नवीन ओळख दिली तरी त्यांना प्रचंड मनस्तापही सहन करावा लागला होता. नाटकाचे काही प्रयोग झाले आणि हे नाटक अश्‍लील आहे अशी ओरड झाली.

नाटकावर बंदी आली. या काळात लालनताईंना धमक्‍यांचे फोन यायचे. फोन करणारे अश्‍लिल बोलायचे आणि शिव्याही द्यायचे. पण सारंग दांपत्याने हे सारे सहन केले आणि न्यायालयीन लढा दिला. सहा महिन्यांनंतर मोठ्या कायदेशीर लढाईनंतर उच्च न्यायालयाने सखाराम बाईंडरची निर्दोष सुटका केली आणि नंतर या नाटकाने मागे वळून पाहिलेच नाही.

ज्या काळात तुळशी वृंदावनाभोवती फिरणारी कौटुंबिक नाटके धोधो चालत होती त्या काळात लालनताईंनी सखाराम बाईंडरसारख्या नाटकाच्या माध्यमातून प्रस्थापितांना धक्का दिला होता. या नाटकाने दिलेल्या प्रचंड लोकप्रियतेमुळे नंतर रथचक्र, कमला, गिधाडे, जंगली कबुतर, खोल खोल पाणी, घरटे आपुले छान, बेबी, सूर्यास्त, कालचक्र अशी अनेक नाटके लालनताईंनी केली.

सामना, हा खेळ सावल्यांचा आदी चित्रपट आणि रथचक्र ही हिंदी मालिकाही त्यांनी केली. तरीही “बाईंडरची चंपा’ हीच त्यांची ओळख राहिली. नंतर अनेक कलाकारांच्या जोड्यांनी हे नाटक केले.पण निळू फुले आणि लालन सारंग या जोडीची उंची कोणालाही गाठता आली नाही. रंगभूमी आणि चित्रपटापासून दूर गेल्यानंतर त्यांनी आपल्यातील वेगळा कलाकार बाहेर काढून स्वत:ला हॉटेल व्यावसायिक म्हणून यशस्वी करुन दाखवले.

लालनताईंना स्वयंपाक करण्याची पहिल्यापासून आवड होती. त्याचा फायदा त्यांना या नवीन क्षेत्रात यशस्वी होताना झाला. हे सर्व करताना त्यांनी आपल्यातील लेखिकाही समोर आणली. नाटकांमागील नाट्य, मी आणि माझ्या भूमिका, जगले जशी, बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती या त्यांच्या पुस्तकांनाही रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आपल्या अभिनय प्रवासाचा मागोवा घेणारा मी आणि माझ्या भूमिका हा एकपात्री कार्यक्रमही त्यांनी सादर केला होता.

कणकवली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमानही त्यांना मिळाला होता आणि आपल्या अध्यक्षीय भाषणातही त्यांनी मराठी रंगभूमीविषयी परखड मते मांडली होती.एक गृहिणी, बंडखोर कलाकार, उत्तम सुगरण आणि त्यामुळे झालेली यशस्वी हॉटेल व्यावसायिक आणि लोकप्रिय लेखिका हा लालनताईंचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. अशा या मनस्वी महिलेला मनापासून श्रध्दांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)