साद-पडसाद : उपद्रव मूल्य वाढवण्यासाठी ममतांचे धरणे?

-अविनाश कोल्हे

तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हा कलगीतुरा अपेक्षेपेक्षा जास्त रंगला व जास्त काळ चालला. या सर्व प्रकरणाला आगामी लोकसभा निवडणुकानंतरची संभाव्य राजकीय परिस्थितीचा संदर्भ आहे. भाजपाला जर स्पष्ट बहुमत मिळाले नाही आणि विरोधी पक्षांच्या आघाडीला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तर तेव्हा आपले नाव चर्चेत असावे (बार्गेनिंग पॉवर : उपद्रव मूल्य) अशी आज ममता बॅनर्जी (व मायावती) या दोघींची मनोमन इच्छा आहे. त्या संदर्भात ममता बॅनर्जींचे सध्या वागणे व त्यांनी अलीकडे कोलकोता येथे धरलेले अखंड धरणे याकडे बघितले पाहिजे.

ममता बॅनर्जी-नरेंद्र मोदी या वादावादीत वरवर पाहता सीबीआयचा केंद्र सरकार करत असलेला गैरवापर हा मुद्दा आहे. म्हणून आधी या मुद्द्याची चर्चा केली पाहिजे. अलकडेच सीबीआयचे 40 जणांचे पथक कोलकीत्याचे पोलीस आयुक्‍त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी गेले होते. वॉरंट नसताना सीबीआयचे पथक पोलीस आयुक्‍तांच्या निवासस्थानी जाऊच कसे शकते, हा सवाल पश्‍चिम बंगाल सरकार उपस्थित करत आहे. या पथकाला आयुक्‍तांच्या निवासस्थानी प्रवेश करता आला नाही. उलट त्यांनाच कोलकोता पोलिसांनी रोखले व ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनवर नेले. तसे पाहिले तर हीच सनसनाटी घटना होती. “केंद्र सरकार आमच्या सरकारला त्रास देण्यासाठी सीबीआयचा वापर करत आहे,’ असा ममता बॅनर्जींचा आरोप आहे. आज तेथे फक्‍त विरोधी पक्षाचे राज्य सरकार आहे, असे नसून ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या आघाडींच्या नेत्या म्हणून समाजासमोर येण्याचे प्रयत्न करत आहेत.

काही दिवसांपूर्वी ममतांनी कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर सुमारे 24 विरोधी पक्षांना एकत्र आणून प्रचंड सभा घेतली होती. त्यानंतर काही दिवसांतच पंतप्रधान मोदींची अशीच विशाल सभा दुर्गापूर येथे संपन्न झाली. यातून हे दोन्ही नेते कसे एकमेकांना कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत आहेत हे दिसून येते. या संघर्षात “शारदा चिट फंड’ घोटाळ्यात ज्या 20 लाख गरीब गुंतवणूकदारांची फसवणूक झाली, त्यांच्याबद्दल दोन्ही नेते ‘ब्र’ काढत नाहीत. एका अंदाजानुसार “शारदा’ व “रोझ व्हॅली’ घोटाळे सुमारे चाळीस कोटींचे आहेत.

या घटनेने सीबीआयच्या अब्रूचे पार धिंडवडे निघालेले आहेत. केंद्र सरकारच्या ताब्यात असलेली ही तपास यंत्रणा निष्पक्ष नसून जो पक्ष दिल्लीत सत्तेत असेल, त्याच्यासमोर ही यंत्रणा झुकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. “शारदा चिट फंड’ घोटाळ्यात तृणमूल कॉंग्रेसचे माजी नेते व सध्या भाजपावासी झालेले मुकूल रॉय या नेत्याचे नाव सतत झळकत असते. पण आजपर्यंत सीबीआयने त्यांची चौकशी केलेली नाही. ज्या तत्परतेने सीबीआयचे पथक कोलकात्यात हजर झाले, तशी तत्परता सीबीआयने नीरव मोदी, मेहुल चोक्‍सी, विजय मल्ल्यांबाबत दाखवलेली नाही.

आज भाजपाला पश्‍चिम बंगालमध्ये पक्षविस्तार करायाचा आहे. त्यांच्या मते, आज पश्‍चिम बंगालमधील सामाजिक व राजकीय स्थिती हिंदुत्ववादी विचारांचा प्रचार करण्यासाठी अनुकूल आहे. शिवाय भाजपाला येत्या लोकसभा निवडणुकीत जर स्वबळावर सत्तेत यायचे असेल, तर आतापर्यंत फारसे यश न देणाऱ्या पण अलीकडे ज्या राज्यांतील परिस्थिती भाजपाला अनुकूल झाली आहे, अशा राज्यांवर भाजपाचे लक्ष केंद्रित होणे अगदी स्वाभाविक आहे. त्यांत आज पश्‍चिम बंगालचे नाव सर्वात वर आहे. शिवाय या राज्यातून लोकसभेत 42 खासदार निवडून जातात.

