व्यक्‍तिवेध : नव्याचा शोध घेणारं व्यक्‍तिमत्त्व

-नारायण ढेबे

अनिल गुंजाळ हे अतिशय धडपडणारं आणि हुशार असं व्यक्‍तिमत्त्व. मी शाळेत 8 वी ते 10 वीत असताना ते आम्हाला सायन्स, गणित, भूमिती असे विषय शिकवायचे. त्यांनी सांगितलेल्या मेथड्‌स आजही माझ्या स्मरणात आहेत. संशोधनात्मक, नव्याची आस, अभ्यासूपणा आणि परिस्थितीवर मात करण्याची त्यांची वृत्ती यांमुळे त्यांनी अनेक शिखरे गाठली आहेत.

साधारणतः 1990 ते 93 च्या दरम्यान गुंजाळ सर आम्हाला शिकवण्यासाठी पानशेत येथे होते. एकदा त्यांनी मला बरोबर घेतले आणि म्हणाले, “आपण काही तरी नवीन करू’ मला त्या वेळेला, त्या वयात फार काही समजत नव्हते. पण सर सांगतायत म्हणजे काही तरी विधायक, चांगले असणार हा विश्‍वास मात्र होता.

सुट्टीचा दिवस होता. आम्ही दोघे शाळेच्या एका कोपऱ्यात बसलो आणि रेडिओमध्ये असणारे सेल (बॅटरी) फोडू लागलो. त्या सेलमध्ये रुईचा पाला बारीक करून भरला आणि एका भिंतीवरील घड्याळाला त्याचा करंट लावून दिला. असे एक नवीन “रुईच्या पानावर चालणारे घड्याळ’ हे उपकरण आम्ही बनवले. त्यात माझा तालुका स्तरावर पहिला नंबर आला. त्याचे सर्व श्रेय गुंजाळ सर यांनाच जाते.

पुढे सरांनी शिक्षक पदाचा राजीनामा दिला. परीक्षा देऊन ते शासनाच्या शिक्षण विभागामध्ये अधिकारी झाले. जिल्हा परिषद, एच.एस.सी. बोर्ड, आता परीक्षा परिषद यांसारख्या विभागांमध्ये त्यांनी उत्तम योजना राबवल्या.

उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक दुष्काळी, ग्रामीण, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना कष्ट करावे लागतात. त्यांना कोठेही बाहेर फिरता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी गुंजाळ सरांनी शहरामध्ये या विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचा आठ दिवसांचा खर्च उचलून “मामाच्या गावाची सफर’ घडवून आणली. या खेड्यातील मुलांना शहराबद्दल माहिती व्हावी, त्यांना कोणी नातेवाईक नाहीत अशा विद्यार्थ्यांना मदत व्हावी, नवीन नातेसंबंध निर्माण व्हावेत या उद्देशाने गुंजाळ सर यांनी खटाटोप केला.

त्यांनी कधी स्वतःला एका चौकटीमध्ये बांधून ठेवले नाही. नोकरी, संसार या गोष्टी उत्तमरित्या सांभाळून त्यांनी स्वतःची एक वेगळी वाट निर्माण केली. नेहमी काही तरी नवीन करत राहणे, ते करत असताना आजचा विचार त्यांच्या मनात नेहमी असतो.

समाजातलं वेगळं असेल ते शोधणं आणि ते ताबडतोब आचरणात आणणे हा त्यांचा मूळ स्वभाव. यामुळे त्यांचं कार्य विविध क्षेत्रांत घडत गेले. या कार्यासाठी त्यांच्या पत्नीनेही उत्तम साथ दिली आहे. सौ. गुंजाळ यांची साथ अनिल गुंजाळ यांना मिळणं म्हणजे दुधात साखर असण्यासारखंच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)