जीवनगाणे : वर्तमानात जगा

-अरुण गोखले

माणसाने कसे जगावे हे सांगताना थोर तत्त्वज्ञ, विचारवंत जे. कृष्णमूर्ती असे सांगतात की- “”डोन्ट थिंक फॉर द पास्ट. डोन्ट थिंक फॉर द फ्युचर… ट्राय टू लिव्ह इन प्रेझेंट अँड प्रेझेंट ओनली.”

वर्तमानात जगा… या शिकवणीचा त्यांना अभिप्रेत असणारा साधा सोपा अर्थ असा आहे की, उगाच गेलेल्या कालच्या बद्दल खंत न करता, निष्कारण उद्या काय आणि कसं होईल याची चिंता न करता तू तुझ्या वाट्याला आलेला जो आज आहे ना, त्या आजचा सर्वार्थाने आनंद घे. त्यात राहा, त्या मध्येच जग.

माणसाचं मन फार विचित्र आहे. ते एकतर भूतकाळातील घडलेल्या नको त्या घटनांची सारखी आठवण काढत बसते आणि त्याच्याच चिंतनात आजचा जगण्याचा आनंद हरवून बसते किंवा उद्याच्या चिंतेने माणूस आज पुढ्यात आलेला सुखाचा घास खात नाही किंवा निखल जीवनानंद घेत नाही.

म्हणून प्रत्येक वेळी या मनालाच एकसारखं समजावून सांगावे लागते की, बाबा रे ! तुझा या क्षणाचा आनंद, सुख, समाधान हे कशात आहे? त्याचा विचार कर. तो क्षण सुखासमाधानाने भरून घे. जो काल तुझ्या हातातून मुठीत धरलेल्या वाळूसारखा गळून, निघून गेला आहे, आता तो काही परत येणार नाही. मग उगाच त्याबद्दल खंत करीत बसण्यात तरी काय अर्थ आहे. बरं तू म्हणशील की, काल जमलं नाही ते उद्या करीन. पण बाबा रे याचाही नीट विचार कर ना. तू खात्रीने सांगू शकतोस का की, तुझा उद्या कसा असणार आहे? नाही ना? मग उद्याची चिंता आज कशाला करायची?

त्यापेक्षा झालेल्याची खंत न करता, उद्याची चिंता न बाळगता तुझ्यासमोर जो आज आहे ना त्याचा तू योग्य असा वापर कर.
जे काल मिळालं नाही ते आज प्रयत्नपूर्वक मिळवं. कळत नकळत जे स्नेहबंधाचे धागे तुटले आहेत, नाजूक झाले आहेत ते पुन्हा नव्याने जोडण्याचा, त्यांची वीण अधिक पक्‍की करण्याचा प्रयत्न कर ना. तुझी आजची कृती तुला भूतकाळातल्या चुका सुधारायला मदत करेल.

तुझं आज उचललेलं विवेकी पाऊलं तुझा उद्या घडवील, तो सुरक्षित आणि सुखाचा करील. याचं भान राखून, जीवनाची क्षणभंगुरता ओळखून, सतर्कतेने तू तुझ्या जीवनात उगवलेल्या या आजच्या दिवसाचा पुरेपूर फायदा करून घे, तो दिवस सत्कारणी लाव.

त्यासाठी तू एकच कर, कालच्या भूतकाळाचा किंवा उद्याच्या भविष्याचाही फारसा विचार न करता साक्षीत्वाने केवळ तुझ्या वर्तमानाशीच प्रामाणिक राहून तोच खऱ्या अर्थाने जगण्याचा प्रयत्न कर.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)