विविधा : गणपत पाटील

-माधव विद्वांस

तमाशापटांतील ‘नाच्या’च्या भूमिकांमधील अभिनयाबद्दल प्रसिद्ध असणारे चित्रपट व नाट्यअभिनेते गणपत पाटील यांचे आज पुण्यस्मरण (निधन 23 मार्च, 2008).गणपत पाटील यांचे जीवन लहानपणापासून ते आयुष्याच्या अखेरपर्यंत खडतर गेले. त्यांचा जन्म 1918-19 दरम्यान कोल्हापुरात सामान्य कुटुंबात झाला. त्यावेळी जन्मतारीख नोंद झाली नाही.

वडील लहानपणीच निवर्तले त्यामुळे लहानपणापासूनच मोलमजुरी करावी लागली. त्यावेळी ते “दशावतारी’ नाटकामध्ये काम करू लागले व सीतेचीही भूमिका करीत असत. त्यांनी 15 ते 16 नाटकांतून अभिनय केला. याचवेळी राजा गोसावी यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून त्यांना मा. विनायकांच्या शालिनी सिनेटोनमध्ये काम मिळाले.

सुरुवातीला तेथे त्यांनी सुतारकाम, रंगभूषा सहायकाची कामे केली. वर्ष 1938 मध्ये त्यांनी प्रथम “बालध्रुव’ या चित्रपटात मॉबमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. मा. विनायकांच्या मृत्यूनंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले. त्याचवेळी राजा परांजपे यांच्या ‘बलिदान’व राम गबाले यांच्या ‘वंदे मातरम्‌’ या चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. त्यांची खरी कारकीर्द ठळकपणाने पुढे आली ती भालजी पेंढारकरांच्या ‘मीठभाकर’ या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेमुळे.

चित्रपटांबरोबरच ते नाटकांमध्येही अभिनय करीत होते. जयशंकर दानवे यांच्या ‘ऐका हो ऐका’ या तमाशाप्रधान नाटकात त्यांनी बायकीढंगाची सोंगाड्याची म्हणजेच ‘नाच्या’ची भूमिका स्वीकारली व ती खूपच लोकप्रिय झाली. त्यानंतर ‘जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्‍तिरेखा साकारली. त्यांची हीच भूमिका प्रेक्षक आणि निर्माते स्वीकारू लागले.

पाटलांनी अभिनय केलेल्या नाच्याच्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन निर्माते कृष्णा पाटलांनी ‘वाघ्यामुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर गणपत पाटील व नाच्या (सोंगाड्या) हे समीकरण बनले. त्यांची ‘आत्ता गं बया’ ही शब्दफेक आतापर्यंत कोणालाच जमलेली नाही. त्यावेळी तमाशापटातील नर्तिकांची प्रथम पसंती त्यांनाच असायची. इतकेच नव्हे तर आग्रहपण असायचा. त्यांचा “नाच्या’ त्यांनी जीव ओतून साकारला.

त्यांची कारकीर्द बहरत होती; पण कुटुंब मात्र उद्‌ध्वस्त होत होते. मुलांना शाळा-कॉलेजमध्ये थट्टेला सामोरे जावे लागत होते. मुलगी कॉलेजमध्ये जाईनाशी झाली, मुलाचा स्वभावही चिडखोर झाला. या सर्व गोष्टी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या ओठावर आल्या आणि ते ढसाढसा रडले.

रसिकांचे रंजन करणाऱ्या व्यक्‍तीचे जीवन किती क्‍लेशदायी होते हे त्यांच्या अनावर झालेल्या अश्रूंनी सांगून टाकले. त्यांच्या जीवनावर आधारित “नटरंग’मुळे त्यांच्या जीवनाचे पैलू लोकांना समजले. 2005 चा झी जीवनगौरव पुरस्कार हा त्यांचा पहिला पुरस्कार व 2013 सालचा विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार त्यांना मरणोत्तर जाहीर झाला होता. अभिनेत्याला अभिवादन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)