जीवणगाणे : शुभ दिन आणि शुभ रात्र

-अरूण गोखले

सर्व सामान्य माणसांना नेहमीच असा प्रश्‍न पडतो की शुभ दिवस कोणता आणि शुभ रात्र कोणती? कारण सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग करायचे आणि रात्री शुभ रात्री किंवा गुड नाईट म्हणायचे हा तर सध्याचा परिपाठच झालेला आहे.
शुभ, मंगल, पवित्र या संकल्पनेबद्दल ज्याचे त्याचे विचार हे वेगवेगळे असू शकतात; पण साधू संत सत्पुरुष आणि मुनीजन यांच्या लेखी त्यांचे शब्द जरी वेगवेगळे असले तर त्या मागची संकल्पना एकच असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका महान मुनीवरांचे वचन आहे. ते म्हणतात-

जिन प्रभात में प्रभूका स्मरण हो
वो प्रभात सु-प्रभात है।
जिस रातमे प्रभूका ध्यान हो
वो रात शुभरात हो जाती हैं।

खरंच किती सार्थ विचार आहे हा. त्यावर चिंतन मनन केले तर असे लक्षात येते की खरंच ज्या दिवसाचा प्रारंभ हा ईश्‍वराच्या प्रात:स्मरणाने सुरू होईल, तो दिवस हा नक्‍कीच शुभ दिवसच मानायला हवा नाही का? कारण त्याने आपल्याला या झोपेतून उठवले आहे म्हणून आपण हा दिवस पाहात आहोत, हे विसरून कसे चालेल?

जीवनातल्या उगवलेल्या दिवसाची खरी सार्थकता ही ईश्‍वरावर श्रद्धा ठेवून आम्ही आमची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या. सर्वांशी प्रेमाने वागून तो दिवस सार्थकी लावला तरच योग्य होईल नाही का? दिवसाच्या प्रारंभी प्रभाती मनी राम चिंतून दिवसाची गोड सुरुवात करायची. आपल्या कर्म-कर्तव्याला ईश्‍वरी कृपा आशीर्वादाची जोड द्यायची, हिच तर खरी शिकवण आहे सर्व साधू संतांची.

दिवसभर देवाच्या साक्षीने केलेली सर्व कर्मे रात्री त्याच्या पायाशी वाहायचे, त्या कर्मांचे कर्तेपण आपल्या खांद्यावर वाहायचे नाही, फलापेक्षेत अडकायचे नाही. हाच आहे ना निष्काम कर्म योग. चांगले केले, चांगले पेरले तर चांगलेच होणार आणि जे पेराल तेच उगवणार, हाच तर न्याय आहे ना निसर्गाचा? हेच तर गमक आहे ना सुखी जीवनाचे?

त्याच्या ध्यानातच रात्री झोपी गेले म्हणजे ती रात ही शुभरात्रच नाही का? आणि अशा रात्री सुखाची झोप येणारच. इतकेच नाही तर तो दयाळू परमात्मा आपल्याला नव्या दिवसाची नवी प्रभातही पुन्हा दाखवणारच, त्याच्याच स्मरणाने ती शुभप्रभात करण्यासाठी.

हा विचार कदाचित आचरणात आणायला थोडा अवघड वाटत असला तरी प्रामाणिक प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)