विज्ञानविश्‍व : नासाचं तंत्रज्ञान वापरलं जातंय पृथ्वीवर…   

मेघश्री दळवी 

नासा ही अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था सुरू झाली ती अंतराळ प्रवास आणि संबंधित संशोधन करण्यासाठी. गंमत म्हणजे यातलं बरंच संशोधन आपण आज चक्क पृथ्वीवर वापरत आहोत! अर्थात थर्मल फोम किंवा कानाच्या आतले इम्प्लांट्‌स यांचा अंतराळातला आणि पृथ्वीवरचा वापर हे पूर्ण वेगळे ठेवण्याची गरज नाही. नासाच्या तंत्रज्ञानाची अशी सुमारे दोन हजार पेटंट्‌स खाजगी कंपन्या नासाकडून विकत घेऊन अनेकविध उत्पादनांमध्ये वापरतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रॉकेट आणि स्पेस शटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्क्रूला नासाने स्पायरलॉक रचना वापरून दुप्पट ताण सहन करण्याची क्षमता दिली. पुढे 2013 मध्ये याचा वापर गोल्फ क्‍लबमध्ये करण्यात आला. याचा गुरुत्वमध्य अगदी अचूक असल्याने या क्‍लबने मारलेला फटका पूर्ण शक्तीने लागतो. अंतराळप्रवाशांच्या स्पेससूटच्या आत तापमान कायम राखण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या धाग्याचा वापर होतो. नासाचं हे तंत्रज्ञान मग दुसऱ्या एका कंपनीने घेऊन लहान मुलांकरता खास ब्लॅंकेट, पायजमा, खेळाडूंचे कपडे यासाठी वापरलं जात आहे.

अंतराळप्रवासात प्रवाशांच्या खाण्याची सोय करणं, हे मोठं आव्हान असतं. सुरुवातीच्या अंतराळ सफरीत यानात फक्त उपकरणं होती. पण माणसांना घेऊन उड्डाण करायच्या योजना सुरू झाल्या, तेव्हा ही बाब प्रकर्षाने पुढे आली. दुसऱ्या महायुद्धात सैन्याच्या रसदीसाठी फ्रीज ड्रायिंग तंत्रज्ञान वापरायला सुरुवात झाली होती. ताज्या अन्नावर जोरात थंडगार झोत सोडून ते तत्काळ गोठवायचं आणि लगेच निर्वात पिशवीत पॅकबंद करायचं हे तंत्रज्ञान अनेक कंपन्यांनी विकसित केलं होतं. नासाने ते उचललं आणि अंतराळप्रवासासाठी वापरलं. याच तंत्रज्ञानामुळे आज आपण पोहे-उपमा यांच्या कोरड्या मिक्‍समध्ये गरम पाणी घालून ते लगेच खाऊ शकतो. अशीच पाकीटं युद्ध, दुर्घटनाग्रस्त भागात पुरवली जातात.

अंतराळात प्रवाशांचं आरोग्य हा एक महत्त्वाचा प्रश्‍न असतो. त्यासाठी नासाने प्रचंड संशोधन केलेलं आहे. आपल्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी आपण थर्मोमीटर वापरतो. त्याचा शरीराला स्पर्श व्हावा लागतो. पण अंतराळयानात तो असा वापरला तर संसर्ग होण्याची शक्‍यता असते. हे टाळण्यासाठी अवरक्‍त म्हणजे इन्फ्रारेड किरणांचा वापर करण्याची कल्पना पुढे आली. आपल्या कानातील उष्णता असे इन्फ्रारेड थर्मोमीटर दुरूनच मोजू शकतात. आता त्याचा वापर नवजात बालकांसाठी केला जातो. आयसीयूमधल्या बाळांच्या नाजूक स्थितीत इन्फ्रारेड थर्मोमीटरमुळे संसर्गाचा धोका टाळला जातो. रिमोट हीट सेन्सिंगसाठीही हेच तंत्रज्ञान वापरलं जातं.

केवळ अडीच सेमी रुंदीचा हृदयासाठी वापरला जाणारा छोटा व्हेन्ट्रीक्‍युलर पंप हा खास अंतराळवीरांसाठी म्हणून नासाने डॉ. मायकेल डीबेकी यांच्या मदतीने तयार केला. हृदयाचा अतिशय गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांसाठी आज या पंपचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. विशेषत: हृदय प्रत्यारोपणासाठी वाट बघणाऱ्या रुग्णांना नासाचा हा पंप वरदान ठरला आहे. अंतराळवीरांना सोयीचा पडावा म्हणून नासाने आपला आकार राखून ठेवणारा मेमरी फोम विकसित केला. तो आज खुर्च्यांची कुशन्स, गाद्या, उशांमध्ये सर्रास दिसून येतो. छोटा डस्टबस्टर व्हॅक्‍यूम क्‍लीनर आपण आज गाड्या किंवा ऑफिसमध्ये सहज वापरतो. ती कल्पना मुळात निघाली होती ती चांद्रमोहिमांसाठी. चंद्रावरचे नमुने मिळवण्यासाठी म्हणून नासाने पोर्टेबल ड्रिल तयार केले होते. त्यामागचं तंत्रज्ञान घेऊन डस्टबस्टरची निर्मिती झाली. मेंदूच्या शस्त्रक्रियेमध्ये वापरले जाणारे बायपोलर चिमटे, मॅग्नेटिक फ्लूईड स्पीकर, वायरलेस हेडफोन्स, ओरखडे उमटणार नाहीत अशा चष्म्याच्या काचा, मोबाईलमधले चिमुकले कॅमेरे, अगदी आज जोरात असलेल्या क्‍लाऊड कम्प्युटिंगचा उगमदेखील थेट नासाच्या संशोधनापर्यंत जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)