प्रेरणा लेडी सिंघम : शिल्पा ठोकडे

-दत्तात्रय आंबुलकर

तालुक्‍यात ज्यांचे साधे नाव जरी घेतले तरी परिसरातील वाळुमाफियांना धडकी भरते अशा कार्यक्षम व तडफदार महिला तहसीलदार आहेत शिल्पा ठोकडे. त्यांच्या कामगिरीमुळेच त्यांची ओळख “लेडी सिंघम’ म्हणून झाली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी आपले कामाचा धडाका सुरूच ठेवला असून, अवघ्या तीन महिन्यांत चोरट्या वाहतुकीवर वचक बसवितानाच ठोकडे यांनी एक कोटी साठ लाखांचा शासकीय महसूल सरकारी तिजोरीत जमा केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार असणाऱ्या शिल्पा ठोकडे यांची चारच महिन्यांपूर्वी कवठेमहांकाळ तहसीलदार म्हणून बदली झाली. यापूर्वी सोलापूरमधील आपल्या सव्वा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 3 कोटी 78 लाखांचा दंड बेकायदा वाळू वाहतुकीतून वसूल केला होता. यासंदर्भात त्यांची मुख्य भूमिका ही वाळू वाहतूक-व्यवसाय हा पर्यावरणपूरक असून शासनमान्य नियमांनुसार वाळू वाहतूक व्हावी अशी आहे.

शासकीय नियमांनुसार एका पासवर दोन ब्रास वाळू वाहतूक घेऊ शकते व त्याची किंमत असते 18 हजार रुपये मात्र, वाळू माफियांकरवी 10 हजार रुपयांमध्ये दोन ब्रास वाळूची वाहतूक सर्रास व बेकायदेशीररित्या होत असते. काही ठिकाणी तर त्याहून अधिक प्रमाणात वाळूची चक्‍क तस्करी होत असते. अशा बेकायदा वाळू वाहतूक प्रकरणी संबंधितांवर 5 पट दंड आकारणीची तरतूद असून आपल्या हातून बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या गाड्या सुटल्या नसल्याचे शिल्पा ठोकडे आवर्जून नमूद करतात.

त्यांच्या घरावर पाळत ठेवणे, कुटुंबाला धमकावणे, मुलांच्या वाहनांचा पाठलाग करून त्यांना दमदाटी करणे व या साऱ्याद्वारे भय आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रकार घडले. मात्र, शिल्पा ठोकडे यांचा निधारपूर्ण प्रयत्न व त्याला सोलापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनी खंबीर साथ दिल्यानेच शिल्पा आपले कर्तव्य चोखपणे बजावू शकल्या.

आपल्या याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून वाळू माफियांना दणका देण्याचा चंग बांधलेल्या शिल्पा ठोकडे यांना वेशांतराची कल्पना सुचली. त्यानुसार एकदा सासरी सांगोला येथे एस.टी. बसने पोहोचून त्या ठिकाणी आजूबाजूच्या सहा महिला तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना विश्‍वासात घेतले.

त्यानुसार या महिलांनी कर्नाटकी साडी व मंडल अधिकाऱ्यांनी धोतर व सदरा असे वेषांतर केले. त्यानंतर या साऱ्यांनी सहा आसनी रिक्षाने जतमार्गे जाऊन भीव घाटात ठाण मांडले. वेळ रात्री 12.30 ची. त्यावेळी बेगमपूर-पंढरपुरातून सांगली, कोल्हापूर-राधानगरीकडे वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना वाटले की, या महिला जतच्या जत्रेतील असाव्यात. वाहनचालकांनी या महिलांसाठी गाड्या थांबविताच वाहनचालकांचे अवसान गळाले व त्या 13 वाहनांवर 1 कोटी 60 लाख रुपयांचा दंड त्यांनी वसूल केला. त्यांना “लेडी सिंघम’ या लौकिकासह विविध प्रकारच्या 124 पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here