कलंदर : पडझड…

-उत्तम पिंगळे

परवा प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो तर त्यांनी मला बोलूच दिले नाही. केवळ पावसाने केलेल्या कहरावर तावातावाने बोलत होते. अर्थात त्यांचा रोख पावसाकडे नव्हता. मलाही म्हणाले की, पाऊस नाही म्हणून आधी आरडाओरडा आणि आल्यावर तुमची सज्जता शून्य.

मी त्यांना म्हणालो की, सर अचानक एवढा पाऊस आल्यावर काय होणार आहे? त्यावर त्यांनी सर्व पाढाच वाचला.सर्व पडझडीला आपण जबाबदार आहोत. नेहमीच्या वेळेवर पाऊस यायला हवा तो उशिरा येऊ लागला आहे.

आपण वृक्षतोड केली, कारखाने व वाहने यांच्यामुळे वायू प्रदूषणात वाढ झाली. वातावरणातील ओझोन थर विरळ झाल्याने सूर्याचे घातक किरणही पृथ्वीवर थेट येऊ लागले आहेत. हे सर्व मानवजातीची मोठी हानी करण्यास कारणीभूत होणार आहे. आपण यावर योग्य उपाययोजनांची अंमलबजावणी न करता आपल्यातच मश्‍गुल आहोत.

पावसाळ्यापूर्वी शहरातून होणारी नालेसफाई बरोबर झालेले नाही. शहरे अस्ताव्यस्त वाढत असताना आपण काय करत आहोत? आपल्या मुंबईचेच उदाहरण घ्या. ब्रिटिशकालीन बांधलेली भुयारी गटारे आता पावसाचे प्रचंड पाणी एकाच वेळी पटकन खाली करू शकत नाहीत. ही गटारे बांधली तेव्हा शहर सुटसुटीत होते. प्रचंड अशी मोकळी जागा होती.

पडलेले पाणी जमिनीवर देखील जिरू शकत होते. आता सर्वत्र कॉंक्रिटचे जंगल झाल्यामुळे पाणी जिरण्यास देखील जागा मिळत नाही. मग एवढे प्रचंड पाणी पटकन कसे काय जाणार? नवीन व्यवस्था देखील आपण करू शकत नाही? नुसत्या मेट्रो, बुलेट ट्रेनचा गर्जना करत काही होणार नाही. मुंबईची लोकसंख्या प्रचंड वाढत असताना पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थाही अजून जुनी पुराणी आहे.

भिंती तर दरवर्षी पडत आहेत. याचे मुख्य कारण पावसाचे साठलेले पाणी पटकन वाहून न गेल्याने त्याचा दाब भिंतीवर पडतो. या भिंती बहुतेक वेळा एक कंपाऊंड, हद्द वा थोडे संरक्षण म्हणून बांधलेल्या असतात. तसेच बहुतेक वेळा त्या यथातथाच असतात म्हणजेच जास्त पाया खोदला गेलेला नसतो. त्यांनी पाणी साठवणे अपेक्षित नसते मग काय होणार? कित्येक रोजंदारीवर काम करणारे विशेष: परप्रांतीय या भिंतींच्या शेजारी आपला तात्पुरता संसार थाटतात. आपण साक्षात काळा सोबत राहात आहोत याची त्यांना कल्पनाही नसते. मग झालेल्या अपघातात त्यांचा हकनाक बळी जातो. थातूरमातूर चौकशी व सरकारी मदत एवढे होऊन पुन्हा सारे “ये रे माझ्या मागल्या’ होते.

नुकतेच कोकणातील धरण फुटले तेथे तर सरकारी अधिकाऱ्यांना आधी कल्पना दिली होती की, धरणाला तडे पडत चाललेले आहेत.पण एवढी भ्रष्ट व निर्विकार सरकारी व्यवस्था आपल्याकडे आहे की, कुणालाच काही पडलेले नाही. आता चार दोन लाख वारसांच्या तोंडावर फेकतील, चौकशी समिती नेमतील, मग काय तर सर्व छोट्या मोठ्या धरणांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करतील. अजून राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करावयाचे होते, त्याचा रिपोर्ट आला की नाही ते समजले नाही.

सरकारी मदत देखील शेवटी करदात्यांची असते. सर्वांनी जागरूक राहून कार्य केले तरच निभाव लागेल नाहीतर हळूहळू सर्वनाश अटळ आहे. आपणच आपल्याकडे असलेल्या सर्व व्यवस्था अत्यावस्थ करून टाकलेल्या आहेत आणि वर खापर मात्र पावसावर फोडत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)