दिल्ली वार्ता एक को मनाये तो, और कोई रूठ जाता हैं…

-वंदना बर्वे

नितीशकुमार आणि रामविलास पासवान आघाडीसाठी कसेबसे राजी झाले, तर इकडे उद्धव ठाकरे यांचं पित्त खवळलायला लागलं. आता युतीसाठी ते राजी झालेत तर अनुप्रिया पटेल कां-कूं करीत आहेत. चंद्राबाबू नायडू यांनी आधीच रामराम ठोकला आहे. एकाची नाराजी दूर होत नाही तोच दुसरा गाल फुगवून बसतो. करावं तर करावं काय? असा प्रश्‍न नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना नसेल का पडला?

वर्ष 1980 मध्ये जितेंद्र आणि रिना रॉय यांचा “आशा’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. “शिशा हो या दिल हो आखिर टूट जाता हैं. एक को मनाओ तो दुजा रूठ जाता हैं’, हे याच चित्रपटातील एक गाणं. भाजपप्रणित रालोआवर हे गाणं सध्या फिट्ट बसतं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांकडून तगडं आव्हान मिळण्याची शक्‍यता असताना रालोआतील घटक पक्ष मात्र भाजपच्या पायाखालची चादर ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा या जोडीला सर्वाधिक मनस्ताप कुणापासून झाला असेल, तर तो शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून. डॉक्‍टराने डोस लिहून दिल्याप्रमाणे सेना नियमितपणे मोदींचा समाचार घेत आहे.

वर्ष 2019 ची लोकसभा निवडणूक तोंडावर येताच रालोआतील घटक पक्षांना वाचा फुटली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या राज्यांना विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी सरकारवर दबाव टाकायला सुरवात केली. सरकार ऐकत नाही म्हणून नायडू यांचा तेलगू देसम पक्ष सरकार आणि रालोआतून बाहेर पडला.

याच काळात, केंद्र सरकारविरुद्ध नाराजीचे वातावरण बळकट होवू लागले. घटक पक्षांना घालविणे हिताचे होणार नाही याची जाणीव भाजपला झाली. यानंतर प्रयत्न सुरू झाले ते घटक पक्षांची नाराजी दूर करण्याचे. यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास आपण तयार आहोत, याची जाणीव भाजपने बिहार आणि महाराष्ट्रात वाटाघाटी करताना करून दिली.

नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दला (जेडीयु)ची डिमांड पूर्ण करताना भाजपला आपल्या हक्काच्या पाच जागा सोडाव्या लागल्यात. हा व्यवहार अगदी कल्पनातीत होता. परंतु, राजकारणात काहीही शाश्वत नसतं हेच खरं आहे. नितीशकुमार यांच्या सर्व अटी मान्य करून भाजपला आघाडी अबाधित ठेवावी लागली.

अन्न प्रक्रिया व पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षापुढेही भाजपला नमते घ्यावे लागेल. पासवान यांच्याशी बोलणी सुरू असतानाच केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा रालोआ सोडून गेले. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची नाराजी दिवसेंदिवस वाढत होती. म्हणून ठाकरे यांच्या सर्व अटी मान्य करून सेनेला शांत केले गेले. मात्र, मोदी-शहा यांच्यामागचे शुक्‍लकाष्ठ काही संपत नाही.

उत्तर प्रदेशातील अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांनी कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका-गांधी वाड्रा यांची भेट घेवून आघाडीबाबत विस्तृत चर्चा केली. अपना दल खूप मोठा पक्ष नसला तरी या पक्षाचं भाजपविरूध्द लढणं परवडण्यासारखं नाही. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही आता मुंबईतील एका जागेची मागणी करीत आहेत. “आम्ही जिंकू शकत नसलो तरी, पराभूत करण्याची आमच्यात ताकद आहे’, अशी खुली धमकी त्यांनी भाजपला दिली आहे.

दिल्लीच्या सिंहासनाचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं म्हटलं जातं. परंतु, 2019 च्या निवडणुकीत हे सूत्र लागू पडणार नाही, असं वाटतं. म्हणूनच, मोदी उत्तर प्रदेशपेक्षा तामिळनाडूवर जास्त भर देत आहेत. तामिळनाडूत लोकसभेच्या 40 जागा आहेत. भाजपने तामिळनाडूत माजी मुख्यमंत्री स्व. जयललीता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाशी आघाडी केली आहे. शिवाय, पश्‍चिम बंगालकडूनही पंतप्रधानांना खूप अपेक्षा आहेत.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या सहा राज्यांमध्ये लोकसभेच्या 220 पेक्षा जास्त जागा आहेत. एक कर्नाटक सोडले तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपचा प्रभाव जवळपास नाही. त्यामुळेच भाजपला तामिळनाडूकडून खूप अपेक्षा आहेत. या राज्यांमध्ये घवघवीत यश मिळाले नाही तर मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनणे अवघड बनू शकते. अशात, आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांची नाराजी उफाळून बाहेर आली आहे.

