दखल : नारी तू ‘नारायणी’ होण्याच्या दिशेने एक पाऊल

-सत्यवान सुरळकर

पारंपरिक नारी आता “नारायणी’ बनण्यासाठी भारताने पाऊल पुढे टाकले आहे. अर्थसंकल्पात महिलांसाठी सुरू केलेल्या योजना व घोषणा यामुळे भारतीय महिला सशक्‍त होण्यास नक्‍कीच दिशा मिळाली आहे. ग्रामीण भागातील महिला आणि शहरी भागातील महिलासांठी एका महिला अर्थमंत्र्यांनी एक दमदार पाऊल उचलले आहे, या योजनांची अंमलबजावणी झाल्यास नारी “नारायणी’ होणारच.

“एखाद्या पक्ष्याला एका पंखाने उडणे शक्‍य नाही’, असे मत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्‍त केले. त्यांचा म्हणण्याचा मतितार्थ असा की, समाजरूपी पक्ष्याचे स्त्री व पुरुष असे दोन पंख आहेत. हे दोन्ही पंख असतील तर समाज उंच भरारी घेईल, समाजाची वेगाने प्रगती होईल.

यापैकी एकजरी पंख (स्त्री) नसेल तर समाजरूपी पक्ष्याला उडणे शक्‍य नाही. समाजाच्या प्रगतीत स्त्रियांचा किती मोलाचा वाटा आहे हे अर्थमंत्र्यांनी एका वाक्‍यात सांगितले. त्याचप्रमाणे समाजरूपी बैलगाडीचे स्त्री व पुरुष ही दोन चाके आहेत. यापैकी एकजरी चाक (स्त्री) तुटले तरी बैलगाडी चालणार नाही. स्त्रियांना सोबत घेऊनच पुरुषांनी पुढील वाटचाल करणे आवश्‍यक आहे. तरच समाज पर्यायाने भारत विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करून विकसित होईल. अर्थमंत्री या एक महिला असल्याने त्यांनी महिलांचे समाजात असणारे महत्त्व याद्वारे अधोरेखित केले आहे.

अर्थमंत्री म्हणाल्या की, महिलांना अंधारात व उघड्यावर विधी करण्यापासून मुक्‍ती दिली जाईल. ग्रामीण भागातील महिलांची ही एक ज्वलंत समस्या आहे. महिलांची होणारी कुचंबणा थांबणेही महत्त्वाचे आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरातच शौचालय बनवले जातील. या अगोदरच खरं तर गावागावांत सरकारने शौचालय बांधायला सुरुवात केली आहे.

मात्र, ग्रामीण भागात दुष्काळाची परिस्थिती असल्याने या शौचालयांचा वापर होत नाही. याकडेही सरकारने लक्ष देऊन महिलांची अडचण दूर करणे अपेक्षित आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत स्त्रियांची धुरापासून सुटका केली आहे. “चूल आणि मूल’ अशी स्त्रियांची पारंपरिक प्रतिमा आहे. चूल पेटविण्यासाठी जंगलातून लाकडे गोळा करून व डोक्‍यावर उचलून घरी आणणे, ती लाकडे चुलीत पेटवून त्यावर स्वयंपाक करणे, धूर डोळ्यात जात असतानाही स्वयंपाक करून मुलाबाळांना घरातील माणसांना जेवण द्यायचे हा स्त्रियांचा ठरलेला दिनक्रम.

अर्थमंत्र्यांनी पुढील काळात स्त्रियांची धुरापासून पूर्णपणे सुटका होईल असे मत व्यक्‍त केल्याने महिलांच्या चेहऱ्यावर निश्‍चितच हासू उमटेल. उज्ज्वला योजनेतून घराघरात गॅस जोडणी केली जाईल. त्याचबरोबर प्रत्येक घरात वीजजोडणीही केली जाईल. याअगोदरही उज्ज्वला योजनेने गॅस स्वयंपाकघरात पोहोचले आहे. या पाच वर्षांत यात आणखी वाढ होऊन प्रत्येक घरात गॅस पोहोचून महिलांना धुरापासून सुटका मिळेल अशी आशा करूया.

“हर घर नल और हर घर जल’ असे म्हणून अर्थमंत्र्यांनी महिलांना पाण्याच्या समस्येला आता तोंड द्यावे लागणार नाही, असेही म्हटले आहे. कारण “जलजीवन मिशन’ अंतर्गत 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व घरात नळजोडणी करून पाणीपुरवठा करण्यात येणार. निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, भारतात पाणीसुरक्षा आणि सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे हे मोदी सरकारचे प्रथम काम आहे. यासाठी सरकारने “जलशक्‍ती मंत्रालया’ची स्थापना केली. त्यामुळे अतिदुर्गम भागातील गावागावांत पाणी पोहोचवले जाईल.

आजही खासकरून महाराष्ट्राचा विचार केला तर अख्खा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघतो. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सर्व विहिरी कोरड्याठाक पडतात. टॅंकरवर भली मोठी रांग लागते. पाणी भरण्यातच महिलांचा पूर्ण दिवस निघून जातो. या सर्व समस्या व त्यावरील योजना व घोषणा अर्थमंत्र्यांनी संसदेत मांडून महिलांच्या खऱ्या समस्यांविषयी हात घातला आहे. पूर्वीपासून महिला संघटित नाहीत. मात्र, स्वयंसहाय्यता गटातील प्रत्येक महिलेला एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार असल्याने यामुळे महिला एकत्रित येण्यास वाव मिळेल. संघटना मजबूत असल्यास महिलांची प्रगती लवकर होईल. या उद्देशाने अर्थमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.

महिला नेतृत्व पुढे आणण्याचेही प्रयत्न केले जाणार आहेत. आज लोकसभेत 78 महिला खासदार आहेत जे आजपर्यंतचे रेकॉर्ड बनले आहे. महिलांच्या हाती कारभार आल्याने व त्यात पुढेही वाढ होणार असल्याने महिलांची उन्नती होणारच आहे. “स्टॅंडअप इंडिया’ योजनेतही महिलांना लाभ मिळणार आहे. मुद्रा, स्टार्टअप यांसारख्या योजनांतही महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्थमंत्रालयांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ करण्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्यामुळे महिला उद्योजक पुढे येण्यास वाव आहे.

“नारी तू नारायणी’ या योजनेचीही अर्थमंत्र्यांनी घोषणा केली. एक समिती नेमून देशाचा विकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांना भागीदार बनवण्याचा सल्ला ही समिती देणार. थोडक्‍यात, आता देशाच्या विकासात पुरुषांबरोबर महिलाही “भागीदार’ असणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)