दखल : बेभान झालेल्या तरुणाईला लगाम गरजेचा

-विठ्ठल वळसे-पाटील

नुकतीच पुणे जिल्ह्यातील चाकण येथील घटना सोशल मीडियावर टाकलेले स्टेटसवरून एकाचा खून तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोशल मीडियावर अनेक मुले सक्रिय होत असताना दिसत आहेत. यातून एक प्रकारे खुन्नस व बदल्याची भावना वाढीस लागत आहे. अनेक प्रकारचे स्टेटस टाकण्यात तरुणाई पुढे गेलीय असं वाढत चाललेलं भाईगिरीच फॅड हे पालक व भारताचा भविष्यकाळ म्हणून अधिक चिंताजनक आहे. या बेभान झालेल्या तरुणांना आवरण्याची मोठी जबाबदारी पालक-शिक्षक आणि समाजधुरिणांवर आहे.

चाकण येथील प्रकारात मागील वर्षी कॉलेजच्या स्नेहसंमेलनात झालेल्या भांडणाचा राग होता त्यात “भुलों मत बदला अभी बाकी है…’ या स्टेटसने बळी घेतला ज्याने स्टेटस टाकले तो गंभीर तर त्याच्यासोबत गेलेला मात्र प्राणाला मुकला. या गुन्ह्यात आठ जण सहभागी होते. सर्व गुन्हेगार पकडले असले तरी सध्या वाढत चाललेली चंगळवादी प्रवृत्ती पाश्‍चात्य संस्कृतीचा पगडा, कॉलेजातील रॅगिंग, पालकांनी चालवायला दिलेल्या महागड्या गाड्या, वेगवेगळ्या फॅशन, वाढत चाललेला पैसा या सर्व आधुनिकीकरणातून एक नवी संस्कृती जन्माला येत आहे. स्वातंत्र्याचा उपभोग मात्र स्वैराचाराने घेतला जातो यासारखे दुर्दैव नाही. हे “भाईगिरीचे फॅड’ यावर अंकुश बसला नाही, तर भविष्यात मोठी आपत्ती आल्याशिवाय राहणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बदललेली जीवनशैली

सध्या माफक दरात व सहज उपलब्ध होत असलेल्या गरजा जीवनशैली बदलण्यास कारणीभूत आहेत. चांगल्या प्रकारे जगावे, उत्तम जीवनशैली असावी हे खरे तर आनंददायी आहे; परंतु यातून वेगळीच पिलावळ जन्माला येत आहे. या बदलत्या जीवनशैलीत परदेशगमन हे एक महत्त्वाचे वळण झाले आहे. चिल्लर पार्टी करणारी जोडपी पाहून नवी पिढी त्याचे अनुकरण करत आहे. सन 2012 साली पुण्यात 800 विद्यार्थ्यांनी चिल्लर पार्टी केली होती यात 700 पेक्षा अधिक अल्पवयीन मुले होती. हा गट सुद्धा गरिबी मागे टाकत किंवा मौजमजा, बीभत्स, अश्‍लील चाळे, नशा करून अंगप्रदर्शन करत आहे. “एन्जॉय’ नावाच्या संस्कृतीने या तरुणाईवर अजगरी विळखा घातला आहे.

अनधिकृत संघटन अर्थात ग्रुप

अनेक मुले सध्या एकत्रित येऊन अनधिकृतपणे एक ग्रुप स्थापन करत आहेत. मग यातून मुख्य असणारा व पैसा खर्च करू पाहणारा मोरक्‍या हा त्यांचा भाई असतो. सध्या हे फॅड शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त वाढीस लागले आहे. जमिनीचे सोन्यासारखे झालेले भाव, वाढती साखर कारखानदारी यातून प्राप्त होणारी आर्थिक सुबत्ता अशाच ठिकाणी असे नवनवे ग्रुप जन्माला येऊ लागले आहेत. यातून “अर्थप्राप्ती’साठी एकमेकांची डोकी फोडणे, वेळप्रसंगी खून करणे येथपर्यंत हा ग्रुप पॅटर्न पुढे गेलेला आहे. बुद्धीपेक्षा बळाचा वापर हा आता अधिक होऊ लागला आहे. आज या ना त्या कारणाने तरुणाईला भाईगिरीचे वेड लागले आहे.

