स्वागत पुस्तकांचे : बॅरिस्टरचं कार्ट

-माधुरी तळवलकर

बॅरिस्टरचं कार्ट म्हणजे डॉ. हिम्मतराव बावस्कर! अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानासुद्धा आपल्या मुलांनी शिकलंच पाहिजे ही साळुबांची जिद्द पाहून गावकऱ्यांनी त्यांना “बॅरिस्टर’ म्हणायला सुरुवात केली. एका शाळेत ते मुलाच्या प्रवेशासाठी गेले असता त्यांचा खेडवळ वेष पाहून मुख्याध्यापकांनी हिम्मतरावांची “कार्टं’ म्हणून संभावना केली. हेच हिम्मतराव पुढे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉक्‍टर झाले. त्यांनी विंचूदंशावर महत्त्वाचं संशोधन केलं. त्यांचे अनेक महत्त्वाचे लेख परदेशातील प्रतिष्ठित आरोग्यविषयक मासिकांमध्ये प्रकाशित झाले.

शाळेत असल्यापासून जगण्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे कष्ट केले. वीटभट्टीवर, बांधकामावर, हातगाडीवर ओझं वाहून नेण्यावर, हॉटेलात… जिथं जशी मिळतील तशी कामं करीत ते जिद्दीनं शिकत राहिले. हिवाळ्यातील पहाटे पाच वाजताच्या कडक थंडीत मदनशेठकडे ते गुरांसाठी पाण्याचा हौद भरण्यासाठी जात. काम झाल्यावर मिळणाऱ्या गरम जिलेबीच्या चटकेपोटी एकही दिवस ते खाडा करीत नसत. भटक्‍या कुत्र्यांना मदनशेठ गरमगरम भाकरी खायला घालायचे तेव्हा यांच्या पोटात भुकेची आग उठत असे.

सहावीपासून बुलढाण्यात व नंतर पुढं कॉलेजचं शिक्षणही त्यांनी असंच इतरांची कामं करून, मर्जी राखून पूर्ण केलं. रुग्णाविषयीची तळमळ हा त्यांचा मोठा गुण सर्वत्र जाणवतो. डॉक्‍टरांना स्वतःची पर्वा नव्हती. पण पेशंटवर अन्याय होतोय असं दिसलं की ते कडक अवतार धारण करीत. रात्रीअपरात्री अतिशय दुर्गम भागातही साथीची नुसती बातमी कळली तरी ते तातडीनं तिथं पोचत. तिथवर पोहोचलेला हा एकमेव डॉक्‍टर असं तिथले रहिवासी आजही सांगतात. दवाखान्यात आलेला पेशंट कर्मचाऱ्यांनी परस्पर घालवू नये म्हणून रात्री ते बाहेरच कॉट टाकून झोपत. जेवण, स्वयंपाक अर्धवट सोडून पेशंट येताच ताबडतोब त्याच्यावर उपचार सुरू करीत. मात्र, अशा सज्जन डॉक्‍टरलाच पगार द्यायला टाळाटाळ व्हायची.

पुढे अनेक अडचणींवर मात करीत औंधच्या हॉस्पिटलमध्ये काम करीत त्यांनी एमडी पूर्ण केलं. कोकणभागात विंचूदंशानं मृत्यू पावणाऱ्यांचं प्रमाण फार मोठं होतं. त्यावर त्यांनी संशोधन करून लिहिलेला लेख लॅन्सेट या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला. निरनिराळ्या देशातून त्यांच्या संशोधनाच्या साहित्याला मागणी येऊ लागली. इंग्लंडमधे वगैरे त्यांच्या निमंत्रणांवरून बावस्कर डॉक्‍टरांनी आपल्या विशेष संशोधनावर व्याख्याने दिली.

मात्र, एतद्देशीय मासिकांनी, वृत्तपत्रांनी त्यांच्या संशोधनाबाबत उदासीनताच दाखवली. इतकंच नव्हे तर, बऱ्याच हॉस्पिटल्समधून विंचूदंश झालेल्यांना चुकीची लस दिल्यामुळे रुग्ण दगावतात असं लक्षात आल्यावर काही महत्त्वाच्या सूचना टाईप करून त्याच्या झेरॉक्‍स त्यांनी डॉक्‍टरांना वाटण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या डॉक्‍टरांनी यांना वेड्यात काढलं.

यथावकाश विंचूदंशावरील संशोधनामुळे रुग्णांवर इलाज होऊ लागला व त्याचा प्रसार झाला. महाराष्ट्रातील विशेषतः कोकण, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पॉंडेचरी, गुजरात भागातील विंचूदंशानं होणारं मृत्यूचं प्रमाण चाळीस टक्‍क्‍यांवरून एक टक्‍क्‍यापेक्षाही खाली आलं. पुढं सर्पदंश, हृदयरोग, एड्‌स, मेंदूदाह अशा रोगांवरही डॉक्‍टरांनी वेगळा विचार केला. प्रयोग, अनुभव यांतून उपचारपद्धती ठरवली व त्यात यशस्वी ठरले. नसबंदीची ऑपेरशन्सही त्यांनी मोठ्या प्रमाणावर केली.

मॅजेस्टिकने प्रकाशित केलेले “बॅरिस्टरचं कार्टं’ हे पुस्तक वाचत असताना तरुणांनी, खेड्यातील मुलांनी हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे असं सारखं वाटत होतं. डॉक्‍टरी हा केवळ व्यवसाय न मानता हृदयात अथांग करुणा घेऊन स्वतःला व इतरांना प्रगतीपथावर नेणाऱ्या बावस्कर डॉक्‍टरांचा हा जिद्दीचा प्रवास वाचताना आपण विस्मित होतो, विनम्र होतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)