स्वागत पुस्तकांचे : प्रकाश पर्व

-ज्योती सरदेसाई

कविराज विजय सातपुते यांचा “प्रकाशपर्व’ हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला.
संग्रहातील पहिली कविता ही संग्रहाच्या शीर्षकाची आहे. कवितेची सुरुवातच अतिशय सुंदर.

चला जातपात टाळू,
गुण्या गोविंदाने राहू
ज्योत क्रांतीची घेऊन,
उजेडाच्या गावा जाऊ

अत्यंत सकारात्मक आणि सच्चा भारतीय नागरिकाच्या मनातले हे शब्द आहेत. काही वेळा ज्ञानदेवांच्या पसायदानाचीही आठवण येते. ज्ञानदेवांना अभिप्रेत असलेली भावनाच येथे आहे. फक्‍त माऊलींनी हे दान विश्‍वात्मक देवाकडे मागितले आणि येथे कवीने प्रत्येक भारतीयाला आवाहन केले आहे. शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो-

मनामनात राऊळ, करा माणसाचा देव
त्याच्यासाठी असू द्या रे,
मनामध्ये भक्‍तीभाव
विचाराचे दान देऊ,
चला एकरूप होऊ
ज्योत क्रांतीची घेऊन,
उजेडाच्या गावा जाऊ

एकंदर पुस्तक वाचताना असे जाणवते की, कवी प्रेम कवितेत म्हणजे शारीरिक आकर्षणात रमणारा नाही. सर्व देशबांधव प्रेमाने एकमेकांशी जोडले जावेत, अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावे. प्रत्येकाला अर्धाच पेला भरलेला मिळत असतो. हे लक्षात घेऊन प्रत्येकाने समाधानाने राहावे. असे कवीला मनापासून वाटते. कवीला आई-वडिलांबद्दल नितांत आदर आहे. तसेच बहिणीवरही त्याचे खूप प्रेम आहे हे जाणवते. सर्वच नात्यांना कवी मानतो. “मैत्री’ कवितेत कवी म्हणतो-

मैत्री नसावे दास्य
मैत्री अवखळ हास्य
काळजाचे काळजावर
अभिजात भाष्य

शाळेच्या आठवणीतही कवी रमून जातो. गणेश, शारदा या बुद्धी देवतांची मनापासून भक्‍ती जाणवते. पण याहीपेक्षा देशात होऊन गेलेले थोर देशभक्‍त या विषयी तो अत्यंत तळमळीने लिहितो. क्रांतिवीर सावरकर, सावित्रीबाई, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, संभाजी महाराज इत्यादींबद्दल नितांत आदर जाणवतो. संविधानाचा गौरव करताना कवी म्हणतो,

भारतीय लोकशाही,
तिचा प्राण संविधान
कायद्याने कलमात,
दिले जागायचे भान

कवीला इथल्या मातीचा आदर आहे. आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. दिवाळी सणाचे वर्णन करताना कवी म्हणतो,

अशी दिवाळी स्नेहवर्धिनी आनंदाची गाथा
सण तेजाचा मनात ठसला लीन जाहला माथा
भाऊबिजेला बहिणीची आठवण येऊन म्हणतो,
दिवस आजचा यमी यमाचा,
बंधु भगिनी दृढ भेटीचा
डोळा चुकवून ये यमाचा,
दिवस आजचा भाऊबीजेचा

हे वाचताना आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही. पण एकंदर कवी आशावादी आहे. तो म्हणतो,

हाती आहे ताकद माझ्या,
दिशा बदलुनी टाकू या
नशिबाचा अवतार रडीचा,
घाम गाळुनी बदलू गं

तर “स्वप्न पाहिले मी’ या कवितेत कवी म्हणतो,

अपयशी तमातून,
वाट सापडे ध्येयाची
मनी पाहिलेले स्वप्न,
जोड त्याला वास्तवाची

कविता अनेक छंद, वृत्त प्रकारात आहेत. पण हे सर्व करताना कवितेचा आत्मा हरवू दिलेला नाही. कविता वाचताना वसंत बापटांनी कवीला “कविराज’ ही दिलेली पदवी योग्यच आहे हे जाणवते.

डॉ. रवींद्र पाठक हे अलीकडेच प्रकाशन व्यवसायात उतरले आहेत. पण त्यांनी पुस्तक इतके देखणे बनवले आहे की त्यात कुठेही नवखेपण जाणवत नाही, नामवंत प्रकाशनात “सूर्यगंध’ प्रकाशनाचे नाव दिमाखात यशस्वीपणे झळकेल यात शंका नाही. प्रकाशक आणि लेखक दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक कवीने संग्रही ठेवावा असाच हा कवितासंग्रह आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)