रस्त्यावर वाढदिवस

सध्या एखादा माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचा जाहीर वाढदिवस साजरा करायचा हे फॅडच होऊन बसले आहे. एखाद्याचा वाढदिवस जवळ आला की, पोस्टर तयार करणे त्यावर अनेक जणांचे फोटो टाकणे आणि भर चौकात लावणे. वाढदिवसाची मजा डीजे लावून साजरी करणे भर रस्त्यात केक कापणे, तोच एकमेकांच्या अंगाला चोळणे, तलवारीने केक कापणे, मध्यरात्री 12 नंतर फटाक्‍यांची आतषबाजी करणे, बीभत्स गाण्यावर नाचणे, खाणे, अव्याहत हॉर्न वाजवत दुचाकीवरून गावभर वेगात भटकणे आणि नशा करणे असा रात्रभर धिंगाणा घालत बसतात अन असा ग्रुप एकदा तयार झाला की, त्यांच्याविरोधात कुणी तक्रार देण्यास धजत नाही आणि हीच बाब पुढे एक गुन्हेगारी जन्माला घेऊन येते.
बुलेट बार

सध्या अपत्य संख्या कमी असल्याने पालक नको ते लाड पुरवितात. त्यात नवनवीन प्रकारच्या गाड्या फिरवण्याची फॅशन झाली आहे. यात बुलेटची क्रेझ काही वेगळीच असते. बुलेट नसेल तर इतर गाड्यांना वेगवेगळे हॉर्नस्‌ बसवणे, सायलेन्सरमधील पुंगळी काढून टाकणे आणि आवाज वाढवणे अशा गाड्यांचे बार काढत जोरजोराने कर्णकर्कश आवाज करत, किंचाळत-घोषणा देत ही तरुणाई भर रस्त्यावर, शाळा, कॉलेज आवारात चकरा मारताना दिसतात. रॅगिंग करणे म्हणजे ग्रुपमधील पोरांचा छंद होऊन गेला आहे.

सोशल मीडियाचा अतिवापर

सध्या पालक दहावी-बारावीच्या मुलांना महागडा मोबाइल घेऊन देतात. मुले त्याचे काय करतात याकडे पालकांचे लक्ष नसते. ही मुले मग फेसबुक, व्हॉटस्‌ऍप, ट्‌विटर वापरतात; स्टेटस ठेवण्यासाठी अनेक भाषेतील ऍपस्‌ मिळवतात. त्यातून असे महाभाग खुन्नस देणारे, प्रेम व्यक्‍त करणारे, राहणीमान याविषयीचे स्टेटस ठेवतात. हाताला काम नसलेली ही तरुणाई खोट्या बडेजावापायी बळी जात आहे. मोबाइलद्वारे मुलींना अश्‍लील संदेश, व्हिडीओज पाठवणे असले प्रकार आता सर्रास होताना दिसत आहे. यातून बदनामी किंवा एकतर्फी प्रेमातून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

राष्ट्रभावना वृद्धिंगत व्हावी

अनेक शाळा-कॉलेजातून मुलांना नैराश्‍य येऊ नये म्हणून समुपदेशन केले जाते. विविध शैक्षणिक, सामाजिक, विज्ञान, अर्थकारण समजवण्यासाठी विविध प्रकल्प, प्रयोग शासन राबवत असते. यात आपत्ती व्यवस्थापनासारखे प्रयोग होतात.पाठ्यपुस्तकातील कवी लेखक भेटीस येणे, त्यांची नावीन्यपूर्ण, माहितीपूर्ण व्याख्याने आदी होताना दिसत आहेत. तरी पण राष्ट्रभावना वाढीस लागली पाहिजे, असे सुचवावेसे वाटते. “हे राष्ट्र माझे आहे. याचा अपमान हा माझा अपमान आहे,’ ही भावना मनात पेरली गेली पाहिजे. युवा पिढीचे आयडॉल हे राष्ट्रपुरुष असावेत. राजकारणी-फिल्मस्टार-क्रिकेटर्स नकोत. कुठेतरी या बेभान तरुणाईला शिक्षक पालक समाजधुरिणांनी लगाम लावण्याची आता वेळ आली आहे, हे नक्‍की!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)