ग्राहकांचा विश्‍वास हीच बॅंकेची शक्‍ती -ए. एस. राजीव

महाराष्ट्र बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक राजीव यांचे प्रतिपादन

पुणे – महाबॅंकेच्या द्रष्टया संस्थापकांनी लावलेल्या बीजाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून बॅंकिंग सेवेच्या सर्व अद्ययावत सुविधा ग्राहकांना आपुलकीच्या सेवेसह देत असल्याने अडीच कोटींपेक्षा अधिक ग्राहकांचा विश्वास या बॅंकेने संपादन केला आहे. हीच या बॅंकेची खरी शक्ति असल्याचे प्रतिपादन बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी केले.

बॅंक ऑफ महाराष्ट्रचा 84 वा व्यवसाय वर्धापन दिन पुणे येथील मुख्य कार्यालयासह बॅंकेच्या सर्व अंचल कार्यालयात साजरा करण्यात आला. हा दिवस कर्मचाऱ्यांचा प्रतिबद्धता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी राजीव बोलत होते.
कार्यकारी संचालक ए. सी. राउत म्हणाले की, कालानुरूप घडणारे बदल स्वीकारताना बॅंकेने कर्तव्यास सेवा म्हणून स्वीकारले. त्यामुळे कठीण काळातही बॅंक स्वत:चे अस्तित्व टिकवू शकली आणि या सेवाभावामुळेच बॅंकेच्या प्रगतीसह ग्राहकांचे हित जपू शकली असे ते म्हणाले.

बॅंकेचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा म्हणाले की, खडतर काळात अधिक परिश्रमांची आवश्‍यकता असून पुढील प्रत्येक स्पर्धेचा आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकाने सजग राहून जिव्हाळ्याची सेवा ग्राहकांना देण्यानेच बॅंक अधिक सक्षम होईल. सर्व कर्मचारी ग्राहकांना अपेक्षित अशी आपुलकीची सेवा भविष्यातही देतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

बॅंकेच्या पुणे मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रमात कर्मचाऱ्यांनी गायन, एकपात्री, नकला कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी पुणे शहर आणि पुणे पश्चिम अंचल कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह सर्व उच्च पदस्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)