कलंदर : ‘नॅनो’अस्त…

-उत्तम पिंगळे

जड पावलांनी हळहळू गाड्यांच्या रंगमंचावरून पिवळीधम्मक नॅनो विंगेत गेली, ती पुन्हा न अवतरण्यासाठीच. आपल्या मनुष्य जीवनात नाही का जीवनातील रंगमंचावरचा प्रवास संपून तो इहलोकात जातो; तशीच ही नॅनो आता काळाच्या पडद्याआड जाणार. ती कार्सच्या पलीकडल्या जगात गेली तेथे नॅनोचे स्वागत फियाट व ऍम्बेसेडर यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फियाट : ये नॅनोबाई ये ये; वाईट वाटून घेऊ नकोस.

ऍम्बेसेडर : एवढ्या लवकर तुला या आमच्या जगात यावे लागेल, असे वाटले नसेल शेवटी ‘त्याची’ इच्छा! काय करणार.

नॅनो : हो खरंच आहे. मला पण मला वाईट याचेच वाटते की, मी तुमच्यासारखी दीर्घायुषी ठरले नाही. अकालीच येथे यावे लागले.

फियाट : हो खरं तुझी निर्मिती तर गरीब व छोट्या मध्यम वर्गासाठी झाली होती. तसेही भारतात हा वर्ग खूप मोठा आहे. मग असे कसे झाले असावे?

ऍम्बेसेडर : अगं आता पर्यावरणाचे नियम कडक झालेत. पूर्वीचं इंजिन हे नियम पेलू शकत नाहीत.

नॅनो : होय तर. मला मुळातच एक लाखाची कार म्हणून आणले होते पण खरोखरची विक्री होईपर्यंत माझी किंमत जवळपास पावणे दोन लाखांपर्यंत गेली. नंतर मला सीएनजीची साथही मिळाली. परंतु वेळोवेळी बदललेले पर्यावरण व सुरक्षा नियम यामुळे माझी किंमत वाढू लागली. इतरही अनेक वाहने थोड्या अधिक किमतीने अनेक सुविधा देऊ लागले आहेत त्यामुळे ही गत झालेली आहे. उलट मला तर वाटत आहे की, मारुती 800 देखील याच वाटेने येईल.

फियाट : हो गं खरंच आहे. तसंही तुला मोटार बाइकच्या जागेवर आणले गेले. पण टाटासाहेबांना हे नाही माहिती की, जो मोटार सायकलवर तीन-चार जणांना घेउन जातो तो तुझ्यामुळे सहा सात जणांना कोंबेल. काही ठिकाणी तुझ्याबाबतीत तसे झालेच.

ऍम्बेसेडर : लोकांना काय गाडी दिसली की, कसेही बसा. त्यात तुझी तब्येत माझ्यासारखी थोडीच आहे?

नॅनो : बरोबर आहे त्यातच अलीकडे माझी निर्यातही पूर्णपणे थांबली. मला दु:ख याचे वाटते की, पूर्ण देशात जानेवारी महिन्यात एकही नॅनो विकली गेली नाही. आता महिनाभराने आमचे उत्पादन अधिकृतपणे पूर्णपणे थांबवले जाईल व एक सर्वात स्वस्त गाडी डोळ्याआड होणार आहे.

फियाट : खरं आहे. आम्ही नाही का इतिहास जमा झालो?

नॅनो : आता असे आहे की, इंधन दर वाढलेले आहेत तसेच रजिस्ट्रेशन व इन्शुरन्सही एवढे वाढले की पुन्हा सामान्यांना परवडत नाहीत. मग पगारदार व्यक्ती अजून कर्ज काढून थोडं वरचे मॉडेल व अधिक चांगल्या सुखसोयी म्हणजे एसी, सेंट्रल लॉक, सेफ्टी फीचर्स यासह घेऊ लागले आहेत. त्यामुळे खर्च वाढला. मग माझ्यापेक्षा थोडी मोठी असलेली वाहने जास्त घेऊ लागले. सर्वच खर्च वाढू लागले, मग माझे उत्पादन थांबणे आवश्‍यक झाले.

फियाट : होय; पण एका वेळची सर्वात स्वस्त गाडी म्हणून तुला बिरुदावली मिळाली, हेही नसे थोडके.

ऍम्बेसेडर : अगदी बरोबर तसे दुःख मानण्याचे काहीच कारण नाही. आता इलेक्‍ट्रिक वाहने आल्यावर किती जणांची गच्छंती होईल. ते सांगता येत नाही. परिवर्तन संसार का नियम है। ये आता येथेच आराम कर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)