चर्चा : ‘अब की बार’ कोण?

-जयेश राणे

लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्या आहेत. सर्वच पक्षांनी लोकसभेसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे ‘अबकी बार’ कोण येणार? म्हणजेच ‘अबकी बार’ कोणाचा बार वाजणार? ‘अबकी बार’ कोणाचा बार फुसका ठरणार ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘अबकी बार’ जनता ज्यांच्या जहाजाच्या शिडांना बळ देणार नाही, त्यांचे जहाज धक्क्‌याला लागणार. ‘अबकी बार’ राजकीय रणधुमाळीची तीव्रता किती असणार? ‘अबकी बार’ येणारे सरकार जनहितासाठी काय करणार? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे ‘अबकी बार’ 23 मे च्या निकालातून मिळणार आहेत.

भारतीय लोकशाही जगात सर्वात मानाची आहे. तिचा निवडणुकीच्या दृष्टीने विचार करता ग्रामपंचायत ते लोकसभा यांमध्ये येणाऱ्या विविध टप्प्यांवर निवडणुका होत असतात. मात्र लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुकांची अनेकांना प्रतीक्षा असते. निवडणुकांच्या प्रत्येक टप्प्यावर पक्षीय बलाबल, कोणी कोणासह निवडणूक लढवायची याची गणिते वेगळी असतात. याचा प्रत्येक राजकीय पक्षाला तसा अभ्यास असतोच. निवडणुकांच्या कालावधीची नियोजनबद्धपणे आखणी करून त्या जिंकण्यासाठी काय करता येईल, याचे व्यवस्थापन करण्यात येते. विशेषत: लोकसभा निवडणुकांविषयी बडे राजकीय पक्ष हे सूत्र अवलंबतात. महाराष्ट्राचा विचार करता वर्ष 2019 हे लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुकांचे अर्थात ‘निवडणूक वर्ष’ आहे. त्यामुळे लोकसभेच्या निकालाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मतदारराजा कोणाला झुकते माप देतो ? यावर विधानसभेचीही गणिते अवलंबून असणार आहेत.

शिक्षण मंडळ-विद्यापीठ यांच्या महत्वाच्या परीक्षा कोणत्या कालावधीत असतात. याची माहिती विद्यार्थ्यांना असते. परीक्षेत उज्वल यश संपादन करण्यासाठी काही विद्यार्थी प्रतिदिन अभ्यास करतात, तर ज्यांना एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जायचे आहे ते केवळ परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करतात. राजकारणात मात्र कायम सतर्क राहिले जाते. प्रतिदिन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याप्रमाणे येथेही अभ्यास होत असतो. स्वपक्षाविषयी जनतेच्या मनातील चढ-उतार यांचा कायम वेध घेतला जातो. दांडगा अभ्यास न करता निवडणुकांच्या वेळी मतदारराजाला सामोरे जाणार तरी कसे ? हा ही प्रश्‍न असतोच. त्यामुळे विविध विषय घेऊन जनतेच्या नजरेसमोर कसे टिकून राहिले जाईल. याची कटाक्षाने काळजी घेतली जाते. राजकीय अभ्यासाविना हे शक्‍य नाही. या अभ्यासाचे विशेष महत्व येथे अधोरेखित होते. ज्यांची पाटीकोरी आहे त्यांना मतदारराजासमोर कसे जायचे ? हा प्रश्‍न निवडणूक प्रचारावेळी अधिक सतावेल.

थंडीचा जोर ओसरून उन्हाच्या झळा बसणे चालू झाहे. यामध्ये आता राजकीय वातावरणही चांगलेच तापणार आहे. लक्षवेधी सूत्र असे की, या दरम्यान पाणी टंचाईच्या झळांची तीव्रता किती असणार ? हा प्रश्‍न पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी रणरणत्या उन्हातून अनवाणी अनेक किलोमीटर पायपीट केलेल्या सामान्य जनतेच्या नजरेसमोर रेंगाळत असणार आहे. एकाबाजूला केंद्रीय निवडणुकांची रणधुमाळी तर दुसऱ्या बाजूला काही भागांतील पाणीबाणी. असेही चित्र या कालावधीत असणार आहे. याचे यथोचित वार्तांकन प्रसारमाध्यमांतून वेळोवेळी होईलच.

