खा. उदयनराजेंनी विद्यार्थ्यांशी साधला दिलखुलास संवाद

कराड  – श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले यांनी शनिवारी येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज, वेणूताई चव्हाण कॉलेज, सद्‌गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये अचानक भेट देवून विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. विद्यार्थी व खा. भोसले यांच्या गप्पा बराचवेळ चालल्या होत्या. मुलांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्य उत्तर देत खासदारांनी विद्यार्थ्यांसह उपस्थितांची मने जिंकली.

या चर्चेअंतर्गत एका विद्यार्थिनीने तुमचे पहिले प्रेम कोणते? असा प्रश्‍न खा. भोसले यांना विचारला. यावर त्यांनी मार्मिक असे उत्तर दिले. ते म्हणाले, माझं पहिलं प्रेम म्हणजे माझी जनता. कॉलेज जीवनापासूनच कोणावरही अन्याय झालेला मी खपवू शकत नव्हतो. कॉलेज जीवनापासूनच मला जनतेविषयी तळमळ होती. जनता हेच माझे कुटुंब आहे. या कुटुंबाने आतापर्यंत मला खूप प्रेम दिले आहे, मीही देत राहणार आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यातील पहिलं प्रेम ही माझी जनता आहे.

कॉलेजमध्ये मुलींची छेडछाड केली जाते, हल्ली महिलांवर अत्याचारही होत आहेत. तुम्ही माझे एक भाऊ म्हणून याबाबत काय सांगाल युवतींच्या प्रश्‍नावर खा. उदयनराजे म्हणाले, शिक्षणासाठी जेव्हा आपण कॉलेजमध्ये प्रवेश घेतो तेव्हा स्वत:च्या पायावर उभे राहून कुटुंबाचा आधार बनू हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवत असतो. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश करतो की मुलींची छेडछाड करण्यासाठी? अशी छेडछाड जर तुमच्या बहिणीसोबत झाली तर तुम्ही ती सहन करू शकाल काय? हा प्रश्‍न स्वत:ला विचारा तेव्हाच तुम्ही कॉलेजमधील मुलींचाही सन्मान कराल. जेव्हा प्रत्येक तरूण हा विचार करेल तेव्हा कॉलेजमध्ये अशी प्रवृत्तीच राहणार नाही.

संसदेत सातारच्या खासदारांनी काहीच प्रश्‍न विचारले नाहीत याबाबत आपले काय मत आहे. यावर मतदारसंघात मी खूप कामे केली आहेत, माझा जाहीरनामा मी पूर्ण केला आहे. इतरांनी त्यांच्या मतदार संघात किती कामे केली हे त्यांनी सांगावे. मी बोलण्यापेक्षा काम करण्यावर भर देतो. तुम्हाला चिफ मिनिस्टर झालेले आम्हाला पहावयाचे आहे अशी अपेक्षा एका विद्यार्थीनीने व्यक्‍त केली. त्यावर मला जनतेच्याजवळ रहायला आवडते, जनतेत मिसळायला आवडते व जनता मला माझ्याजवळ हवी आहे. चिफ मिनिस्टर झाल्यानंतर ही संधी जास्त मिळत नाही त्यांच्या या उत्तराने सर्वजण भारावून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)