विविधा – अमृताहुनी गोड गळा : माणिक वर्मा

-माधव विव्दांस 

माणिक वर्मा अर्थात पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म सोळा मे 1926 रोजी पुणे येथे झाला तर निधन दहा नोव्हेंबर 1996 रोजी मुंबई येथे झाले. त्या हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीत या संगीतप्रकारांत गायन करणाऱ्या मराठी गायिका होत्या. त्या हिंदुस्तानी संगीतातील किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत.

किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी कंठसंगीत शिकल्या, तसेच आझम हुसेन खान दिलरंग व आग्रा घराण्याचे जगन्नाथबुवा पुरोहित अर्थात गुणीदास महाराज यांच्याकडून त्यांनी आणखी प्रशिक्षण घेतले. गायिका म्हणून मोठे वलय असूनही माणिक वर्मा हे अत्यंत साध्या मनाचे आतला कप्पा नसलेले साधे व्यक्तिमत्व होते. प्रसिद्धी मिळाल्यावर आपण कोणी तरी आहोत ही कल्पना त्यांच्या मनाला कधीही शिवली नाही.

विख्यात गीतकार ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणातील काही गाणीही माणिक वर्मा यांचे नावावर आहेत. पुणे आकाशवाणी केंद्रावरून वर्ष 1955 मध्ये प्रसारित झालेल्या या साप्ताहिक संगीत कार्यक्रमात त्यांच्यासह सुधीर फडके, बबनराव नावडीकर, योगिनी जोगळेकर इत्यादी गायकांचा सहभाग होता. माणिकताईनी जवळ जवळ 100 चे वर गाणी गायली. त्यात जास्त करून भक्ती गीते,भावगीते, नाट्यगीते, शास्त्रीय गायन यांचा समावेश आहे.

माणिकताईंची भक्तिगीते श्रोत्यांना खूप भावली संत नामदेवांचे “अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ हे बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेली भीमपलास रागातील संतवाणी आजही सर्वांच्या ओठावर आहे. “अनंता अंत नको पाहू’ ही परमेश्वराला घातलेली साद परमेश्वराला नक्कीच पोचली असेल. हे गीत अण्णा जोशी यांनी रचले तर नीलकंठ अभ्यंकर यांचे त्यांना संगीत होते.

“इथेच आणि या बांधावर’ हे कवी सुधांशु यांचे विठ्ठल शिंदे यांनी संगीतबध्द केलेले भावगीत त्यांनी भावपूर्णरोत्या गायले होते. “चांदण्या रात्रीतले स्वप्न ते विसरून जा’ हे शांता शेळके यांचे विरह गीत वसंत पवार यांनी संगीतबद्ध केले होते व माणिकताईंनी सुरेल आवाजात गायले. “मला मदन भासे हा, मोही मना’ हे कृष्णाजी खाडिलकर यांचे गोविंदराव टेंबे यांनी संगीत दिलेले नाट्यगीतंही त्यांनी गायले. माणिकताईंना अभिवादन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)