परीक्षेला जाताना प्रवासातही अनेक परीक्षार्थी अभ्यास करताना दिसतात. हा अभ्यास म्हणजे महत्वाच्या सूत्रांवरून टाकण्यात येणारा ओझरता कटाक्ष असतो, एखादया कठीण वाटत असलेल्या सूत्राची उजळणी केली जाते. तोच भाग निवडणूक प्रचारातही पाहण्यास मिळतो. मतदानपूर्व 48 तास आधी प्रचाराच्या तोफा थंडावतात. मात्र प्रचाराच्या अंतिम दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अधिक जोमाने प्रचार-प्रसार केला जातो. प्रचाराचा हा शेवटचा दिवस म्हणजे मतदारराजाची धावती भेट घेण्याचा आटापिटा असतो. जनहितार्थ प्रश्‍न तडीस लावण्यासाठी यांची नेहमीच अशी धावाधाव का दिसत नाही ? याचे उत्तर मतदारराजाला मिळेल का ?

तिकीट वाटपावरून नाराज झाल्याने डावलले गेल्याच्या सूत्रावरून पक्षांतर, बंडखोरी अर्थात बंडोबांचे बंड, पक्षांतर केले नाही तरी रुसवे-फुगवे. परिणामी त्यातून उदयास येणारी गटबाजी. त्याचा पक्षाने अधिकृतपणे दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारावर होणारा परिणाम. विद्यमान लोकप्रतिनिधीने समाधानकारकपणे जनहितार्थ कामे केली नसतील आणि पक्षाने पुन्हा त्यालाच तिकीट दिले असेल तर त्या उमेदवाराला निवडून आणण्याचे कडवे आव्हान, जनसंपर्क नसलेला चेहरा देणे, अन्य पक्षातून येऊनही येथे आल्यावर तात्काळ उमेदवारी मिळणे, असे प्रश्‍न राजकीय पक्षांसमोर असतात. येथे एक सूत्र ठळकपणे लक्षात येते की, राजकीय पक्षांना सतावणारे प्रश्‍न आणि जनतेला सतावणारे प्रश्‍न हे वेगळ्या स्वरूपाचे आहेत.

दर 5 वर्षांनी येणाऱ्या या निवडणुकांवेळी काही प्रश्‍न वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले असे असतात, तर काही प्रश्‍न गत 5 वर्षात निर्माण झालेले असतात. यंदाच्या निवडणूक सत्रासाठी असलेल्या प्रश्‍नांवर जोरदार वाकयुद्ध चालू आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांना एकमेकांची कार्यपद्धत, निर्णयक्षमता यांच्या संदर्भात अनेक प्रश्‍न असतात. तसेच प्रश्‍न सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासाठी जनतेच्याही मनात घुटमळत असतात. वाकयुद्धाच्या माध्यमातून नेते एकमेकांचा समाचार घेत असतात. अशा पद्धतीचे वाकयुद्ध जनतेनेही त्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सनदशीरपणे लढले पाहिजे. जनतेचा आवाज राजकीय वाकयुद्धाच्या तुलनेत अत्यंत दबका ठरतो. राजकीय वाकयुद्ध कायम चालू असते. निवडणूक काळात त्याची धार अधिक तीव्र होते. या वाकयुद्धाची धार अधिक तीव्र करण्यापेक्षा जनहिताच्या कामांची धार वाढली पाहिजे.

प्रत्येक निवडणुकीची गणिते वेगळी असतात. ही गणिते सुटण्यासाठी प्रचार-प्रसार यांच्या रणधुमाळीच्या माध्यमातून मतदारराजाला साद घालण्यात येते. जनतेने नेमकी कोणाची साद ऐकलेली आहे ? याची धाकधूक निवडणुकांचे निकाल घोषित होईपर्यंत राजकीय पक्षांना असते. पण यांना असलेली धाकधूक ही नागरिकांना प्रतिदिन सोसाव्या लागणाऱ्या प्रश्‍नांच्या तुलनेत नगण्य आहे. कारण ती तात्पुरती असते. निवडणुकांचे निकाल लागल्यावर बहुमत मिळाले तर ठीक अन्यथा त्रिशंकू वगैरे स्थिती निर्माण झाल्यावर सत्तास्थापनेसाठी पुष्कळ काट्याकुथ करण्यात येतो. त्यात वजनदार खाते आणि त्या सह येणारे मंत्रीपद यांच्यासाठी होणारी चुरस. शपथ सोहळ्यावर होणारा खर्च.

मंत्रीमंडळ रचना झाल्यावर पुढील 5 वर्षांसाठी सत्तेत विराजमान होण्यात येते. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी-मतदान-निकाल आणि सत्ता स्थापना अशी ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया अत्यंत खर्चिक असते. तिला सामोरे जाण्याची वेळ आता पुन्हा आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)