अबाऊट टर्न : शाप

-हिमांशू

आमच्या वेळी असलं नव्हतं… हे वाक्‍य प्रत्येक नव्या पिढीला जुन्या पिढीकडून ऐकावं लागतं आणि जुन्या-नव्याचा संघर्ष याच कारणामुळं सर्वांत जास्त उफाळतो. सतत पुढंच जायचं असतं. किंबहुना पुढंच जावं लागत असतं आणि भविष्याकडे पाठ फिरवताना म्हणावं लागतं… जुने जाऊद्या मरणालागुनि. परंतु जशी भूतकाळाची चिकित्सा आपण करतो, तशीच भविष्यकाळाचीही कधीतरी करावीशी वाटते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आजची पिढी टेक्‍नोसॅव्ही म्हणून मिरवणारी. अर्थातच, तंत्रज्ञान त्यांच्या हाताच्या तळव्यावर येऊन ठेपलंय आणि ही पिढी तंत्रज्ञानाशी अक्षरशः खेळते आहे. भविष्यात बॅंकांना इमारतीच लागणार नाहीत. मग कर्मचारीवर्गाचा तर विषयच सोडा. शाळांना शिक्षक लागणार नाहीत. पोरं घरबसल्याच शिकतील, कारण शाळाच घरात आलेली असेल. गाड्या चालवण्यासाठी ड्रायव्हर लागणार नाही. शेतीभातीतसुद्धा इतकं तंत्रज्ञान आलेलं असेल, की शेतमजूर मिळत नाहीत ही ओरड चालणार नाही.

थोडक्‍यात, यंत्रांची रेलचेल असेल आणि माणूस शोधावा लागेल, अशा भविष्याकडे आपण वाटचाल करू लागलो आहोत. आताच माणसाची 26 टक्‍के कामं यंत्रं करू लागली आहेत आणि येत्या काही वर्षांतच जवळजवळ पन्नास टक्‍के कामं यंत्रांनी माणसांच्या हातून हिसकावलेलं असेल. कुणाला काहीच काम करावं लागणार नाही, अशी स्थिती जेव्हा येईल, तो सुदिन असेल.

थोडक्‍यात, तंत्रज्ञानाच्या पुढे कुणीही धावू शकणार नाही, अशी ही भविष्याची वाटचाल असेल. तंत्रज्ञान पुढे पळत असेल आणि आपण त्याचा पाठलाग करत असू. ज्यांच्या हाती तंत्रज्ञान गवसेल, ते शर्यतीत जिंकतील आणि ज्यांना त्यातला ओ की ठो कळत नाही, अशा माणसांना हद्दपार होण्यावाचून गत्यंतर नसेल. परंतु या शर्यतीतसुद्धा तंत्रज्ञानाच्या दोन पावलं पुढं धावणारे महाभाग आहेतच, हे आपण विसरता कामा नये.

कायदा आणि तंत्रज्ञान यांचे हात कितीही लांब असले, तरी ते ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, तीच ही जमात. कितीही आधुनिक तंत्रज्ञान आणा, ते भेदण्याची ताकद या मंडळींनी कमावलेली आहे आणि त्यामुळंच सायबर गुन्हेगारीचा ब्रह्मराक्षस आपल्यासमोर आज उभा आहे. पाचशे सायबर गुन्हे घडले, तर चार-पाच जणांना अटक होते, इतक्‍या कमालीच्या वेगानं तपास सुरू असतो. बॅंक खात्यांमधले पैसे लुटणं हा या मंड़ळींचा आवडता छंद.

बॅंकेकडून फोन येतो आणि आपण देऊ नये ती माहिती फोनवर देतो. बॅंकांकडून राबवण्यात येत असलेल्या प्रबोधन मोहिमांमुळं आता खातेदार जरा शहाणे झालेत. परंतु या मंडळींनी आता आणखी एक नवी शक्‍कल शोधून काढलीय. इंटरॅक्‍टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स म्हणजे आयव्हीआर या तंत्रज्ञानाचा वापर करून आता ही मंडळी खातेदारांच्या पोटात शिरू लागलीत.

आयव्हीआर तंत्रज्ञान वापरण्यासाठी एक साधं मशीन गरजेचं असतं आणि ते खूपच स्वस्तात मिळतं. पहिल्या ऑप्शनसाठी एक दाबा, दुसऱ्या ऑप्शनसाठी दोन दाबा अशा प्रकारचा रेकॉर्डेड संदेश या माध्यमातून पाठवता येतो. अशा प्रकारचा कॉल नक्‍कीच बॅंकेकडून आला असणार असं मानून खातेदार आपली माहिती देऊन टाकतो आणि मग ही मंडळी त्याचं बॅंक खातं साफ करतात. शुक्राचार्यांच्या पोटात शिरून विद्या मिळवणाऱ्या कचाला शाप भोगावा लागला. पण या मंडळींना कोणता शाप देणार?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)