अबाऊट टर्न : जशास तसे

-हिमांशू

बहुतांश हिंदी चित्रपटांमधून हिरो कायदा हातात घेतो आणि व्हिलनला जशास तसे उत्तर देतो. व्हिलनची कितीही माणसे मारायची जणू मुभाच त्याला असते. इतकी माणसे मारल्यानंतरसुद्धा पोलीस हिरोला पकडत कसे नाहीत, हा लहानपणी पडणारा प्रश्‍न वय वाढल्यावर पडेनासा होतो.

हिरोने कायदा हातात घेण्याचे मनोमन समर्थन करायला शिकतो आणि “दुष्टांना शिक्षा करायला कायदा अपुरा पडतो,’ हे लॉजिकल उत्तर आपण स्वतःलाच देऊ लागतो. पण तरीसुद्धा “”तुला कुत्रा चावला म्हणून आता तू कुत्र्याला चाव,” असं कुणी सांगितलं तर आपल्याला पटतही नाही आणि पचतसुद्धा नाही. हेच वक्तव्य खुद्द डॉक्‍टरने केले तर काय होईल? तळपायाची आग निश्‍चितच मस्तकाला भिडेल.

राजस्थानातल्या एका सरकारी दवाखान्यात झालेली अशीच एक बाचाबाची आधी सोशल मीडियावर आणि नंतर मीडियावर आली, तेव्हा अनेकांना धक्‍का बसला. एका महिलेला कुत्रा चावला होता आणि उपचार घेण्यासाठी ती दवाखान्यात गेली होती. “”कुत्ते ने आप को काटा तो आप भी कुत्ते को काट लेती,” असं बेजबाबदार वक्तव्य डॉक्‍टरने केल्याचा या महिलेचा आरोप आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेची आणि डॉक्‍टरांची ओपीडीत झालेली बाचाबाची कुणीतरी चित्रित केली आणि हे प्रकरण चव्हाट्यावर आले. हा सोशल मीडियाचा फायदा समजायचा की नाही, हे मात्र समजले नाही.

बातमी मुख्य प्रवाहातल्या ऑनलाइन माध्यमांमध्ये आली तेव्हा कॉमेन्ट बॉक्‍समध्ये अनेकांनी ती “फालतू’ आहे, असं मत नोंदवले. तात्पर्य, सोशल मीडियाचा कितीही गवगवा झाला तरी मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून जबाबदार वार्तांकनाची अपेक्षा अजूनसुद्धा केली जातेय. खरं तर डॉक्‍टर महिलेला जे काही बोलला, तो तिचा “आरोप’ असून, त्या कारणावरून ती भांडताना या क्‍लिपमध्ये दिसते. उलटपक्षी, आपण असं बोललोच नाही, असं डॉक्‍टरांचं म्हणणं आहे आणि महिलेविरुद्ध पोलिसात तक्रार करणार असल्याचंही त्याने सांगितलंय.

महिला सांगते तसं डॉक्‍टर बोलला असेल, तरी त्याचा “टोन’ कसा होता, हे कुणालाच माहीत नाही. पण चौकशी वगैरे होण्यापूर्वीच “डॉक्‍टरांचा अजब सल्ला’ हा मथळा घराघरात पोहोचला. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी समिती वगैरे नेमलीय. या समितीने काय निष्कर्ष काढला आणि कारवाई काय झाली, हे पाहायला कुणीही जाणार नाही. मग या घटनेचा एवढा विचार का करायचा? तर यात जो “जशास तसे’ फॅक्‍टर आहे, तो जाणून घेण्यासाठी! कुत्रा आपल्याला चावला म्हणून आपण कुत्र्याला चावत नाही, हे उदाहरण सगळ्यांनीच असंख्य वेळा ऐकलेले असते. परंतु आजकाल ते कुणाच्याच कसं लक्षात राहत नाही, याचा शोध घेतलाच पाहिजे.

वर दिलेल्या फिल्मी हिरोच्या उदाहरणाप्रमाणे आजकाल देशाच्या अनेक भागांमधून लोकांनीच “निवाडा’ केल्याच्या घटना ऐकायला मिळतायत. कुठल्याशा संशयावरून एखाद्याला झाडाला बांधून मारणे, खांबाला बांधून मारणे अशा बातम्या आपण टीव्हीवर रोज पाहतो आहोत. ज्यांना बेदम मारले जाते, ते गुन्हेगार असतीलही… त्यांना गुन्हे करताना रंगेहाथ पकडलेही असेल. परंतु शिक्षा देण्याचा अधिकार आपल्याला नाही, हे लोक का विसरत चाललेत? आपण कुत्र्याला चावतो आहोत, हे त्यावेळी जाणवत नाही? याचाही विचार होणे आवश्‍यक आहे. विचार व अविचार हे योग्य प्रकारे आपल्याला कळते पण वळत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)