ई-सिगारेट

सुसंस्कृत आणि आदर्श पिढी हेच देशाचे भवितव्य असा सुविचार आपण अनेकवेळा ऐकतो मात्र आज तरुणाई आणि अल्पवयीन मुलामुलींमधील व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण पाहता देशाच्या भवितव्याबाबत चिंता वाटते. दिवसागणिक व्यसनांचे प्रकार वाढत असून या व्यसनांच्या काळोखात अल्पवयीन शाळकरी मुलेमुली देखील लोटली जात आहेत. सिगारेट, गांजा, व्हाईट्‌नर अशा जीवघेण्या व्यसनांसोबतच आता या व्यसनांच्या यादीमध्ये ई-सिगारेटचा देखील समावेश झाला आहे. मार्केटमध्ये सहज उपलब्ध असलेल्या या ई-सिगारेटची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

केवळ फॅशनसाठी म्हणून फिल्मी स्टाईलने सिनेमातील एखाद्या हिरोप्रमाणे तोंडातून धूर काढण्यासाठी या ई-सिगारेटचा वापर केला जात असून ई-सिगारेटचे व्यसन करणाऱ्यांच्या मते ई-सिगारेट अन्य तंबाखूजन्य सिगारेट पेक्षा सुरक्षित असल्याने हे व्यसन करण्यास हरकत नसल्याचे म्हटले जाते. मात्र तज्ञांच्या मते कोणतेही धूम्रपानामुळे सावकाश पण, वेदनादायी मृत्यु ओढवतोच, ई-सिगारेट अन्य सिगारेट पेक्षा वेगळी नसून यामुळे सुद्धा केस व तोंडाला दुर्गंधी, हिरड्याला इजा, दातांवर काळे-पिवळे डाग, नाकाने श्‍वास घेण्याची क्षमता कमी होणे, अकाली वृद्धत्त्व, रोग प्रतिकारकशक्ती कमी होणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, एकाग्रता कमी होणे असे अनेक दुष्परिणाम होतात. असे असतानादेखील केवळ स्टाईल स्टेटमेंट म्हणून अनेक शालेय विद्यार्थ्यांकडून ई-सिगारेटचा वापर केला जात आहे.

वयाच्या अशा टप्प्यावर असताना जेथे कोणतीही नवीन गोष्ट ट्राय करण्यासाठी आकर्षण आणि कुतूहल मोठ्या प्रमाणात असते नेमक्‍या त्याच वयामध्ये तंबाखूजन्य अथवा इतर अमली पदार्थांची सहज उपलब्धता होते आणि शालेय विद्यार्थी व्यसनांकडे वळतो. 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शाळा-महाविद्यालयाच्या 00 मीटर परिसरात तंबाखू, गुटखा, सिगारेटची विक्री केली जाऊ नये, अशा प्रकारचा अध्यादेश काढला होता. परंतु या अध्यादेशाचे पालन मात्र होताना दिसत नाही. प्रत्येक शाळा, महाविद्यालयांच्या भोवताली तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्या हमखास दिसतात.

शासनाच्या नियमानुसार 18 वर्षांखालील अल्पवयीन व्यक्तीला तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे मात्र याचे देखील पालन होताना दिसत नाही. मात्र या सर्वांमुळे देशाचे भवितव्यच धोक्‍यात येत आहे एवढं मात्र नक्की.

– प्रीती फुलबांधे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)