अबाऊट टर्न : मोहिनी

-हिमांशू

क्रेझ नावाच्या संसर्गजन्य आजाराला औषध नाही. म्हणूनच तर त्याला “क्रेझ’ म्हटलं गेलंय. म्हणजे वेड! आपण सोशल लाइफ विसरून सोशल मीडियात अधिकाधिक गुंतून पडू लागलो, तेव्हापासून हे सामूहिक वेडाचे झटके आपल्याला सातत्याने येत आहेत. कधी सेल्फीच्या वेडापायी जीव गमावण्याची तयारी, कधी फेसबुक लाइव्हच्या वेडापायी अपघात, कधी ब्लू व्हेलसारख्या आक्रमक गेमच्या वेडापायी आत्महत्या… आणि बरंच काही!

भलत्या आनंदासाठी आपण जिवाशी खेळ करतो आहोत, हे कळणं जिथं बंद होतं त्या पायरीला वेडच म्हणायला हवं. कधी-कधी असं वाटतं की वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मच्या इशाऱ्यावरच आपण सगळे नाचतो आहोत. भानामती झाल्याप्रमाणं आपण या प्लॅटफॉर्मकडे ओढले जात आहोत. ते आपल्याला काहीही करायला सांगत आहेत आणि आपण त्याबरहुकूम वागत आहोत. एखाद्या जादूगारानं प्रेक्षकांपैकी एखाद्यावर संमोहन करून त्याच्याकडून काही कृती करून घ्याव्यात, तसंच हे वाटतं. नव्या पिढीला आता जादूचे प्रयोग पाहायला मिळणं दुरापास्त झालंय आणि मिळाले तरी ते त्यांना आवडणार नाहीत.

आपण “स्मार्ट’ झाल्याची प्रचंड धुंदी या पिढीला चढली असली, तरी हातातला स्मार्टफोन आणि स्मार्ट गॅजेट्‌सच केवळ “स्मार्ट’ आहेत आणि माणसाच्या इशाऱ्यावर यंत्रांनी नाचण्याचे दिवस लयाला जाऊन यंत्रांच्या इशाऱ्यावर माणसांनी नाचण्याचे दिवस सुरू झालेत, असा भीतीदायक भास व्हावा, अशी एकंदर परिस्थिती आहे.

या दुनियेत वारंवार काही ना काही नवीन येतंय. आता “फेस ऍप’ नावाची भुरळ भल्याभल्यांना पडलीय. भारत हा तरुणांचा देश आहे; कारण तरुण लोकसंख्या आपल्याकडे जगात सर्वाधिक आहे, असं अभिमानानं सांगायला जावं तर तरुणांना आपण म्हातारपणी कसे दिसू हे पाहण्याची अनावर इच्छा या ऍपमुळं होतेय. आपण म्हातारे तर दिसत नाही ना, या भीतीनं ग्रासलेल्यांची संख्या जगात कमी नाही. तरुण दिसण्यासाठी माणसं काय-काय करतात, हेही आपल्याला माहीत आहे. वाढतं वय लपवून तरुण दिसण्यासाठी शेकडो उत्पादनं बाजारात मिळतात आणि त्यांना मागणीही भरपूर असते. पण “फेस ऍप’ने मात्र वेगळेच दिवस तरुणांना दाखवलेत.

या ऍपमध्ये “ओल्ड एज फिल्टर’ नावाचं फीचर आहे. आपल्याकडे अशा फीचरचं कौतुक सेलिब्रिटींना सर्वाधिक असतं. त्यामुळं सिने अभिनेते-अभिनेत्रींपासून लोकप्रिय खेळाडूंपर्यंत सगळ्यांचे म्हातारपणाचे फोटो झळकू लागले. मीडियानं ही “कौतुकं’ आणखी वाढवली. ऍपची आपोआप जाहिरात झाली आणि बघता-बघता तरुण पिढी म्हातारी होऊ लागली. हे कल्पनेतलं म्हातारपण पाहून तरुणांना काय वाटतंय, कुणास ठाऊक? सामान्यतः माणसाला म्हातारपणाची भीती वाटते; परंतु म्हातारपणाची काहीच तजवीज करू न शकलेल्यांनासुद्धा म्हातारं होण्यात गंमत वाटतेय, हीच मोठी गंमत!

आपण म्हातारे झाल्यावर आपली पोरंबाळं आपल्याला आधार देतील का? ती आपल्यासोबत राहतील का? आपल्या सध्याच्या उत्पन्नाचा विचार करता म्हातारपणी सन्मानाने जगता येण्याइतपत कमाई आपण धडधाकट असताना करू शकू का? आपण तरुण असताना दुनियेचे जे रूप पाहतो आहोत, ते आपल्या म्हातारपणापर्यंत किती बदललेलं असेल? असे प्रश्‍न पाडणारं एखादं ऍप खरंतर बाजारात यायला हवं. कारण म्हातारपणी आपण कसे दिसू यापेक्षा कसे असू हे अधिक महत्त्वाचं!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)