-माधव विद्वांस
“ती फुलराणी’चे 1,111 हून अधिक प्रयोग करणाऱ्या अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्मात्या भक्ती बर्वे-इनामदार यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म सांगली येथे 10 सप्टेंबर 1948 रोजी झाला. त्यांच्या शालेय जीवनात सुधा करमरकर यांच्या ‘लिटल थिएटर’मध्ये नाटकातून काम करून त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. आकाशवाणी व दूरदर्शनवर त्यांनी निवेदिका म्हणून काम केले. अशोक हांडे यांच्या ‘माणिकमोती’ या कार्यक्रमाचे निवेदन त्यांनीच केले.
दूरदर्शनवर त्यांनी बहिणीबाई चौधरी यांची भूमिका देखील केली. दूरदर्शनवरील साप्ताहिकी तसेच वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले. त्यांनी अनेक गुजराथी नाटकातूनही अभिनय केला. कुंदन शहा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जाने भी दो यारों ‘या हिंदी फिल्ममधे त्यांनी काम केले.
त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले ते “फुलराणी’ने. पु. ल. देशपांडे यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या ‘पिग्मॅलियन’ या नाटकाचे केलेले मराठी रूपांतरण म्हणजे “ती फुलराणी.’ भाषेच्या उच्चारपद्धतीवरून ठरणाऱ्या उच्च-नीचतेच्या कल्पना जगभरात रूढ आहेत, हे त्यांना नाटकाच्या रूपातून दाखवायचे होते. या संकल्पनेला भक्ती बर्वे यांनी आपल्या अभिनयातून न्याय दिला.
अशोक पाटोळे यांनी लिहिलेल्या ‘आई रिटायर होतेय’ नाटकाची निर्मिती भक्ती बर्वे यांना डोळ्यांसमोर ठेवूनच करण्यात आली होती. या नाटकाचे त्यांनी 750 प्रयोग केले. या नाटकाचा पहिला प्रयोग 17 ऑगस्ट 1989 रोजी मुंबईच्या शिवाजी मंदिर येथे झाला होता. भक्ती बर्वे यांनी 1973 पासून एकूण 100 कलाकृती दिग्दर्शित केल्या. त्यात 70 हौशी व व्यावसायिक नाटके, 17 मराठी चित्रपट, 3 टेलिफिल्म्स आणि 10 मराठी-हिंदी मालिका यांचा समावेश आहे. त्यांना त्यांची भूमिका असलेले नाटक “रातराणी’ खूप आवडायचे.
“रातराणी’ हे प्रभाकर लक्ष्मण मयेकरांचे नाटक “भद्रकाली’ या संस्थेने रंगमंचावर आणले. या नाटकात पियानोवादक ऍना स्मिथच्या भूमिकेत भक्ती बर्वे, तर व्हायोलिनवादक पती म्हणून अरुण नलावडे यांच्या भूमिका होत्या. हेच नाटक ‘रेशीमगाठ’ नावाने हिंदीत आणले व त्याच्यातही त्यांनी अभिनय केला. 2002 मध्ये पूनम टेलिफिल्मतर्फे मराठी रेशीमगाठ’ आणि हिंदीत “तुम्हारा इंतजार है’ चित्रपट आले.
ऍना स्मिथ’ला त्या वर्षीची नाट्यदर्पण, नाट्य परिषद, व्यावसायिक राज्यनाट्य स्पर्धेत पारितोषिके मिळाली, तर महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात “ऍना स्मिथ’ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी त्यांना 1990 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
हिंदी चित्रपटांतील आघाडीचे सहअभिनेते शफी इनामदार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 12 फेब्रुवारी 2001 रोजी त्या वाई येथील कृष्णाबाई उत्सवास उपस्थित राहून रात्रीच मुंबईला परत जात असताना त्यांना मृत्यूने गाठले.