लक्षवेधी : ‘स्वबळा’च्या संभाव्य अपयशानेच एकत्र!

-राहुल गोखले

स्वबळावर लढून विजयी होण्यातला फोलपणा शिवसेनेला कळून चुकल्यानंतरच राजकीय अपरिहार्यतेने भाजपा-सेनेतील युती झाली आहे. राजकारणात परिस्थिती बदलत असते आणि त्यामुळे साहजिकच मित्र आणि विरोधक देखील बदलत असतात. त्यात दरवेळी संधिसाधूपणाच असतो असे मानण्याचे कारण नाही. मात्र आपली युती नैसर्गिक आणि महागठबंधन मात्र संधीसाधूपणा असा अगोचरपणा देखील करण्यात हशील नाही. शिवससेना-भाजप युती झाली; त्या युतीची कामगिरी आता कशी राहील आणि एकमेकांवर केलेली टीका आता हे पक्ष कशी सावरून घेतील, हे दोन्ही पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

अखेर भाजप-शिवसेनेची युती झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी नरेंद्र मोदी यांच्या लाटेत लोकसभेत भाजपला प्रथमच स्वबळावर सत्ता मिळाली होती. त्याच मोदी लाटेत महाराष्ट्रातदेखील स्वबळावर सत्ता मिळेल अशा आवेशात भाजपने शिवसेनेशी युती करणे नाकारले. तथापि निकालांनी भाजपला कोंडीत पकडले आणि शिवसेनेचा पाठिंबा घेण्यावाचून पर्याय भाजपसमोर राहिला नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने न मागता बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर सरकार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकू शकले होते; मात्र भाजपचे समर्थक आणि हितचिंतक यांनी भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत राहावे याविषयी नाराजी प्रकट केली आणि शिवसेनेचा पाठिंबा घेण्यावाचून पर्याय राहिला नाही. तथापि गेली साडेचार वर्षे महाराष्ट्रात युती सरकार असूनही दोन्ही पक्षांनी कायम एकमेकांना खिंडित गाठण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अशा भाषेचा वापर केला ज्यामुळे हे मित्र पक्ष आहेत की विरोधी पक्ष, अशी शंका यावी. कोणत्याही मुद्द्यावर दोन्ही पक्षांत एकमत होणे अवघड होते; आणि सतत एकमेकांना आव्हान देण्यातच या पक्षांचा वेळ गेला. तरीही अखेर युतीशिवाय गत्यंतर नाही याची जाणीव दोन्ही पक्षांना झाली आणि युतीचे घोडे गंगेत न्हाले !

अर्थात ही राजकीय अपरिहार्यता केवळ भाजप किंवा केवळ शिवसेनेला होती असे मानण्याचे कारण नाही. दोन्ही पक्षांना आपापल्या मर्यादांची जाणीव झाली आहे, एवढाच याचा अन्वयार्थ. भाजपला मोदी लाट आता जाणवत नाही; आणि गेल्या डिसेंबरात तीन राज्यांत सत्तेपासून वंचित राहावे लागल्यावर तर या मर्यादांची जाणीव भाजपला अधिकच झाली असेल. मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभांचा धडाका लावूनही भाजपला त्या राज्यांत सत्ता मिळविता आली नाही. तेंव्हा मोदी यांची जादू दर वेळी चालेलच असे नाही याचीही प्रचिती त्या निवडणुकांत आली. शिवाय विरोधी पक्षांची एकजूट वाढत आहे हेही तितकेच खरे. जरी विरोधी पक्षांत म्हणावा तसा एकजिनसीपणा नसला तरीही भाजपसमोर विरोधी पक्ष एकवटत आहेत हेही खरे.

प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाला उत्तर प्रदेशात मिळालेला प्रतिसाद कॉंग्रेसच्या आशा पल्लवित करणारा होता. मायावती आणि अखिलेश यादव यांनी अगोदरच उत्तर प्रदेशपुरते जागा वाटप जाहीर केले आहे. राफेलच्या मुद्द्यावर भाजपने कितीही अवसान आणण्याचा प्रयत्न केला तरीही भाजपला काहीसा बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे यात शंका नाही. 2014 ची पुनरावृत्ती 2019 मध्ये होणार नाही याचा अंदाज भाजप नेतृत्वाला आला आहे आणि जर भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली नाही तर कदाचित अन्य पक्षांची मदत सरकार स्थापनेसाठी घ्यावी लागेल हेही दिसत असताना अगोदरच मित्रपक्षांना चुचकारणे हिताचे असा विचार भाजपच्या मुखंडांनी केला असल्यास नवल नाही.

