विविधा : गुलाबराव महाराज

– गुलाबराव महाराज

गुलाबराव महाराज यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. कै. भालचंद्र खेर यांनी त्यांची वाचकांना प्रथम ओळख दिली. तसेच मराठी विश्‍वकोशानेही त्यांच्या कामाची दखल घेतली. आज गुलाबराव महाराज यांची जयंती. त्यांचा जन्म 6 जुलै 1881 रोजी अमरावतीजवळ माधान येथे झाला.

अर्भकावस्थेतच त्यांना अंधत्व प्राप्त झाले, तरीही बोलू लागल्यावर कानाने ऐकण्याचे व आकलन करण्याची बुद्धी आल्यावर बालपणापासूनच त्यांना आध्यात्माची ओढ लागली. त्यांना ज्ञानेश्‍वरीचा व्यासंग निर्माण झाला. ते स्वतःला ज्ञानेश्‍वरकन्या व कृष्णपत्नी मानून वेगळेपणाने आयुष्य जगले. एवढे अगाध ज्ञान महाराजांनी केव्हा व कसे प्राप्त केले असेल हा विषय आजही अभ्यासाचा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराज आपल्या ओळखीच्या लोकांकडून पुस्तके वाचून घेत असत. त्यांची स्मरणशक्‍ती अफाट होती. त्यामुळे एकदा ऐकताच त्यांच्या स्मरणात राहत असे. त्यांच्यासाठी पुस्तक वाचणारा त्यांचा गुरू होता व गुरूला कधीच रिकाम्या हाताने पाठविले नाही. ज्वारी, गहू, हातातील चांदीचे कडे, घरातील मौल्यवान वस्तू ग्रंथ वाचून दाखविणाऱ्याला गुरुदक्षिणा म्हणून द्यायचे. त्यांना फक्‍त एकाच गोष्टीचा मोह होता तो म्हणजे ज्ञानाचा, पुस्तकाचा जी त्यांनी डोळ्यांनी पाहिली नाहीत पण कानांनी ऐकली.

इंग्रजीतील आधुनिक विज्ञानावरचे धर्म आणि आध्यात्मशास्त्र, संस्कृतातील गायनशास्त्रावरचे, वैद्यक शास्त्रावरचे, विविध कला विषयांचे, वेद-उपनिषदांसह सर्व ग्रंथांचे वाचन त्यांनी वयाच्या 12 ते 16 वर्षांच्या काळातच करून घेतले. प्रपंच किंवा परमार्थ असा एकही विषय राहिला नाही की ज्यावर महाराजांनी आपले स्वतंत्र विचार प्रगट केले नाहीत. त्यांनी सुमारे 125 ग्रंथांची निर्मिती केली, त्यांची छापील पाने सुमारे 6 हजार भरतील. 27 हजार ओव्या आणि 2,500 अभंग तसेच 3 हजार श्‍लोक त्यांच्या नावावर आहेत. तसेच अनेक काव्यात्मक रचनाही त्यांनी केल्या. सूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्‍नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश वगैरे वाङ्‌मय प्रकार त्यांनी हाताळले.

मराठी, हिंदी, ब्रज, संस्कृत भाषेत लेखन केले. मानभाव मत, डार्विन मत, स्पेन्सर, मायर्स यांच्या मतांवर आणि ग्रंथांवर महाराजांनी अभ्यासपूर्ण समीक्षा केली. जगदीशचंद्र बोसांच्या ग्रंथांचीसुद्धा त्यांनी समीक्षा केली. महाराजांजवळ स्वतःच्या अंगावर बंडी आणि धोतर या शिवाय कुठलीच संपत्ती नव्हती. जवळच्या मंडळींकडे त्यांनी जर काही मागितले असेल तर फक्‍तपुस्तकच. 100 वर्षांपूर्वी दोन हजारहून अधिक ग्रंथसंपदा महाराजांकडे होती. ती दुर्मीळ अशी ग्रंथसंपदा आजही अमरावतीत उपलब्ध आहे.

‘ज्ञानेश्‍वरी-गुढार्थदीपिका’ ग्रंथाचे कर्ते वेदांत केसरी बाबाजी महाराज पंडित हे त्यांचे शिष्य. अशा योगी पुरुषाचे 20 सप्टेंबर 1915 रोजी अमरावती येथे निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)