महिला क्रिकेटचे “राज’ (अग्रलेख)

भारतीय क्रिकेटची सूत्रे कायमच राजकारण्यांच्या हातात राहिल्याने क्रिकेटमध्येही राजकारण नसते तरच नवल. सध्या महिला क्रिकेट संघातील वादामुळे हे राजकारण प्रकर्षाने समोर आले आहे. भारतीय संघाची माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू मिताली राज हिला महिला टी विश्‍वचषक स्पर्धेत उपान्त्य फेरीच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात संघाबाहेर ठेवण्यात आले. भारतीय महिला क्रिकेट संघ हा यंदाच्या टी विश्‍वचषक स्पर्धेत विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. पण मिताली राज हिला संघातून वगळण्यात आल्याची सर्वत्र चर्चा होऊन भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर टीका करण्यात आली. हा महत्त्वाचा सामनाच भारतीय संघाने गमावल्याने भारताला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यामुळे हा वाद अधिकच तीव्र झाला.

भारतीय संघाने हा सामना आणि नंतर विश्‍वचषकही जिंकला असता तर कदाचित हा वाद एवढा चिघळला नसता. पण पहिल्या चार सामन्यात चांगली कामगिरी करूनही भारतीय महिला संघाला विश्‍वचषकापर्यंत पोहोचता न आल्यानेच, मितालीला वगळण्यामागील राजकारण समोर येऊ लागले आहे. एकापाठोपाठ एक आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत आणि वातावरण गढूळ होत आहे. हा वाद सुरू झाल्यावर मितालीने अनेक गंभीर आरोप केले आहेत. “भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील काहीजण माझे करियर उद्‌ध्वस्त करायला निघाले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्व खेळवण्यात आलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात मला प्रशिक्षक रमेश यांनी नजरकैदेत ठेवले होते’, असा आरोप मितालीने केला आहे. “ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचा विजय झाला. भारत जिंकल्यानंतर पोवार यांनी एका खेळाडूकरवी मला मैदानात येण्यास सांगितले आणि इतर खेळाडूंबरोबर विजय साजरा करण्याचा सल्ला दिला. कारण संपूर्ण सामन्यात प्रसारमाध्यमांशी मी चर्चा करू नये आणि ड्रेसिंग रूममधून बाहेर पडू नये म्हणून मला नजरकैदेत ठेवण्यात आले होते’, असेही मितालीने म्हटले आहे. खरे तर मिताली राज उत्तम फॉर्ममध्ये होती.

स्पर्धेत दोन अर्धशतके झळकवणाऱ्या मितालीला सामनावीराचे दोन पुरस्कारही मिळाले. पण प्रकृती चांगली नसल्याने मिताली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात खेळू शकली नव्हती. पण त्यानंतरच्या उपांत्य फेरीतील सामन्यात तिला वगळण्यात आले. हाच वादाचा मूळ विषय आहे आणि त्याला रमेश पोवार यांच्यासह संघव्यवस्थापन जबाबदार आहेत, असेच आरोप होत आहेत. कोणत्याही संघाच्या विजयात आणि एकूणच कामगिरीमध्ये प्रशिक्षकाचा मोठा वाटा असतो. संघातील सर्वात ज्येष्ठ खेळाडूंनाही प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाचा आधार गरजेचा असतो. पण “पोवार यांनी जाणीवपूर्वक आपल्याकडे दुर्लक्ष केले. पोवार मला कायम मला टाळण्याचा प्रयत्न करायचे. मी त्यांच्या खिजगणतीतीही नव्हते. मी आसपास असले की ते जाणूनबुजून दुसऱ्या दिशेला पाहायचे आणि माझ्याकडे पाठ फिरवायचे,’ असे तपशीलवार आरोपही तिने केले असल्याने त्याची दखल घ्यावीच लागणार आहे.

मितालीने प्रशासकीय समितीच्या सदस्य, माजी कर्णधार डायना एडलजी यांच्यावरही पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. त्यांना मितालीची वेदना समजायला हवी. पण त्यांच्यावरच आरोप झाल्याने त्यांनाही आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.मितालीच्या जागी महिला संघाची कर्णधार झालेली हरमनप्रीतही एक चांगली खेळाडू आहे. वयाच्या विशीत असलेल्या हरमनच्या कारकिर्दीवरही या वादाचा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. कारण तीही या वादात आता ओढली गेली आहे. “हरमनशी माझे काहीही भांडण नाही. पण तिने मला वगळण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला, हे मला खटकले,’ अशी सौम्य प्रतिक्रिया मितालीने दिली असली, तरी मिताली राजची मॅनेजर अनिशा गुप्ताने मात्र अत्यंत कठोर शब्दांत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर टीका केली आहे.

“हरमनप्रीत कारस्थानी, खोटं बोलणारी, अपरिपक्व आणि कर्णधारपदासाठी योग्य नसलेली व्यक्ती आहे,’ अशा शब्दांत अनिशाने आपला राग व्यक्‍त केला आहे. हरमनप्रीतने मितालीला संघातून वगळण्याच्या निर्णयाबद्दल आपल्याला अजिबात खंत वाटत नसल्याचे सांगितले होते. म्हणूनच हा वाद वाढला हेही विसरून चालणार नाही. मिताली फॉर्ममध्ये नसती आणि तिला वगळण्यात आले असते तर कोणाचीच तक्रार नव्हती. पण स्पर्धेत मितालीची कामगिरी चांगली झाली होती. मितालीने पुरुष संघातील विराट कोहली आणि रोहित शर्माला पिछाडीवर टाकले होते. अशी परिस्थिती असताना मितालीला वगळण्यामागे केवळ राजकारण हेच कारण असू शकते.

महिला क्रिकेटकडे कायमच दुर्लक्ष करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आता पुढाकार घेत, हा वाद संपवायला हवा. भारतीय महिला क्रिकेटला आता कोठे वलय प्राप्त होत असताना असे वादाचे ग्रहण लागणे दुर्देवी आहे. जरी संघात कोणाला ठेवावे आणि कोणाला वगळावे हा पूर्णपणे व्यवस्थापनाचा निर्णय असला, तरीही हा निर्णय घेताना राजकारणापेक्षाही संघहित लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे असते. भारतीय महिला संघाला आगामी काळात भरपूर क्रिकेट खेळायचे आहे. म्हणूनच नियामक मंडळाने या वादाला पूर्णविराम देण्यासाठी निर्णायक पावले उचलायला हवीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)