दखल : सुंभ जळाला, तरी पीळ काही जात नाही

-स्वप्निल श्रोत्री

जग हे मैत्री आणि प्रेमावर चालते. एखाद्याचा सतत द्वेष करून किंवा त्याच्याशी वाद घालून तुम्ही काही काळासाठी चर्चेत राहू शकता; परंतु असे करून तुम्ही तुमचेच नुकसान करून घेत असतात. पाकिस्तानने भारताच्या लष्कराशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी देशाची बिघडलेली आर्थिक घडी नीट बसविण्यास प्राधान्य द्यायला पाहिजे.

काही दिवसांपूर्वी ईदनिमित्त पाकिस्तानमधील भारताच्या उच्च आयुक्‍तालयातर्फे करण्यात आलेल्या “ईफ्तार पार्टी’मध्ये दरवर्षीप्रमाणे पाकिस्तानने खोडा घालण्याचा प्रयत्न केला. भारतातर्फे बोलविण्यात आलेल्या पाहुण्यांची विनाकारण चौकशी करणे, सुरक्षेचे कारण पुढे करून वाहनांची तपासणी करणे, पत्रकारांचे कॅमेरे व इतर साहित्य जप्त करणे यांसारखी कृत्ये स्थानिक पाकिस्तानी पोलिसांकडून करण्यात आली.

पाकिस्तानकडून करण्यात आलेली ही आगळीक काही पहिल्यांदाच झालेला प्रकार नाही, दरवर्षी भारताच्या ईफ्तार पार्टीत पाकिस्तान सरकारकडून काही ना काही कारण काढून खोडा घातला जातो; परंतु त्याचबरोबर भारताच्या उच्चायुक्‍तांच्या कार्यालयाची रेकी करणे, त्यांच्या निवासस्थानाची रात्री-अपरात्री घंटी वाजविणे, उच्चायुक्‍तांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा पाठलाग करणे यांसारखी कामे पाकिस्तान सरकारकडून नेहमीच करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय जिनिव्हा करारानुसार दुसऱ्या देशाच्या राजदूतांना किंवा उच्च आयुक्‍तांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक त्रास देणे हा अपराध असून पाकिस्तान ह्या कराराला बांधील आहे.

भारताने पाकिस्तानच्या ह्या कृत्याचा कडक शब्दांत निषेध नोंदविला असला तरीही पाकिस्तानकडून जिनिव्हा कराराचे नेहमीच होणाऱ्या उल्लंघनाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. पाकिस्तानमध्ये सत्तेची 2 केंद्रे आहेत. एक म्हणजे लोकनियुक्‍त सरकार आणि दुसरे पाकिस्तानी लष्कर. ज्या वेळी भारत सरकारकडून पाकिस्तानबरोबर संवादाची प्रक्रिया सुरू करण्यात येते त्यावेळी पाकिस्तानी लष्कराकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन किंवा भारतात दहशतवादी हल्ला करण्यात येतो. पाकिस्तानी नागरिकांमध्ये भारत द्वेषाचे व पाकिस्तान प्रेमाचे डोस पाजून पाकिस्तानी लष्कर पाकिस्तानच्या सत्ताकेंद्रात आपले स्थान राखून आहे; परंतु पाक लष्कराच्या ह्याच खेळीमुळे भारत व पाकिस्तान ह्या दोन राष्ट्रांमधील संवाद खुंटला असून त्याची परिणती पाकच्या अधोगतीत झाली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था गंभीर अशा संकटातून जात आहे. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे अब्जावधीचे कर्ज आहे. सार्वजनिक आरोग्य व रोजगाराची पाकिस्तानात वाणवा आहे. सर्वत्र बकालपणा आणि बेरोजगारी वाढली आहे. त्यातच पाकिस्तानची जगातील प्रतिमा आपल्या दहशतवादी कृत्यांमुळे बदनाम झालेली असल्यामुळे कोणतीही आंतरराष्ट्रीय गुंतवणूक पाकमध्ये येण्यास तयार नाही, अशा अत्यंत संकटग्रस्त परिस्थितीतही पाकिस्तान आपल्या मूळ स्वभावापासून तसूभरही मागे हटण्यास तयार नाही.

भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे एकाचवेळी ब्रिटनच्या अधिपत्यातून मुक्‍त झाली. परंतु, पाकिस्तानची आजची अवस्था काय आहे? आणि भारताची अवस्था काय आहे? भारताशी फक्‍त लष्करी स्पर्धा करून पाकिस्तान कधीही समृद्ध होणार नाही. भारत आज मोठी शस्त्रे विकत घेत आहे तर काही स्वत: बनवित आहे, कारण या शस्त्रांच्या खरेदीसाठी व देखभालीसाठी लागणारा पैसा भारताच्या खिशात आहे. पैशाचे सोंग कधी आणता येत नाही आणि जर आणले तर ते जास्त दिवस टिकत नाही. चीन आज जरी पाकिस्तानला आर्थिक रसद पुरवित असला तरीही त्याने पाकवर लावलेले अवाच्यासव्वा व्याज दुर्लक्षून चालणार नाही.

पाकिस्तानपासून वेगळा झालेला बांगलादेश आज भारताचा सर्वात घनिष्ठ मित्र आहे. वेळोवेळी भारताने बांगलादेशला मदत केली आहे आणि बांगलादेशला याची जाणीव आहे. नेपाळ, भूतान, मालदिव, श्रीलंका, सेशल्स, ब्राझील, दक्षिण आफ्रिका अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.

जग हे मैत्री आणि प्रेमावर चालते, एखाद्याचा सतत द्वेष करून किंवा त्याच्याशी वाद घालून तुम्ही काही काळासाठी चर्चेत राहू शकता; परंतु असे करून तुम्ही तुमचेच नुकसान करून घेत असतात. भारत व पाकिस्तान या दोन राष्ट्रांकडे पाहिल्यावर एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जीना या दोन विचारांच्या लढाईत विजय मात्र महात्मा गांधींचाच झाला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here