विज्ञानविश्‍व : चंद्रावर स्वारी

– डॉ. मेघश्री दळवी

हा जुलै महिना विज्ञानासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. याच महिन्यात 50 वर्षांपूर्वी माणूस पहिल्यांदा चंद्रावर उतरला. नील आर्मस्ट्रॉंगने 20 जुलै 1969 रोजी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं ते अवघ्या मानवजातीसाठी फार मोठं पाऊल होतं. पृथ्वी सोडून अवकाशातल्या एका गोलावर पोहोचणे, तिथे उतरून आपल्या देशाचा झेंडा रोवणे ही अभूतपूर्व कामगिरी “अपोलो 11’च्या अंतराळवीरांनी केली होती. झेंडा अमेरिकेचा असला तरी त्यामागची भावना अख्ख्या जगाची होती.

माणसाची प्रतिभा, अपार कुतूहल, धाडसी वृत्ती आणि अथक परिश्रम या सगळ्याची आठवण हे सुवर्णमहोत्सवी वर्ष करून देतं आहे. त्यासाठी जुलै महिन्यात जगात सगळीकडे अनेक विशेष कार्यक्रम सादर होणार आहेत. त्या ऐतिहासिक मोहिमेचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी 50 वर्षांपूर्वी संपूर्ण जगाचे डोळे टीव्हीवर खिळले होते. तोच अनुभव पुन्हा एकदा देण्यासाठी नासा 19 जुलैपासून केनेडी स्पेस सेंटर, ह्यूस्टनची अपोलो निशाण कंट्रोल रूम आणि मार्शल स्पेस सेंटर या ठिकाणाहून थेट प्रक्षेपण करणार आहे, मात्र यावेळी नासाच्या वेबसाइटवरून!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताचे “चांद्रयान 2′ हे याच महिन्यात 15 जुलैला उड्डाण करणार आहे, ही आपल्यासाठी विशेष अभिमानाची गोष्ट. अमेरिकेत आणि युरोपमध्ये अनेक ठिकाणी अपोलो मिशनविषयी खास प्रदर्शनं आयोजित केली आहेत. चंद्रावर फिरणारी मून बग्गी काही ठिकाणी बघायला मिळणार आहे. चंद्रावरच्या फोटोंची आणि चित्रांची उत्तम दालनं काही म्युझियम्समध्ये उभारली आहेत, तर काही शहरांत पूर्ण आठवडा मून वीक म्हणून भरगच्च कार्यक्रम आखलेले आहेत. 20 जुलैच्या आसपास चंद्र, अवकाशप्रवास, रॉकेट तंत्रज्ञान, अवकाशसंशोधन यावर कित्येक सेमिनार होणार आहेत.

नॅशनल जिओग्राफिक, डिस्कवरी चॅनल यांनीही या दिवसासाठी खास उपक्रम योजले आहेत. पुढे ऑक्‍टोबरमध्ये “न्यू सायंटिस्ट’ या शास्त्रीय नियतकालिकाने लंडनमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन आयोजित केले आहे. त्यात सात मी. व्यासाचे चंद्राचे मॉडेल उभे करणार आहेत. विविध विवरं आणि इतर खाचखळगे असलेला चंद्राचा हुबेहूब पृष्ठभाग हे तिथले मोठे आकर्षण आहे. चंद्रावर चालण्याचा अनुभव, स्पेससूट जवळून पाहण्याची संधी यासाठी अनेक लहानथोर हजेरी लावणार आहेत.

नासाने हाच मुहूर्त साधत तरुणांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत आणि अनेक विद्यापीठांमधून विद्यार्थी त्यात भाग घेत आहेत. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, इटलीसह अनेक देशांमध्ये या प्रसंगासाठी खास नाणी प्रसारित केली आहेत आणि देशोदेशींचे हौशी संग्राहक ती नाणी हिरीरीने विकत घेत आहेत. अमेरिकेने त्यासाठी विशेष पोस्ट स्टॅम्पदेखील काढले आहेत. या वर्षी या विषयावर पुस्तके, डॉक्‍युमेंटरी, टीव्ही कार्यक्रम हेही खूप झाले. एकूणच जगभर “अपोलो 11′ चांद्रमोहिमेच्या सुवर्णजयंतीनिमित्ताने खूप उत्सवी वातावरण पसरले आहे. हा जुलै महिना खास चंद्राचा महिना ठरणार आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)