प्रेरणा : डॉ. राणी बंग यांचे सेवाकार्य   

दत्तात्रय आंबुलकर 

महाराष्ट्रातील गडचिरोली या वनवासी वा मागास जिल्ह्यात सेवाभावी डॉ. राणी बंग यांच्या सेवा साम्राज्याचा विस्तार देशाच्या विविध भागांशिवाय अन्य 17 अन्य देशांमध्ये पण झाला आहे. “सर्च’ या आपल्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गडचिरोलीच्या सातत्याने नक्षली प्रभावित असणाऱ्या जंगली भागात डॉ. राणी बंग यांनी मोठ्या आव्हानपर स्थितीत आपल्या वैद्यकसेवा कामाची सुरुवात केली. याकामी त्यांना आपले पती डॉ. अभय बंग यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. डॉ. अभय लहान मुलांवर उपचार करीत तर डॉ. राणी बंग त्यांच्या आई आणि पंचक्रोशीतील महिलांवर. विविध समस्यांना यशस्वीपणे तोंड देत व विभिन्न अडचणींवर मात करीत या बंग डॉक्‍टर दाम्पत्याने जे वैद्यकसेवा कार्य सातत्याने केले त्याचाच परिणाम म्हणजे आज गडचिरोलीच्या धानोरा या न्निबिड जंगलातील मां दंतेश्‍वरी दवाखान्याचे नाव सर्वतोपरी व सर्वमुखी
झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. बंग हे दाम्पत्य अमेरिकेच्या जॉन हापकिन्स विद्यापीठातून वैद्यकीय पदवीधर झालेले. शैक्षणिक आलेख पण चांगला असल्याने त्यांच्यापुढे अमेरिकेतील विविध आकर्षक संधी सहजगत्या उपलब्ध होत्या. मात्र त्यांनी आपले करिअर सुरू करताना अमेरिकेचा नव्हे तर आपल्या स्वदेशाचा विचार केला व त्यातही पण देशातील सर्वाधिक मागास व गरिबांची लोकसंख्या असणाऱ्या सर्वस्वी अनोळखी अशा गडचिरोलीचा विचार करीत डॉ. अभय आणि राणी बंग वनवासींची सेवा करण्याच्या भावनेतून अमेरिकेतून थेट महाराष्ट्राच्या गडचिरोलीत दाखल झाले हा त्यांचा पूर्वेतिहास आहे.

गडचिरोलीच्या धानोरा भागात स्थिरावल्यानंतर डॉ. राणी बंग यांना सर्वात मोठे आव्हान जाणवले ते त्या परिसरात प्रस्थापित अशा मलेरियाचे. या जीवघेण्या रोगाचे अनेकजण बळी पडत असतानाच स्थानिक वनवासी मात्र सर्रास प्रचलित प्रथा व अंधश्रद्धेपोटी झाडपाल्याचाच औषधी उपयोग करीत असल्याने या समस्येने विक्राळ स्वरूप घेतले होते.

या पार्श्‍वभूमीवर स्थानिक रुग्णांना त्यांच्या आजाराचे निदान करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यापूर्वी त्यांच्यात आरोग्यविषयक माहिती देऊन जागृती निर्माण करण्याचे दुहेरी आव्हान डॉ. बंग दाम्पत्यापुढे होते व हे आव्हान त्यांनी स्थानिक मंडळींशी सातत्याने संपर्क ठेवून, त्यांच्याशी संवाद करून व जनजागृतीच्या माध्यमातून पार पाडले हे विशेष. या सुरुवातीच्या कठीण आणि कठोर प्रयत्नांमुळेच या डॉक्‍टरांच्या यशस्वी सेवा उपक्रमांचा पाया रचला गेला असे म्हटल्यास अतिशयोक्‍ती होणार नाही.

धारोऱ्यात आपल्या कामाची यशस्वी सुरुवात केल्यावर डॉ. बंग यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल स्थानिकच नव्हे तर पंचक्रोशीतील वनवासींना पण कुतुहल आणि उत्सुकता वाटू लागली. लोक त्यांच्याकडे जसजसे येऊ लागले तेव्हा त्यांच्यावर उपचार करताना उभयतांना स्थितीच्या गांभीर्याची वाढती जाणीव निर्माण झाली. यातूनच डॉ. राणी बंग यांनी एक छोटेखानी वैद्यकीय सर्वेक्षण केले असता त्यांना गडचिरोली परिसरातील 90 टक्के महिला या स्त्रीसंबंधित रोगांनी ग्रस्त असल्याचे जाणवले व त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील महिलांशी संपर्क साधून त्यांच्यावर उपचार करणे हेच डॉ. राणी बंग यांनी आपले ध्येय ठरविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)