अबाऊट टर्न : खेकडे

-हिमांशू

खेकड्यांचा उल्लेख बोलीभाषेपासून साहित्यापर्यंत सर्वत्र केला जातो. अर्थात, चवीचा किंवा औषधी गुणांचा हवाला देऊन खेकड्यांचा आहारात समावेश करणारे शौकीन सोडले, तर खेकड्यांबद्दल चांगलं फारसं कुणी बोलत नाही. विक्रीसाठी टोपलीतून आणलेले जिवंत खेकडे एकमेकांना टोपलीबाहेर पडू देत नाहीत. अखेरीस सगळ्यांचाच जीव जातो; त्यामुळं पाय ओढण्याची प्रवृत्ती असलेल्या व्यक्‍तीला खेकड्याची उपमा दिली जाते.

शाहीर अमर शेख यांनी “शुभ्र खेकडे’ नावाची कविता लिहिली होती. त्यात ओहोटीची वेळ साधून बिळातून बाहेर पडणाऱ्या पांढऱ्या खेकड्यांचा उल्लेख होता. हे खेकडे वाळूवर आणि स्वतःभोवती आडवेतिडवे धावतात आणि धावण्याच्या मार्गावर वाळूत त्यांना काहीतरी लिहिलं गेल्याचा भास होतो. मग सगळेच खेकडे स्वतःला थोर साहित्यिक मानू लागतात. नंतर भरतीची एकच लाट येते आणि खेकड्यांचं “साहित्य’ क्षणार्धात पुसलं जातं.

भरतीमुळं घाबरलेले खेकडे मग पुन्हा बिळात शिरतात, असा या कवितेचा आशय होता. यातून शाहिरांना जो संदेश द्यायचा होता, तो त्याकाळी संबंधितांपर्यंत पोहोचला असावा, असं गृहीत धरूया. आज मात्र खेकड्यांना आहारापुरतं किंवा उपमेपुरतं न वापरता थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यामुळं खेकड्यांच्या विश्‍वात खळबळ उडालीय. एकेकाला पकडून शिक्षा देता येत नसल्यामुळं महाराष्ट्रातली सगळी धरणं खेकडेमुक्‍त करण्याची मोहीम सुरू होऊ शकते, या बातमीने खेकडे पुरते हादरलेत.

चिपळूणच्या तिवरे धरणफुटीची “सखोल’ चौकशी करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. आपण कितीही “खोल’ जाऊन लपलो तरी आता आपली धडगत नाही, हे खेकड्यांनी पुरेपूर ओळखलंय. माणसं एकमेकांना खेकड्याची उपमा देत असली तरी माणसासारखी खेकड्यांना क्‍लीन चिट मिळणं शक्‍य नाही. शिवाय, खेकडा हा उभयचर प्राणी असला आणि त्याला पाठीचा कणा नसला, तरी त्यानं स्वतःची तुलना कोणत्याही माणसाशी कधीच केलेली नाही. धरणफुटीच्या घटनेची चौकशी वगैरे होणार असली, तरी निष्कर्ष आधीच निघालेला असल्यामुळे खेकड्यांना पळताभुई थोडी होणार आहे.

आपण एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती सोडून दिली पाहिजे आणि स्वतःच्या आठही पायांचा उपयोग केवळ पळून जाण्यासाठी केला पाहिजे, याची जाणीव खेकड्यांना झालीय. धरण बांधताना आपल्या उपस्थितीची, संख्येची आणि संभाव्य पराक्रमाची दखल घेतली गेली नसली, तरी आपल्यावर नजर ठेवली जात होती, हे डोकं नसलेल्या प्राण्याला कसं कळावं! आता बरोबर सापडले. पाठीवरचं कवच कितीही टणक असलं, तरी आपण पोखरलेल्या धरणापेक्षा ते मऊ करण्याची माणसाची क्षमता खेकडे चांगलीच ओळखून आहेत.

खरं तर धरण पोखरण्याची क्षमता आपल्याकडे आहे, हे खेकड्यांना सुरुवातीला खरंच वाटेना. पण त्यांचंच नाव पुढे आल्यानंतर त्यांनी आपल्या क्षमतेचा गांभीर्यानं विचार सुरू केला. खासदारांनी आमदारांना क्‍लीन चिट दिलीच होती. परंतु नावामागं डॉक्‍टर आणि प्राध्यापक अशी बिरुदं असणाऱ्या मंत्रिमहोदयांनीच जेव्हा “वस्तुस्थिती’ सांगितली, तेव्हा खेकडे हादरले. अधिकारी आणि ग्रामस्थांनी “इनपुट’ दिलं आणि मंत्रिमहोदयांनी खेकड्यांकडे बोट दाखवलं तेव्हा नांगी टाकण्यावाचून खेकड्यांच्या हाती काहीच उरलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)