जीवनगाणे : सामावून घ्या…

-अरुण गोखले

माणसाचं मोठेपण हे जर खरोखर कशात असेल तर ते इतरांना आपल्यात सामावून घेण्यात. मग ते सामावून घेणं घरात असेल, मनात असेल, समाजात असेल, कोठेही आणि कसेही असेल. पण ते सामावून घेणे साधायला हवे.

ही व्यक्‍ती साधण्याची कला साधायला हवी. जीवनात परस्परांना समजून घेऊन, आपलसं करून, सामावून घेण्याला फार महत्त्व आहे. आपला संकुचित “मी’ हा “मी, तू, आम्ही, तुम्ही आणि आपण सारे’ असा व्यापक करण्यासाठी तुमच्याकडे नेमके काय असावे लागते? तर फक्‍त तुमचे विशाल मन.

एकदा का तुम्ही एखाद्याला तुमच्या मनांत जागा करून दिलीत की तुम्हाला त्याला तुमच्या घरात, मनांत, जीवनात किंवा प्रसंगी अगदी समोरच्या ताटातसुद्धा सामावून घेताना कोणतीच अडचण येत नाही.

ह्या संदर्भातली ही एक बोलकी गोष्ट…

अशीच एक रात्र… मध्यरात्रीची वेळ, आकाशात विजा चमकत होत्या. पावसाच्या सरी थांबून थांबून पडत होत्या. दूरवरच्या छोट्याशा झोपडीत एक माणूस राहत होता.

त्या पावसाळी रात्री अचानक कोणीतरी त्या झोपडीच्या दारावर थाप दिली आणि विचारले, “”कोणी आहे का झोपडीत? इथे आत थोडीशी जागा आहे का?”

आतून उत्तर आले. “”इथे फक्‍त एकच माणूस झोपू शकतो… हो, पण दोन माणसे नक्‍कीच बसू शकतात. तू बसायला तयार असशील तर आत ये.”

ती बाहेरची व्यक्‍ती आत आली. आता झोपडीतला पहिला म्हातारा आणि ती दुसरी व्यक्‍ती हे दोघे एकमेकांशी गप्पा करीत बसले.

थोडा वेळ असाच गेला आणि पुन्हा एकदा झोपडीच्या दारावर थाप पडली. प्रश्‍न विचारला गेला, “”आत जागा आहे का? मी पावसात भिजतोय, मला आसरा हवाय.”

आतून आवाज आला, “”इथे फक्‍त दोनच माणसे बसू शकतात… हो, पण तीन माणसे नक्‍कीच उभी राहू शकतील. तुमची उभी राहायची इच्छा असेल तर आत या.”

बाहेरच्या व्यक्‍तीने होकार दिला. दार उघडून त्या पहिल्या म्हाताऱ्याने त्या तिसऱ्या व्यक्‍तीला आत घेतले आणि ती पावसाळी रात्र त्या तिघांनीही आनंदाने स्वत:ला सुरक्षित राखीत आनंदाने उभे राहून काढली.

वास्तविक त्या छोट्याशा झोपडीत जरी छोटीशीच जागा असली तरीसुद्धा त्या तिघांच्याही मनात मोठी जागा होती. त्या छोट्याशा झोपडीत एकमेकांना समजून सामावून घेण्याइतकी त्या तिघांची मनेही विशाल होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)