जर मित्र पक्षांना अगोदर बरोबर घेतले नाही तर नंतर त्याच मित्रपक्षांच्या मागण्या अधिक होणार हे एक, आणि दुसरे म्हणजे कदाचित मोदी यांच्या ऐवजी अन्य कोणाला पंतप्रधान करावे अशीही मागणी होऊ शकते. तेंव्हा हे संभाव्य धोके लक्षात घेऊन भाजपने महाराष्ट्रापुरता तरी प्रश्‍न सोडविला आहे असेच म्हटले पाहिजे. परंतु ज्या मित्र पक्षांना गेली उणीपुरी पाच वर्षे भाजपने दुय्यम वागणूक दिली त्याच मित्र पक्षांना चुचकारण्याची वेळ भाजपवर यावी यातच भाजपच्या गोटातील अगतिकता दृगोच्चर होते.

दुसरीकडे शिवसेनेला देखील पराभवाची भीती सतावत असणारच. कितीही अवसान आणले आणि मोदींवर शरसंधान केले, तरी भाजपसारख्या सुसंघटित अशा राष्ट्रीय पक्षाला टक्‍कर देण्याची ताकद शिवसेनेत नाही हे उघड आहे. भाजप राष्ट्रव्यापी पक्ष आहे आणि शिवसेना प्रादेशिक पक्ष. तेंव्हा राम मंदिराचा मुद्दा उठविला म्हणून उद्या शिवसेनेला उत्तर प्रदेशात जागा मिळतील का? चलन-बदलावर टीका केली म्हणून गुजरातेत शिवसेनेच्या वाट्याला यश येईल का?

थोडक्‍यात शिवसेना महाराष्ट्रापुरती सीमित आहे आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत “स्वबळावर’ लढूनही शिवसेनेला 61 जागा मिळाल्या होत्या; ज्या भाजपला मिळालेल्या जागांपेक्षा निम्म्या होत्या. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला आपला बालेकिल्ला असूनही बहुमत गाठताना दमछाक झाली होती. शिवाय आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी होणार हे स्पष्ट होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर स्वबळावर लढण्यात आक्रमकता असली, तरीही तिरंगी-चौरंगी लढती टाळण्यातच राजकीय शहाणपण आहे, हे शिवसेनेच्या नेतृत्वाच्या लक्षात आले असल्यास नवल नाही.

भाजपला विजय मिळू नये यासाठी अट्टहास करताना शिवसेनेला स्वतःच्या अपयशाची भीती अधिक वाटली असणार. एरवी काल-परवापर्यंत भाजपविरुद्ध शड्डू ठोकणाऱ्या शिवसेनेला आता “युती म्हणजे समविचारी पक्षांची नैसर्गिक आघाडी’ अशी भलामण करण्याची वेळ आली नसती. परंतु या सगळ्यामुळे शिवसेनेला आपण गेली साडेचार वर्षे करत असणारी टीका खरी होती का केवळ विरोधासाठी विरोध म्हणून केलेली होती, याचे उत्तर द्यावे लागेल.

सत्तेत राहून सत्तेतील भागीदार मोठ्या पक्षावर सतत टीकेचे तोफगोळे सोडणाऱ्या शिवसेनेला आता अचानक भाजपशी युती करावीशी का वाटली, याचे उत्तर शिवसेनेची अगतिकता हेच आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर शेलक्‍या शब्दांत टीका करणाऱ्या शिवसेना नेत्यांना त्याच मोदी यांचे नेतृत्व आता मान्य करावेसे का वाटले याचेही समाधानकारक स्पष्टीकरण शिवसेनेजवळ नाही आहे. परंतु शिवसेनेने युती करण्यासाठीची कितीही कारणे दिली तरीही एक कारणच खरे आहे नी ते म्हणजे, स्वबळावर लढून अपयश येण्याची भीती.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही तर पक्ष अस्तित्वाचेच मोठे आव्हान उभे राहील. ते टाळण्यासाठी आणि समविचारी पक्षांमधील बहुरंगी लढतींमुळे होणारा मतविभाजनाचा तोटा आपल्याला होऊ नये, या उद्देशाने शिवसेनेने युतीस मान्यता दिली, हे नाकारता येणार नाही, असेच वास्तव आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)