खा. लोखंडेंच्या सहायकाविरोधात गुन्हा दाखल

विनापरवाना फ्लेक्‍स व झेंडे प्रकरण ः नगरपरिषदेने हटविले फ्लेक्‍स

संगमनेर – लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यावरून खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर तीन गुन्हे दाखल झाले असतानाच आता शहरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे विनापरवाना फ्लेक्‍स व झेंडे लावल्याच्या कारणावरून त्यांच्या सहायकाविरोधात नगरपरिषदेच्या जागेचे विद्रूपीकरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. नगरपरिषदेने जेसीबीने हे बेकायदा फ्लेक्‍स हटवले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी सायंकाळी संगमनेरमध्ये शिवसेनेचे उमेदवार खा. लोखंडे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहराच्या विविध भागांत ठाकरे यांच्या सभेचे फ्लेक्‍स आणि शिवसेना, भाजप, रासप आदी महायुतीत सामील झालेल्या पक्षांचे झेडे लावले होते.

नगरपरिषदेच्या जागेचे विद्रूपीकरण केल्याच्या कारणावरून कारवाई करत नवीननगर रस्ता, राजपाल कॉर्नर, दिल्लीनाका, अकोले नाका आणि संगमनेर शहरात लावलेले सभेचे फ्लेक्‍स आणि झेंडे सभेपूर्वीच हटवले. नगरपरिषदेचे अतिक्रमण विभागप्रमुख सुदाम बाळासाहेब सातपुते यांनी यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात विठ्ठल भाऊसाहेब ढगे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ठाकरे यांच्या सभेपूर्वीच नगरपरिषदेने केलेल्या कारवाईमुळे उमेदवार खा. लोखंडे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर करत आहेत. ठाकरे यांच्या सभेपूर्वीच शहरातील विनापरवाना फ्लेक्‍स हटवण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)