कलंदर : भाई ते भाईच…

-उत्तम पिंगळे

रविवारी प्राध्यापक विसरभोळ्यांना भेटलो. त्यांनी “भाई : व्यक्‍ती की वल्ली : उत्तरार्ध’ या चित्रपटावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की अलीकडे मराठी चित्रपट एवढे तयार होऊ लागले आहेत की चित्रपटगृह त्यांचा खोखो चालू असतो. मोठ्या शहरात एकवेळ ठीक आहे कारण तिथे अनेक चित्रपटगृह असतात पण छोट्या-मोठ्या शहरांमध्ये त्यांची संख्या कमी असल्यामुळे भरमसाठ येऊ घातलेले मराठी चित्रपट पटकन बदलत जातात. “हा चित्रपट पाहायचा’ असे ठरवत असतानाच कधी चित्रपट बदलून जातो ते समजतच नाही. अर्थात, याला आपले मराठी चित्रपट निर्मातेच जबाबदार आहेत. त्यांचा एकमेकांमध्ये ताळमेळ नाही, म्हणूनच असे होत आहे.

प्राध्यापकांचा मुद्दा होता की, भाई चित्रपटाचा दुसरा भागही सर्व मराठी लोकांनी पाहावयास हवा.एकाच व्यक्तीमध्ये एवढ्या कला म्हणजे संगीत, लेखन, अभिनय, दिग्दर्शन, गायक, निर्माता आणखीन काय काय असू शकतात त्याही नुसत्या दिखाऊ नाही तर उत्कृष्टपणे असतात. मग त्यांचे व्यक्‍तिमत्त्व किती सखोल असेल याचा विचार करायला हवा. आजकाल एखाद्या लेखकाची एक दोन पुस्तके (कविता, लेख) प्रकाशित झाले तर तो लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढतो.

अर्थात, हे मी त्यातल्या त्यात बरे लिहिणाऱ्यांच्या बाबतीत म्हणत आहे. कित्येक जण तर स्वखर्चानेच आपली पुस्तके छापून घेतात. बरं थोडेफार नाव व पैसे मिळू लागताच जास्तीत जास्त ते कसे वसूल करता येतील, याचा प्रयत्न केला जातो. भाईंचं तसं नव्हतं. त्यांनी शिक्षकाची नोकरी केली, दूरदर्शनमध्ये केली होती. सरकारी नोकरी होती व्यवस्थित चालू होती पण त्यांच्यातला कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता,. म्हणून त्यांनी चांगल्या नोकऱ्यांनाही झुगारून थेट त्यांच्या आवडत्या कलांतच झोकून दिले होते. बरं हे सर्व करत असताना कोणत्याही दुसऱ्य़ा कलाकाराला गौण समजणे व मी किती मोठा आहे दाखवणे असा प्रकार कधीही केला नाही.

“आनंदवना’त जाऊन त्यांनी बाबांसाठीही काम केले व बाबा किती प्रतिकूल परिस्थितीत कार्य करत आहेत ते समजून घेतले. दुसऱ्या कलाकारांनाही भाईंनी कायमच मोठेपणा दिला. अर्थात, या सर्वात सुनीताबाईंची त्यांना लाख मोलाची साथ तितकीच महत्त्वाची. त्यांचे भाईंवर पूर्णपणे लक्ष होते. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे नाठाळाच्या कपाळी हाणू काठी तसंही त्यांना काही जणांच्या बाबतीत करावे लागले, जे भाईंचा गैरफायदा घेत होते.

भाई कधीही राजकारणात नव्हते; पण आणीबाणी विरोधात जनता एकवटली असताना त्यांच्या समवेत विरोधी पक्षांबरोबर होते. पुढे महाराष्ट्रात युतीचे सरकार आले. त्यांना “महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला गेला. त्यांनी तो स्वीकारलाही. पण जे त्यांना पटत नव्हते ते त्यांनी थेट बोलून दाखवले व प्रसंगी बाळासाहेब ठाकरेंची नाराजीही पत्करली. असे असूनही बाळासाहेबांचे त्यांच्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. सतत पाय जमिनीवर असणारा अष्टपैलू कलाकार तसेच दुसऱ्याला कायम मदत करण्यास तत्पर असे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व होते.

लोकांना सततच्या धावपळीच्या जीवनात क्षणात हसवून सोडण्याची ताकद असणारे व्यक्‍तिमत्त्व होते. उभ्या हयातीमध्ये स्वतःसाठी त्यांनी कधी काही ठेवले नाही. जनतेकडून त्यांना जे जे मिळाले, अगदी प्रेम, पैसा, नाव ते ते सर्व त्यांनी सव्याज पुन्हा जनतेलाच परत केले. खरोखरच अजातशत्रू व्यक्‍तिमत्त्व पण तेवढेच रोखठोक. जरी लोण्याहून मऊ तरीही वज्राहून कठोर. भाई हे खरोखरच भाई होते…

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)