युपीतील सरकारच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय पटेल यांनी घेतला आहे. खरं म्हणजे, अनुप्रिया पटेल यांची खरी नाराजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आहे. त्यांनी योगी आदित्यनाथ यांची मोदी-शहांकडे वारंवार तक्रार केली. परंतु परिस्थिती काही बदलली नाही. म्हणून त्या नाराज आहेत.

“अनुप्रिया पटेल आरोग्य राज्यमंत्री आहेत. परंतु, युपीतील आरोग्य खात्याच्या कार्यक्रमातही त्यांना बोलाविलं जात नाही’, असा आरोप त्यांचे पती आशिष पटेल यांनी केला आहे. अपना दल फक्‍त नावाचा मित्रपक्ष राहिला आहे. अपना दलाचे दोन खासदार तर आठ आमदार निवडून आले आहेत. आशिष हे विधान परिषदेचे सदस्य आहेत.

लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत अपना दलने भाजपला विजयी बनविण्यासाठी खूप मेहनत घेतली. मात्र, नंतर भाजपचे वागणे बदलले, असे आशिष पटेल म्हणतात. योगी सरकारकडून विविध पदांवर शेकडो वकीलांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या. अपना दलाकडून यासाठी शिफारस करण्यात आली होती. परंतु, अपना दलाची एकही शिफारस मान्य केली गेली नाही. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मित्र पक्षांची नाराजी भाजपला भोवणार काय? हा खरा प्रश्‍न आहे.

शिवसेना महाराष्ट्रात मोठा पक्ष आहेच. मध्यंतरी लोकसभा व विधानसभेत भाजपाचे बळ वाढले असले तरी आता तशी स्थिती नाही. तसेच युती झाली किंवा नाही झाली तरी विरोधी पक्षांनाही निवडणुकीत बळ आजमावण्याची स्थिती असते. राज्यात युतीचे सरकार सत्तेत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसची निर्मिती झाली होती. तेव्हाही विरोधी पक्षांना सत्तेत येण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे युती किंवा आघाडी होण्याने किंवा तुटण्याने इतरांची संधी कमी होत नाही.

एकंदरीत काय तर रालोआ आघाडी कायम रहावी यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे. गेल्या पाच वर्षांत भाजापाने शिवसेनेला अनेकदा चुचकारण्याचा प्रयत्नही केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी हजार कोटींचा भाव असलेला बंगला भाडेत्त्वावर देण्यात आला तसेच त्याचे 14.5 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले. एकीकडे शेतकरी आत्महत्या होऊ नये याबद्दल बोलले जात आहे, सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले.

“मातोश्री’ जवळ तयार होत असलेल्या दुसऱ्या बंगल्याला हवा तेवढा एफएसआय देणे, वांद्रे पूर्व संकुलातून रस्त्याची जोडणी देणे, हे सर्व शिवसेनेला शांत करण्याचेच प्रयत्न होते. मात्र, केंद्र आणि राज्यातील सरकारवर सारखी आगपाखड केल्यानंतर सेनेने ज्या पध्दतीने युतीचा निर्णय घेतला, त्याबाबत अनेकांच्या मनात शंकाकुशंका आहेत. सेनेने अचानक घुमजाव केले आणि याचा सेनेला फटका बसल्याशिवाय राहणार नाही, असे अनेकांना वाटू लागले आहे.

उद्धव ठाकरे यांनी “चौकीदार चोर है,’ असं म्हणत राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळला होता. आता उद्धव ठाकरे चोरांच्या कळपात सामील झाले आहेत, असं म्हणायचं का, असे लोक विचारत आहेत. सेनेचा हा यु-टर्न मतदार आणि शिवसैनिकांना कितपत भावणार, हा प्रश्नच आहे. यापेक्षा शिवसेनेने थोडी अस्मिता दाखवली असती तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना फायदा झाला असता. परंतु, या वाटाघाटीचा फायदा होतो की तोटा हे निकालाअंतीच स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)