अखेर मोदी बोलले…(अग्रलेख)

गेल्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेवर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी कधीही पत्रकारांना सामोरे गेले नाहीत, अशी टीका विरोधी पक्षांकडून कायम होत असतानाच मोदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच एका वृत्तवाहिनीला दीर्घ मुलाखत देऊन आपले मौन सोडले. तब्बल 90 मिनिटांच्या या मुलाखतीत मोदी यांनी राममंदिर, पाकिस्तान, कॉंग्रेसमुक्‍त भारत, नोटाबंदी, जीएसटी, काळा पैसा यासह सर्व विषयांना स्पर्श करून एकप्रकारे आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा पायाच घातला.

दरमहा “मन की बात’ करणाऱ्या मोदी यांनी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असताना अशी मुलाखत देणे अपेक्षितच होते. आगामी काळात अशा आणखी काही मुलाखती झाल्या तरी आश्‍चर्य वाटायला नको. देशातील सर्वसामान्य लोकांच्या आणि विरोधी पक्षांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला असला तरी या उत्तरातूनच नवीन काही प्रश्‍न तयार होण्याची शक्‍यता आहे. विशेषत: अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी सरकारने अध्यादेश आणावा, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्‍व हिंदू परिषदसारख्या संघटना आणि सत्तेत सहकारी असलेल्या शिवसेनेने दबाव वाढवला असतानाही नरेंद्र मोदींनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अध्यादेश आणण्यात येईल, अशी घोषणा केल्यानेच आता यावर व्यक्‍त होणारी प्रतिक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी अतिशय स्पष्टपणे राममंदिरासाठी अध्यादेश आणण्याची मागणी केली असतानाही मोदी यांनी घटनात्मक पद्धतीनेच याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका घेतल्याने आगामी काळात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. इतर अनेक विषयांना अध्यादेशाच्या माध्यमातून पूर्णविराम दिला जात असताना राममंदिराचा विषय विनाकारण ताणला जात असल्याची शिवसेनेची नेहमीची भूमिका आहे. पण तरीही न्यायालयीन निर्णयाची वाट पाहण्याची मोदी यांची भूमिका शिवसेनेला चिडवणारी आणि विरोधी पक्षांना गप्प बसवणारी आहे. राममंदिरप्रश्‍नी न्यायालयीन कार्यवाहीच्या विलंबावरून मोदी यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधत कॉंग्रेसचे वकील सर्वोच्च न्यायालयात राममंदिरप्रश्‍नी खोडा घालत असल्याने या खटल्याची सुनावणी धिम्या गतीने होत असल्याचा आरोपही केला आहे. म्हणजेच आगामी निवडणुकांच्या तोंडावर राममंदिराचा विषय थोड्या वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा मोदी यांचा इरादा स्पष्ट होत आहे.

भाजपचे जे आता हाताच्या बोटावर मोजता येतील, असे मित्रपक्ष आहेत त्यापैकी शिवसेना वगळता कोणत्याही पक्षाची राममंदिराच्या प्रश्‍नाला प्राधान्यता नाही. नितीशकुमार, पासवान या मित्रांना सोबत ठेवण्यासाठी मोदी यांनी संघ आणि शिवसेनेला दुखवून ही भूमिका घेतली आहे हे विशेष. मोदी यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ही मुलाखत दिली असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुलाखतीत उल्लेख झालेला सर्जिकल स्ट्राईकचा विषय, पाकिस्तान भारताच्या कुरापती काढणे सोडत नाही. पाकिस्तानकडून सुधारण्याची अपेक्षा ठेवणं साफ चुकीचं आहे. पाकिस्तानला सुधारायचं असेल, तर त्याला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही.

“एका सर्जिकल स्ट्राईकने त्यांना अक्कल आली असे दिसत नाही’, असे म्हणत मोदी यांनी आणखी एका सर्जिकल स्ट्राईकचे संकेत दिले आहेत. नरेंद्र मोदी यांनी आक्रमक होत पाकिस्तानला ठणकावले असले तरी देशभक्‍त भारतीय मतदारांना समोर ठेवूनच हे विधान केले असल्याचे उघड आहे. कॉंग्रेसने नेहमीच सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्याने त्यांना उत्तर देण्यासाठी मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती या मुलाखतीत दिली आणि कॉंग्रेसला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारच्या कालावधीत नोटाबंदी आणि जीएसटी या विषयांवरून नेहमीच विरोधकांनी टीका केली आहे. मोदी यांनी कधीही या टीकेला उत्तर दिले नव्हते. पण या मुलाखतीत त्यांनी या दोन्ही विषयांना हात घातला.

“नोटाबंदीची कल्पना देशातील नागरिकांना होती आणि जीएसटीमुळे कररचना सुलभ झाली,’ अशी विधाने करून मोदी यांनी या दोन्ही निर्णयांचे समर्थन केले असले तरी नागरिकांच्या मनातील शंकांचे संपूर्ण निरसन करण्यात त्यांना अपयश आले आहे.कारण नागरिकांना खरोखरच नोटाबंदीची कल्पना असती तर त्यांनी या निर्णयाचा इतका धसका घेतला नसता. शिवाय मोदी यांनी या मुलाखतीत गांधी कुटुंबीयांना लक्ष्य करून एकप्रकारे राहुल गांधीच आपले खरे प्रतिस्पर्धी असल्याची कबुलीच दिली. विधानसभा निवडणुकीतील पराभवाबाबतच्या प्रश्‍नांना त्यांनी चतुराईने बगल दिली आणि एखाद्या पराभवाने राजकीय पक्ष खचून जात नाही असे विधान केले.

कॉंग्रेसमुक्‍त भारत या मोदी यांच्या लोकप्रिय घोषणेबाबतही मोदी यांना समर्पक उत्तर देता आले नाही. एकूणच राममंदिराचा विषय सोडला तर कोणत्याही विषयाची मोदी यांनी नवीन मांडणी केली नाही. पण मोदी या मुलाखतीत अनेक वादग्रस्त आणि महत्त्वाच्या विषयांना सामोरे गेल्याचे चित्र मात्र निर्माण झाले. मोदी यांच्या या मुलाखतीतून नवीन प्रश्‍न निश्‍चितच निर्माण होणार असून त्याची झलक लगेचच कॉंग्रेसने दाखवली आहे. देशातील नागरिकांच्या खात्यांमध्ये 15 लाख रुपये कधी जमा करणार, असा प्रश्‍न आता कॉंग्रेसने विचायला आहे आणि मोदी यांना आपल्या आगामी मुलाखतीत त्या प्रश्‍नाचे उत्तर द्यावे लागणार आहे. सध्या तरी मोदी अखेर बोलले एवढेच या मुलाखतीचे महत्व आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)