सीमेवरील जवानांसाठी ‘ई-मेल’ मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून “ईटीपीबीएस’ विकसित


जवानांना ई-मेलद्वारे मतपत्रिका पाठविली जाणार


मतदान करून मतपत्रिका पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवावी लागणार


पोस्टल पोहोचवण्यासाठीचा 15 दिवसांचा कालावधी वाचणार


मतदान संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वेळेत पोहोचणार

पुणे – लोकसभा निवडणुकीमध्ये सीमेवरील जवानांना मतदानाचा हक्‍क बजावता येण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने “सी-डॅक’च्या मदतीने इलेक्‍ट्रॉनिकली ट्रान्समिटेट पोस्टल बॅलेट सीस्टीम (ईटीपीबीएस) ही प्रणाली विकसित केली आहे. याप्रणालीमुळे जवानांना ई-मेलद्वारे मतपत्रिका पाठविली जाणार आहे. ई-मेलची प्रिंट काढून जवान मतदान करून ती मतपत्रिका पुन्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवणार आहेत. यामुळे पोस्टल सैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारा 15 दिवसांचा कालावधी वाचणार आहे. त्यामुळे सैनिकांनी केलेले मतदान संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वेळेत पोहोचणार आहे. पुणे विभागातील सुमारे 35 हजार 262 सैनिक मतदार तर जिल्ह्यातील 4 हजार 972 सैनिक मतदार या पध्दतीने आपला मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत.

“कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये,’ हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे ब्रीदवाक्‍य आहे. त्यानुसार अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्‍क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग विशेष प्रयत्न करत आहे. पूर्वी अंतिम मतदार यादी तयार झाल्यानंतर मतपत्रिका छापून ती पोस्टाद्वारे संबंधित सैनिकांपर्यंत पाठविण्यात येत होती. सैनिकांपर्यंत मतपत्रिका पोहोचण्यासाठी सुमारे 15 दिवसांचा कालावधी लागत होता. त्यानंतर मतदान करून ती मतपत्रिका पुन्हा संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पोस्टाद्वारेच पाठविण्यात येत होती. या पध्दतीनुसार मतपत्रिका सैनिकांपर्यंत पोहोचण्यास उशीर होत होता. तसेच, मतदान केल्यानंतर मतपत्रिका वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पोहोचणे आवश्‍यक असते. या सर्व पार्श्‍वभूमिवर निवडणूक आयोगाने मतपत्रिका पाठविण्यासाठीच्या वेळेत बचत केली आहे.

निवडणूक आयोगाने “ईटीपीबीएस’ ही प्रणाली विकसित केली असून याद्वारे ई-मेलद्वारे मतपत्रिका सैनिकांना पाठविली जाणार आहे. मतपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी मोबाइलवर “वन टाईम पासवर्ड’ दिला जाणार दिला जाणार आहे. ही मतपत्रिका डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून त्यावर सैनिकांनी आपले मत नोंदवायचे आहे. मतपत्रिकेवर “नोटा’ हा पर्याय सुध्दा असणार आहे. मतदान केल्यानंतर मतपत्रिका पुन्हा पोस्टाद्वारे संबंधित लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवावी लागणार आहे. मतमोजणीच्या दिवशी पोस्टल मतदान मोजले जाणार आहे. या मतपत्रिकेवर बारकोड क्रमांक असणार आहे. तसेच, सांकेतिक क्रमांक सुध्दा असणार आहे. मतमोजणीच्या वेळी बारकोड स्कॅनरद्वारे या मतपत्रिकेची सत्यता पडताळून पाहिली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)