कलंदर : यम मित्र…

– उत्तम पिंगळे

इंद्रदेव शतपावली करत असताना यक्ष येऊन वर्दी देतो, यमराज आपणा भेटीस येत आहेत.

इंद्रदेव : या… या… यमराज मुद्दामच आपणास निरोप पाठवला होता.
यमराज : होय देवेंद्र, पण अचानक एवढ्या तातडीने बोलवण्याचे कारण समजले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंद्रदेव : उडत उडत असे कानावर आले की पूर्वीपेक्षा आपण जरा निवांत असता. आपले कार्यालय सरकारी खाते तर होत नाही ना?
यमराज : म्हणजे मी समजलो नाही?

इंद्रदेव : लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे मरणाऱ्यांची संख्याही वाढत असताना आपण खूप वेळ स्वर्ग लोकांत दिसत असता. खरंतर आपणास वेळ कमी पडत असायला हवा?
यमराज : आपण म्हणता ते अर्थातच खरे आहे देवेंद्र, म्हणजे लोकसंख्या वाढत आहे व मृत्यूही वाढत आहेत. पण तेथे जर माझे कामच नसेल तर मी उगाचच पृथ्वीतलावर कशाला राहू?

इंद्रदेव : मग काय तुम्ही तुमचे काम करण्याकरता एखादा ठेकेदार नेमला आहे काय?
यमराज : तसे नव्हे देवेंद्र, अलीकडे कलियुगात पृथ्वीतलावर विविध प्रकारच्या क्रांत्या झाल्या. अगदी उत्क्रांतीपासून औद्योगिक क्रांती वगैरे. पूर्वी लढाया होत असत व त्यात माणसे मरायची; पण अलीकडे लढाया होत नाहीत.

इंद्रदेव : तेच म्हणतो मी, मग तुम्हाला जास्त काम करावे लागावयास हवे. असे असताना आपण निवांत कसे?
यमराज : औद्योगिक क्रांतीने उत्पादन वाढले; पण मजुरांना पिळणारे मालक आले. सुमार सुरक्षा ठेवून उत्पादन घेऊ लागले. त्यातून पुढे अपघात, प्रदूषण व रोगराई आली. त्यामुळे माझे काम आपोआप दुसरीकडे वर्ग झाले.

इंद्रदेव : होय, पण विज्ञानाने क्रांती केल्याने विविध आजारांवर लस, औषधे आली, वैद्यकशास्त्रात पुढे जास्त आधुनिक शस्त्रक्रिया आल्या व मानवाचे आयुष्य वाढू लागले. म्हणून तर तुमचे काम काही राहिले नाही ना?
यमराज : ते तर आहेच, पण मानवाने निसर्ग कवेत घेण्यास सुरुवात केली. मग काय होणार पूर, अवर्षण, भूकंप, वादळ, वणवे यांनी आपोआपच मानवास धडा देण्यास सुरुवात केली व माझे काम आपोआपच कमी केले.

इंद्रदेव : हो, पण तरीही लोकसंख्या वाढत जात आहे म्हणजे काम वाढणारच ना?
यमराज : बरोबर, पण मानवाच्या प्रगतीबरोबरच येणारी पैशांची हाव, त्यामुळे भ्रष्टाचार आला. मग बांधकामातील विविध भ्रष्टाचार, घरे व इमारती पडणे, धरण व कालवे फुटणे तसेच खराब व खड्डेमय रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू, खाण्याच्या पदार्थातील भेसळ, निकृष्ट प्रतीचे अन्न सेवनाने होणारे आजार, गुन्हेगारी, पटकन श्रीमंत होण्याची हाव, अंमलीपदार्थांचे सेवनामुळे होणारे मृत्यू, दहशतवादामुळे होणारे मृत्यू, वेगवेगळ्या देशांमध्ये सुरू झालेली शस्त्र स्पर्धा व तसेच जगावर नियंत्रण करण्याची स्पर्धा त्यातून होणारे हल्ले यामुळे माझे काम कमी होत आहे.

इंद्रदेव : खरे आहे सर्वोच धर्मगुरूंनी शांतता व मित्रत्वाची शिकवण दिली असताना मनुष्यप्राणी स्वार्थीपणामुळे एकमेकांपासून दूर जात आहे.अगदी घराघरांत संपत्ती, जमीन यावरून होणारे वाद, कलह व पर्यायाने होणारी हाणामारी घराकडून गावात, गावाकडून जिल्ह्यात मग पुढे हळूहळू देशात पसरत चालली आहे.
यमराज : इंद्रदेवा, आपण सर्व जाणतच आहात. माझे काम नैसर्गिकपणे वाढले तरी मला काही प्रश्‍न नाही, पण पृथ्वीतलावर शांतता व एकोपा वाढावा हीच मनापासूनची इच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)