चोकसीसाठी एअर ऍम्ब्युलन्स पाठवण्याची ईडीची तयारी

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंकेचे अब्जावधी रूपयांचे कर्ज बुडवुन विदेशात पळालेला व्यापारी मेहुल चोकसी याला तेथून भारतात आणण्यासाठी डॉक्‍टरांच्या पथकासह एअर ऍम्ब्युलन्स पाठवण्याची आमची तयारी आहे असे सक्तवसुली विभागाने म्हणजेच ईडीने म्हटले आहे.

आपली तब्बेत बरी नसल्याने आपण भारतात येऊ शकत नाही असे चौकसी याने न्यायालयाला एका प्रतिज्ञापत्राद्वारे कळवले आहे. त्याच्या या प्रतिज्ञापत्रावर ईडीनेही एक प्रतिज्ञा पत्र सादर करून त्याचा दावा फेटाळून लावत वरील ग्वाही दिली आहे. चोकसी सध्या अँटिगुआ देशात आश्रयला गेला आहे आणि त्याने तेथील नागरीकत्वही विकत घेतले असल्याचे वृत्त आहे. ईडीने म्हटले आहे की त्याने आपल्या तब्बेतीचे दिलेले कारण पुर्ण खोटे असून कोर्टाचीही दिशाभुल करण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे. आणि जर खरेच त्याची तब्बेत खालावलेली असेल तर डॉक्‍टरांच्या पथकासह आम्ही त्याला भारतात आणण्यासाठी एअरऍम्ब्युलन्सही पाठवण्यास तयार आहोत असे ईडीने न्यायालयाला कळवले आहे.

13 हजार कोटी रूपयाच्या या घोटाळ्याच्या चौकशीच्या कामात त्याने आत्ता पर्यंत कधीही चौकशीला सहकार्य केलेले नाही असेही ईडीने म्हटले आहे. ईडीने आपली 6129 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली असल्याचा दावा चोकसी याने केला होता. तोही ईडीने आज अमान्य केला. त्यांनी म्हटले आहे की आम्ही चोकसीची केवळ 2100 कोटी रूपयांचीच मालमत्ता जप्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)