भक्‍ती : तुका आकाशाएवढा…

-माधुरी तळवलकर

आषाढ श्रावण हे महिने म्हणजे साधुसंतांचे स्मरण करण्याचा काळ. चातुर्मासाच्या निमित्ताने संतसूर्य तुकाराम महाराज यांचे स्मरण करूया. तुकारामांचा जन्म शके 1530 सन 1608 या वर्षी इंद्रायणी नदीच्या तीरावर असलेल्या देहू या गावी एका पवित्र अशा कुळात झाला. तुकारामांचे आठवे पूर्वज विश्‍वंभरबाबा हे मोठे भगवद्‌भक्‍त असल्याने त्यांच्या वेळेपासूनच या कुळात विठ्ठलभक्‍ती, नामस्मरण व पंढरीची वारी यांचे माहात्म्य वाढलेले होते.

तुकारामबुवांच्या घरचा व्यवसाय दुकानदारीचा, वाण्याचा असून घरी थोडीफार महाजनकी म्हणजे सावकारीही होती. वारीचा वारसा तुकारामांना अनायासे लाभला. तो त्यांनी जपला. त्याचबरोबर वारकरी पंथात अढळपद प्राप्त केले. वैराग्य म्हणजे अंगाला राख फासून अरण्यात जाणे नव्हे. वैराग्य म्हणजे कृतिशील ज्ञान होय हे तुकोबारायांनी आपल्या वर्तनाने सिद्ध केले. आणि म्हणूनच दुष्काळ पडला असता

स्वतःच्या घरातले धान्याचे कोठार गावकऱ्यांसाठी त्यांनी मोकळे केले. त्यांनी म्हटलेच आहे, “जोडोनिया धन उत्तम वेव्हारे। उदास विचारे वेच करी।।’ संत होणे म्हणजे निष्क्रिय होणे नव्हे हे त्यांनी त्यांच्या अभंगांमधून अनेकदा सांगितले आहे. चांगला व्यवहार करून पैसे जोडा पण अतिमोह धरू नका, असे ते या अभंगातून म्हणतात. त्यांच्या गाथेतून त्यांनी हेच सांगितले की, प्राप्त कर्तव्य करणे म्हणजेच विठ्ठलाची खरी पूजा होय!

तुकोबांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सर्व लोकांशी लोकभाषेतून संवाद साधला. ते प्रतिभावंत कवी होते. अभंगात गेयता इतकी की, आजही त्यांचे अभंग लोकप्रिय आहेत. अभंग या वाङ्‌मयप्रकाराचा त्यांनी विविध अंगांनी उपयोग करून घेतला. मुखात बसतील असे आणि अनुभवाला नेमकेपणाने व्यक्‍त करणारे शब्द वापरून त्यांनी अभंग लिहिले. “पुण्य परउपकार, पाप ते परपीडा।’ किती सोप्या शब्दांत त्यांनी पापपुण्याची व्याख्या केली आहे पाहा. दुसऱ्याला मदत केलीत की तुम्हाला पुण्य लाभेल आणि दुसऱ्याला त्रास दिलात की तुम्हाला पाप लागेल. दुसऱ्यांना दुखवू नका. त्यांना मदत करा. अशा प्रकारे पुण्य जोडा. बाकी कर्मकांडात अडकू नका. कर्मकांड पाळण्याच्या नादात इतरांची मने दुखावतात.

सध्याच्या गुंतागुंतीच्या जगात सतत आपल्यापुढे समस्या उभ्या ठाकतात. काय निर्णय घ्यावा कळत नाही. मनाची द्विधा अवस्था होते. निर्णयक्षमता कशी वाढवावी यासाठी व्यवस्थापकीय अभ्यासक्रमांमधे हल्ली प्रशिक्षण दिले जाते. तुकारामांनी हेच किती सोप्या शब्दांत सांगितले आहे पहा  “सत्य असत्यासी मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमता।’ बहुमत महत्त्वाचे नाही. सत्य काय आहे हेच महत्त्वाचे आहे आणि हे सत्य काय आहे हे कोण सांगणार? …तर तुमचे स्वतःचे मन! तुमचा आतला आवाज प्रामाणिकपणे ऐका. अंतर्मन काय सांगते ते जाणून घ्या. कधीकधी वाटते, आपण जे जे आता शिकतो, ते ते सर्व काही तुकोबांनी आधीच सांगितले.

चार शब्दांत तुकारामांनी नामसाधनाचे मर्म सांगितले आहे. “निष्काम निश्चल, विठ्ठली विश्वास’. आधी मन निष्काम करा, एकाग्र करा; मग विठ्ठलावर पूर्ण विश्वासून नामसंकीर्तन करा. “ठायीच बैसोनि करा एकचित्त’. तुकारामांनी “काळ सारावा चिंतने’ हे महत्त्वाचे सूत्र सांगितले. चिंतनातून नव्या विचारांचा जन्म होतो. त्यातून जगायला आंतरिक बळ येते. आत्मविश्‍वास येतो.

तुकारामांनी उपदेशकाच्या भूमिकेतून लोकांमध्ये जागृती केली. वेळ आल्यास लोकांच्या दुर्गुणांवर तुकारामांनी प्रखर हल्ला चढवला. जनतेला नीतीचा मार्ग दाखवला. तुकारामांनी वेद नुसते पाठ केले नाहीत. त्यांचा अभ्यास केला. त्यांचा अनुभव घेतला व मग तो रसाळ भाषेत इतरांपर्यंत पोचवला. तुकारामांचे ऋण मायमराठी कधीही विसरणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)