संडे स्पेशल : मन करा रे प्रसन्न

-अशोक सुतार

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असे संत तुकारामांनी म्हटले आहे. शरीर प्रसन्न असले तर मनही प्रसन्न राहील. तुमच्या अंतर्बाह्य प्रसन्नतेने इतरांनाही समाधान मिळेल. त्यांनाही उत्साह व आशा येईल. अशा रीतीने जीवनात निष्काम कर्मयोग आणण्यासाठी पराकाष्ठा करण्याची गरज आहे.

सृष्टीत फिरावे, सृष्टीचे दर्शन घ्यावे, सृष्टीला जाणून घ्यावे हेच महत्त्वाचे. सृष्टीमधून सर्व काही शिकावे, सृष्टीचे संगीत अनुभवावे. आकाशाचे दर्शन घ्यावे, आकाशाकडून संयम शिकावा. शरीर, मन, बुद्धी सतेज व निकोप राहतील असे करावे, म्हणजे आपणास समाधान मिळू शकेल.

या धावपळीच्या युगात मानवाने आहारात परिमितता ठेवावी. चंगळवादाला न भुलता संयमित जीवन जगावे. या देहाच्या साधनाने खरा आनंद अनुभवायचा असेल तर वायफळ गोष्टीत वेळ दवडू नका. शक्‍ती खर्च करू नका. आहार, विहारात सर्वत्र प्रमाण राखले पाहिजे. सौंदर्य हे प्रमाणात आहे, जीवन सुंदर करावयाचे असेल तर हे प्रमाण संतुलित राखले पाहिजे. कर्तव्य नीट पार पडावे म्हणून शरीर सतेज, निरोगी हवे. शरीर निरोगी असेल तर मन प्रसन्न होते.

मन प्रसन्न राहण्यासाठी अधून-मधून सृष्टीसौंदर्य पाहावे. त्या विश्‍वनिर्मात्याने सृष्टीमध्ये अपार सौंदर्य ओतले आहे. पहाटेचे वातावरण, सुंदर सूर्योदय, सायंकाळची आकाशातील रंगांची रेलचेल आणि रात्रीचा चंद्र आणि अनंत तारे पाहा, ते समाधान देतील. उदात्ततेची आठवण करून देतील. निसर्गाकडून मानवी मूल्यांची उदात्तता शिकावी आणि आपले जीवन समृद्ध करावे. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते.

कार्लाइल हा तत्त्ववेत्ता म्हणतो, आपले निम्मे तत्त्वज्ञान पोटाच्या स्थितीवर अवलंबून असते. संयमाने जीवनात आनंद येतो. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, संयमाने विकास होतो. झाडाला मुळांनी जमिनीशी बांधून ठेवले आहे म्हणूनच झाड उंच जाते, फुलाफळांनी शोभते.

झाड जर म्हणेल की, ही मुळांची बंधने कशाला? मला वर उडू दे तर ते झाड तरेल का? ते सुकेल, ते बांधलेले आहे म्हणूनच वाढते. नदीला दोन्ही बाजूंनी तीराचे बंधन आहे. म्हणूनच तिला गती आहे, खोली आहे. सतारीला तारा बांधलेल्या असतात. म्हणूनच तर त्या तारा दिव्य संगीत देतात. असा संयमाचा महिमा आहे. संयमाशिवाय सुसंस्कृतता नाही आणि विकासही नाही.

मनाला कधी निराश वाटले तर उत्तुंग पर्वतावर जावे, नदीचा प्रवाह पाहावा, शांत वनात बसावे, सागराच्या उचंबळणाऱ्या लाटा पहाव्यात. भल्या पहाटे घरातून बाहेर पडले तर पहाटवारा अंगाला लागताच सर्व उदासी नाहीशी होईल. चैतन्याचे झरे मनातून वाहतील आणि मन प्रसन्न होईल. सृष्टीचा स्पर्श जीवनदायी असतो. त्यामुळे निंदा, अपमान, अपयश यामुळे मनाला आलेली ग्लानी नाहीशी होईल.

प्रत्येकाने थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवला पाहिजे. त्या वेळात जीवनाचे चिंतन, मनन केले पाहिजे. दिवसातील कामे वेळेवर करण्यासाठी मनाला तयार करा. तुम्ही मनाचे नाही तर मन तुमचे गुलाम झाले पाहिजे, म्हणूनच संयम महत्त्वाचा आहे. जगातील उदात्त ते घ्यावे, क्षुद्र ते टाकोनी द्यावे. म्हणजे जीवनातील प्रवाहाला विकासाची गती मिळेल.

संत ज्ञानेश्‍वर म्हणतात, अरे, योग म्हणजे काय? योग म्हणजे मोजके बोलणे, मोजके चालणे, मोजकी झोप, मोजका आहार. इंद्रियांना असे प्रमाण द्या. म्हणजे त्यांनाही समाधान मिळून जीवनात सुखशांती वाढेल.

संत तुकाराम महाराज म्हणतात, विधीने सेवन, धर्माचे पालन।

म्हणजेच विषयाचे संयमपूर्वक सेवन करा. असे केल्याने धर्मपालन करण्यासारखेच आहे. सर्वत्र मर्यादा पाळा. ज्याला पुरुषोत्तम व्हायचे आहे त्यांनी स्वतःला मर्यादा घालून घेतली पाहिजे, हेच सुखी जीवनाचे सार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)