भाजपाला या खेपेस उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार वगैरे राज्यांनी 2014 मध्ये दिली तशी साथ देणार नाही, हे उमगले आहे. अशा स्थितीत संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी भाजपाला पर्यायी व्यवस्था म्हणून पश्‍चिम बंगालमधील अस्तित्व वाढवणे गरजेचे बनले आहे.

दुसरे म्हणजे, ममता बॅनर्जींची दिल्लीच्या राजकारणात उतरण्याची महत्त्वाकांक्षा, हे आहे. यामुळे भाजपाने आता सर्व ताकद पणाला लावून ममता बॅनर्जींचे पंख छाटण्याचे ठरवले आहे. ममता बॅनर्जींना हे सर्व माहिती असल्यामुळे व त्यासुद्धा कसलेल्या राजकारणी असल्यामुळे आज भाजपा व तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील कलगीतुरा रंगात आला आहे. मात्र, या नादात सरकारी तपास यंत्रणांची विश्‍वासार्हता लयाला जात आहे. याची कोणालाच पर्वा नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रत्येक जण या परिस्थितीचा राजकीय फायदा उचलण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे.

अगदी अलीकडे पश्‍चिम बंगालमधील नादीया जिल्ह्यात तृणमूल कॉंग्रेसचे कृष्णगंज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सत्यजित विश्‍वास यांचा 8 फेब्रुवारी रोजी दिवसाढवळया खून झाला. त्यांना अज्ञात इसमाने अगदी जवळून गोळी मारली. विश्‍वास यांनी कृष्णगंज मतदारसंघात भाजपाचे उमेदवार मानवेंद्र रॉय यांचा मागच्या विधानसभा निवडणुकीत सुमारे 37 हजार मतांनी पराभव केला होता. या खुनानंतर भाजपा व तृणमूल कॉंग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. याचाच अर्थ, दोन्ही पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहेत.

आता सीबीआय प्रकरणाचा ममता बॅनर्जी कसा वापर करतील हे बघावे लागेल. ममता बॅनर्जी ज्याला “रस्त्यावरचे राजकारण’ म्हणतात. ते करण्यात कमालीच्या पटाईत आहेत. त्यांनी असेच राजकारण करून डाव्या आघाडीची पश्‍चिम बंगालमध्ये सलगपणे 33 वर्षे असलेली सत्ता संपुष्टात आणली होती. त्यासाठी तेव्हा त्यांना सिंगूर व नंदीग्राम येथे घडलेल्या घटना उपयोगी पडल्या होत्या. सिंगूरमध्ये जेव्हा डाव्यांचे सरकार शेतकरीवर्गाच्या जमिनी घेणार होते, तेव्हा ममता बॅनर्जींनी तब्बल 26 दिवस धरणे धरले होते.

सीबीआयच्या गैरवापराचा निषेध करण्यासाठी बॅनर्जींनी पुन्हा एकदा विरोधी पक्षांचा दिल्लीत मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीसुद्धा उपस्थित राहावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. येथे जरा पंचाईत होत आहे. ममता बॅनर्जींच्या या लढ्याला कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. मात्र, केजरीवाल व दिल्ली कॉंग्रेसचे नेते एकाच व्यासपीठावर येणे उभय पक्षांना अडचणीचे आहे. कारण केजरीवालांनी दिल्लीतील कॉंग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्धच प्रचार करूनच सत्ता मिळवली होती. आता त्याच कॉंग्रेसच्या नेत्यांबरोबर एकाच व्यासपीठावर बसणे अडचणीचे ठरणार आहे. यावर तोडगा म्हणून सलग धरणे धरण्याऐवजी साखळी धरणे धरावे, हा उपाय समोर आला आहे. (जेव्हा केजरीवाल व्यासपीठावर असतील तेव्हा कॉंग्रेसचे नेते नसतील.)

बॅनर्जीसुद्धा आज भाजपाचा टोकाचा राग करत असल्याचे दिसत आहे. उत्त्र प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोलकात्यात भाजपाने आयोजित केलेल्या रथयात्रेत सामील व्हायचे होते. या रथयात्रेसाठी ते हेलिकॉप्टरने येणार होते. पण बॅनर्जीच्या सरकारने हेलिकॉप्टरला येण्याची परवानगी दिली नाही. शेवटी आदित्यनाथांना कारने यावे लागले.
एकंदरीत पाहता आज आपल्या देशांतील राजकीय वातावरण दररोज अधिकाधिक कलुषित होत आहे. निवडणुका जिंकण्याच्या नादात निकोप स्पर्धा न करता, लोकशाही संकेतांकडे लक्ष द्यायला कोणत्याही पक्षाला वेळ नाही. यासारखे दुर्दैव ते कोणते?

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)